द कूक

वास्तव आणि आभास यांच्या सीमारेषेवरचा हा लघुपट इतके अस्वस्थ करून गेला मग ते प्रत्यक्ष आयुष्य कसे असेल? कल्पना न केलेलीच बरी!

Story: आवडलेलं |
22nd March, 06:52 am
द कूक

काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ‘डब्बा कार्टेल’ नावाची मालिका बघितली. डबे पोहचवणाऱ्या मुंबईतल्या काही बायका डब्यांतून अमली पदार्थांची विक्री करतात अशी ती गोष्ट. आमच्या लहानपणी अमली पदार्थांबद्दल नेहमी काहीनाकाही बातमी असायचीच, त्याचा परिणाम इतका होता की लहान असताना औषधालाही ड्रग म्हटले जाते हे कळल्यावर धक्का वगैरे बसला होता. आता, म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून या बातम्या अगदी आपल्या गावात येऊन पोहचलेल्या आहेत. पुण्यात, मी कॉलेजमध्ये शिकत असताना, या गोष्टीची पहिल्यांदा जाणीव झाली. आमच्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावरच म्हणे या पदार्थांची बिस्कीटरुपात विक्री करण्यात यायची. ते बिस्कीट खाल्ले की अनेक तास नुसते हसायला यायचे. सुदैवाने आम्हाला चांगली संगत होती त्यामुळे आम्ही कधी त्या वाटेला गेलो नाही पण गेलो असतो तर काय वाताहत झाली असती याचा विचार करून आत्ता अंगावर काटा येतो. 

कदाचित त्या बिस्कीटरूपात फार काही नसेलही. काही जण कॉलेजच्या दिवसांत उगाच सिगारेट ओढून बघतात, तसाच हा प्रकार असेल पण यातील काही जण तरी नक्कीच अमली पदार्थांच्या आहारी जाण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही ना?  सुरुवातीला नुसते कसे वाटते म्हणून बघण्यासाठी, नंतर उगाचच हसण्यासाठी म्हणून लोक या बिस्किटाच्या मागे लागत असतील, नंतर त्याच्यातले वेगवेगळे प्रकार काय आहेत ते बघण्यासाठी आणि नंतर नंतर केवळ त्याची सवय झालेली असते आणि त्यातून बाहेर पडणे अवघड, जवळजवळ अशक्य असते म्हणून!

अमली पदार्थांचा विषय निघाला की, होम अलोन मधला गोड केविन मॅकॲलिस्टर डोळ्यांपुढे येतो. हा नट, म्हणजेच मॅककाऊली कलीन वयाच्या पंधराव्या वर्षापासून अमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागला. तसाच ‘फ्रेंड्स’ मालिकेतला चॅन्डलर म्हणजेच मॅथ्यू पेरी! अनेक वेळा प्रयत्न करूनही तो हा नशेच्या गर्तेतून सुटला नाही आणि त्याचा शेवट काय झाला?

हे सगळे चालू असतानाच अनिल अवचट यांची पुस्तके वाचनात आली. त्यातूनही अनेक गोष्टी समजल्या आणि या गोष्टीबद्दल मनात अतोनात भीती भरून राहिली. तुषार नातू यांच्या नशायत्रा याही पुस्तकाचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. वर मी म्हटले, यातून बाहेर पडणे जवळजवळ अशक्यच पण त्यांनी ते साधले आणि तो प्रवास लिहिला. ते वाचूनच मला असे वाटते की खरेच जवळजवळ अशक्य असलेली गोष्ट त्यांनी केली. डब्बा कार्टेल बघितल्यावर तर यातील गुंतागुंत अधिक लक्षात आली. याची चालणारी विक्री, त्यात असलेले लोक आणि त्यांची कामाची पद्धत हे किती भयंकर आहे. प्रत्यक्ष मालिका बघून दोन आठवडे झाले तरीही ते डोक्यातून गेले नाही आणि अगदी याच दरम्यान ‘द कूक’ नावाचा अवघ्या तीन मिनिटांचा, एकही संवाद नसलेला लघुपट माझ्या बघण्यात आला आणि त्याच दिवशी एका मैत्रिणीचा एक अतिशय सुंदर लेख वाचनात आला. मोठ्या शस्त्रक्रियेनंतर देण्यात येणारी वेदनाशामक औषधे, अर्थात ओपियमसारख्या औषधांचा होणारा परिणाम यावर तो लेख होता. औषध म्हणून घ्यायला लागलेल्या या पदार्थाचा परिणाम इतका भयंकर होता ते लोक मुद्दाम का घेत असतील? उत्तर एकच आहे. एकदा त्या गर्तेत अडकले की त्यातून बाहेर निघणे अवघड. हे फक्त मानसिक नाही. त्याची शरीराला इतकी आणि अशा प्रकारे सवय होते की इच्छा असूनही योग्य उपचार घेतल्याशिवाय (कधीकधी ते घेऊनही) माणूस यातून बाहेर पडू शकत नाही. अनेकदा बाहेर पडू या, पडू शकतो, पडता येईल असे वाटते पण शरीर हा मनोनिग्रह टिकू देत नाही. 

अशाच विषयावर बेतलेला हा लघुपट कोणत्याही संवादा आणि निवेदनाशिवाय पुढे जातो. एका आभासी दृश्याची कल्पना आपल्यापुढे साकारली जात असते. काय चालले आहे ते सुरुवातीला समजत नसते. खरेतर ते दृश्य आभासी आहे हेही आपल्याला समजले नसते पण एका क्षणात दृश्यात बदल होऊन जेव्हा आपल्याला वास्तव समजते तेव्हा नेमके काय झाले ते लक्षात येते. अमली पदार्थांच्या आहारी गेलेली व्यक्ती बाहेर पडायचा अतोनात प्रयत्न करत असते. पण त्यांच्याबाबतीत नेमके काय घडत असेल असा प्रश्न पडतो. त्याचे ठोस असे उत्तर देणे हा लघुपटाचा हेतू नसावाच पण त्याची कल्पना मात्र आपल्याला येते. 

वास्तव आणि आभास यांच्या सीमारेषेवरचा हा लघुपट इतके अस्वस्थ करून गेला मग ते प्रत्यक्ष आयुष्य कसे असेल? कल्पना न केलेलीच बरी!


मुग्धा मणेरीकर, फोंडा