वसंत ऋतु म्हणजे निसर्गाचा राजा! रंगांची उधळण, फुलांचा बहर आणि नवचैतन्याची चाहूल घेऊन येणारा हा ऋतू मनाला आनंदित करतो. पानगळीनंतर हिरवी पालवी फुटते, कोकिळेचे मधुर स्वर कानी पडतात आणि अवघी सृष्टी नववधूसारखी सजते. या मोहक वसंताचे स्वागत करूया!
तसं पाहिलं तर निसर्ग सर्वच ऋतुत आपलं सौंदर्य वेगवेगळ्या रूपात उधळत असतो ते सर्व आपआपल्या परीने सुंदरच असतं पण तरीही वसंत हा सर्व ऋतूंचा राजा म्हंटलं जातं. ऋतूचे चक्र फिरते त्या गतीबरोबर भूमी आणि आकाश आपलं नवं रंग, रूप धारण करत असतात. वसंत हा ऋतु सर्व ऋतुंपेक्षा मोहक आणि सुंदर असतो. त्याच्या आगमनाने सारे चराचर आणि सृष्टी हर्षभरीत झालेली असते. पाहता पाहता आसमंत बदलतो जणू कुणी जादूगाराने आपली जादूची छ्डी फिरवावी तसं घडतं. झाडांना नवजीवन देणारा हा ऋतु. सुकलेली, वठलेली झाडे पुन्हा हिरवी पालवी अंगांगावर लेवून सजतात, फुलेच फुले उमललेली दिसतात त्यांच्याभोवती, रुंजी घालत मधुकर गुंजारव करताना दिसतो. फुलपाखरे या फुलावरून त्या फुलावर बागडताना दिसतात. फुलांचं फळात रूपांतर होण्याचा हा त्यांचा गर्भकाल, फुलांच्या कळ्यांचं फुलात आणि फुलांचं फळात रूपांतरित होण्याची ही सृजनबेला आणि मधुमास. फळाचा, फुलांचा बहर एक मंद सुगंध पसरवीत जणू सर्व धरेला सुगंधित करत असतो. निसर्ग रंग, रूप, गंध यांची पूजा मांडतो. एक आगळे चैतन्य चराचरात भरून रहाते. पिवळ्या फुलांच्या बहराचा हा मौसम सरसों म्हणजे मोहरीची शेते पिवळी पिवळी हळद लागली अशी नव्या नवरीगत नटलेली असतात.
वसंत ऋतुत ही धरती माता जरा जास्तच नटलेली दिसते, कडक हिवाळ्यात झाडांची पानं गळून जातात निष्पर्ण झालेल्या झाडांना पाऊस नसतानासुद्धा नवा फुटवा येवू लागतो. पानफुलांची शोभा उत्कटतेने उमलू लागते. बकुळी, अबोली, शेवंती जास्वंद यांच्या फुलांची रेलचेल दिसते नुसती. सोनचाफ्यांचे निष्पर्ण झालेले दांडे फुलांनी डवरून येत प्रत्येक फांदीवर एक पुष्पगुच्छ सजवून ठेवल्यागत दिसू लागतो. आंबा, काजू या फळ झाडांना मोहोर डवरलेला असतो. यौवन हा जर आपल्या जीवनाचा वसंत ऋतु असेल तर त्या दृष्टीने वसंत ऋतु म्हणजे पृथ्वीचा यौवनाचा ऋतु म्हटला पाहिजे. वसंत ही निसर्गाची युवावस्था आहे. वसंताचे वातावरण खेळकर अल्लड युवतीसारखं असतं. सृष्टीचे सौंदर्य आणि युवावस्था एकत्र येतात तो वसंत ऋतु. प्राणिमात्रातल्या निर्मितीच्या शक्तीला उन्माद मिळवून देणारा हा वसंत ऋतु हे अमर आशावादाचे प्रतीक आहे जराजर्जर झालेल्या वृक्षाला पुनर्जन्म देण्याचे सामर्थ्य या ऋतुत असते.
वसंत म्हणजे आशा आणि सिद्धी यांचा सुंदर संगम. कल्पना आणि वास्तविकता यांचा समन्वय होय. ऋतुपती, ऋतुराज, कुसुमाकर, माधवी, वसंत ही सर्व नावे वसंत ऋतुची. तर इंग्रजीमध्ये स्प्रिंग म्हणतात. आंब्यांना काजू फणसांना फळे धरू लागतात. हिरव्यागार टपोर्या कैर्या वार्या संगे झोके घेवू लागतात. फणसाच्या झाडाला अंगाखांद्यावर लगडलेले भारदस्त फणस पाहून विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा म्हणावसं वाटतं. रानमेवा जाळीमध्ये पिकू लागतो. जांभळाचे घोस झुंबरागत झाडाला लोंबू लागतात आणि वानरसेना ते खाण्यासाठी फांद्या फांद्याला झोंबू लागतात. वसंतातल्या अर्धवट राहिलेल्या सर्व रचनांचे पूर्णत्व होते ते वैशाखात. गुलमोहोर पानपानातून फुलून येतो तांबडा भडक गालीचा अंगावर लेवून राजेशाही थाटात मान वर करून उभा असतो. कालिदासाने या वसंताला वसंतयोद्धा म्हटले, तो योद्धा हर्ष आणि नवोत्कर्ष बरोबर घेवून येतो. ज्याला वसंताचा स्पर्श होतो ते फूल असो की लता किंवा कुणाचे हृदय ते सुगंधाने भरून जाते. वसंत ऋतु म्हणजे जीवनाचं प्रतीक. कुठल्याही कठीण परिस्थितीत फुलणारा झाडांचा पानोरा पहा वाईट परिस्थितसुद्धा त्याच्यासारखं बहरायला शिका म्हणजे यशाची पालवी आपोआपच बहरेल. निराशेने ग्रासलेल्या मनाला वसंत हा आशेचा किरण दाखवतो. कानावर पडणारे कोकिळेचे मधुर स्वर, आम्र तरुवरचा गच्च मोहोर आणि तांबडा भडक फुललेला गुलमोहोर हे पाहून वसंताची खूण पटते आणि मनातसुद्धा त्याचं प्रतिबिंब उमटते.
दाही दिशांना मोहरून टाकत, सुगंधाची पखरण करत याचं आगमन होतं. फळा-फुलांची आम्रपल्लवीची तोरणे उभारली जातात, बहावाचे पिवळे सोनेरी फुलांचे घोस, शाल्मली अन् गुलमोहोर यांचे गुच्छ सजलेले असतात. त्याच्या स्वागतासाठी कोकिळेचे मधुर गान, फुलपाखरांचे उडत उडत चाललेले नृत्य, पक्षी गणांचे गोड गुंजारव सारेच कसे मोहून टाकणारे असते. कुणीही पाण्याचा थेंबसुद्धा घालत नाही तरी रानावनातून अशी पूर्ण फुललेली झाडे जागोजागी दिसतात. ही या वसंताची किमया. ही किमया पाहून निराश, उदास झालेल्या मनालासुद्धा अशी आशेची पालवी फुटू लागते. मनाची मरगळ झटकून टाकत पुन्हा नव्या दमाने ते कामाला लागते. निसर्गातली रंगांची उधळण पाहून जणू रंगपंचमीच मनात अवतरते. वसंत ऋतु म्हणजे जीवनाचं प्रतीक. कुठल्याही कठीण परिस्थितीत फुलणारा झाडांचा पानोरा पहा, वाईट परिस्थितीतसुद्धा त्याच्यासारखं बहरायला शिका, सुख-दुःखांचा, ऊन-सावलीचा खेळ तर जीवनात अनुभव देत असतोच त्यातून सुखाची फुले वेचा, यशाची पालवी फुटेलच थोडा वेळ जावा लागतो मग यशाची फळे फुलतीलच. निराशेने ग्रासलेल्या आयुष्यासाठी वसंत हा एक आशेचा किरण असतो. निसर्ग माणसाला शहाणा करत असतो. ऋतुचक्र काहीही न बोलता आपले भाव प्रगट करत असतात. या ऋतूंच्या आगमनाप्रमाणे सुख दु:खे आयुष्यात येत जात रहाणार हेच जीवनचक्र आहे. निसर्गाकडे एक अजब जादू आहे त्यामुळे मनातली दुखे, वेदना पळवून लावता येतात. अशा ऋतूंच्या हाताने जणू ईश्वर पृथ्वीला स्पर्श करत असतो. त्यामुळे चराचरात ईश्वरी कृपेचा आभास होत असतो व त्या अमूल्य स्पर्शाने आपल्या मनात स्फूर्ति, उत्साह, निर्माण होत असतो. सृष्टीचे सौंदर्य आणि तिचे तारुण्य हे जणू एकत्र येवून वसंत ऋतु फुलतो. चैत्र वैशाख ह्या वर्षाच्या सुरुवातीला येणाऱ्या महिन्यात येणारा ऋतु म्हणून पहिला मान वसंत ऋतूचा. कानावर पडणारे कोकिळेचे कुजन, आम्र तरुवर, काजूच्या झाडांवर आलेला गच्च मोहोर, वठलेल्या गुलमोहरतून उमटलेला तांबुस रंगपिसारा हे सारे निसर्गाच्या जादूच्या पोतडीतून बाहेर पडलेले एकेक चमत्कार म्हणजे साऱ्या सृष्टीला लागलेली वसंत ऋतूची चाहूल. असा हा ऋतुराज जेव्हा आपल्या दारी येतो तेव्हा आपल्या मनात त्याचं प्रतिबंब पडतं आणि वनातला वसंत मनात अवतरतो. दाही दिशांना सुगंधाचे अत्तर शिंपडत, रंगीबेरंगी फुलांची, रंगाची उधळण करत तो एखाद्या राजासारखा प्रवेश करता होतो. उन्हाळा जाणवू लागला तरी तो सुखद असतो. कोकिळेला आपला सूर गवसतो, वाळक्या सुक्या फांद्यात हिरवा रंग डोकाऊ लागतो. रानावनातून वसंत पिंगा घालू लागतो. जुन्याचा मागोवा संपवून नव्याची कास धरत नवा ऋतु अवतरतो. वर्षा ऋतु जरी सृजनाचा असला तरी त्यावेळी जल सिंचन होत असते त्यातून नव्याचा जन्म होतो पण वसंतात मात्र असं अनुकूल वातावरण नसताना उष्ण हवामानात सुकलेल्या, वाळलेल्या झाडांना कोवळी पालवी फुटते हे खरे सृजन म्हटले पाहिजे. जणू नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पृथ्वी आतून मोहरून येते. वसंत हे कामदेवाच्या पुत्राचे नावही सौंदर्याची देवता आहे या ऋतूचे हे नावही किती सार्थ आहे.
वसंत ऋतु म्हणजे जणू जीवनाचं प्रतीक. कठीण परिस्थितीत झगडत फुटलेला झाडांचा पानोरा म्हणजे वसंत. प्रतिकूल परिस्थितीत त्याच्यासारखं बहरायला शिका, निसर्गाचा नीट अभ्यास केला की तो तुम्हाला शहाणा करतो, निसर्गाकडे एक जादू आहे त्यामुळे मनातली दुःखे, निराशा नाहीशी होतात. येणारी वसंत पालवी म्हणजे आशेचा किरण. म्हणूनच त्याचे मनापासून स्वागत केले जाते. प्राणिमात्रांच्या निर्मिती शक्तीला उन्माद मिळवून देणारा हा ऋतु. हे अमर आशावादाचे प्रतीक आहे.
- प्रतिभा कारंजकर, फोंडा