पण खरी गंमत इथेच आहे. माणूस हा नेहमी चुकणारच!...तुमच्या आठवणीत अशी एखादी चूक आहे का, जिला तुम्ही खूप मोठं समजलात, पण नंतर कळलं की ती तुमच्या भल्यासाठीच होती? आज जरा यावर विचार करूयात.
लहानपणी आमच्या कॉलनीत एक आजोबा होते. आम्ही त्यांना ‘गंभीर आजोबा’ म्हणायचो. कारण ते कायम भुवया उंचावून, जणू एखाद्या महासंकटाच्या तयारीत असावेत, अशा मुद्रेत असायचे. त्यांचं एक वाक्य नेहमी कानांवर पडायचं, “चूक अजिबात करायची नसते, बयो!”
त्यांचं हे एक वाक्य माझ्या डोक्यात इतकं खोलवर बसलं होतं की, मी जेव्हा पहिल्यांदा वर्गात पाढे म्हणताना ‘सात एके सहा’ असा भन्नाट शोध लावला, तेव्हा गणिताच्या शिक्षिकेपेक्षा जास्त धडधड मला गंभीर आजोबांचीच वाटली होती. त्यांनी जर हे बघितलं असतं तर, "चूक केलीस!" म्हणून चक्क माझी वहीच हिसकावून घेतली असती!
पण खरी गंमत इथेच आहे.
माणूस हा नेहमी चुकणारच!
समुपदेशनाच्या सत्रात अनेकदा लोक माझ्याकडे येतात आणि सांगतात, “मॅडम, मी परफेक्ट होण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, पण लोक माझ्यात उगाचच दोष काढतात.” मग मी सहज विचारते, “तुम्ही स्वतः कोणतीही चूक केली नाही का?” ह्यावर उत्तर मिळतं, "छे! चूक करायची नाही असंच तर शिकवलं गेलंय मला!”
खरंतर, चूक होणं म्हणजे काही पार जगबुडी नव्हे, पण आपल्या आजूबाजूच्या समाजाने ती तशीच काहीशी रंगवली आहे. ‘तू नक्की कुठे चुकलास?’ हा प्रश्न आपल्या शिक्षणपद्धतीपासून कार्यालयांपर्यंत सगळीकडे विचारला जातो. लहानपणी एकदा शाळेत माझ्या मैत्रिणीने गणिताच्या पेपरमध्ये दोनदा उत्तर तपासलं आणि शेवटी चुकीच्या उत्तरालाच टिक केलं. निकाल लागल्यावर तिचा चेहरा अगदी आंबट झालेल्या दुधासारखा दिसत होता. तिच्या आईनेही तिला तेव्हढंच सुनावलं, “अगं, एवढा अभ्यास केला होतास, तरी चूक कशी काय झाली?”
अगदी असंच मोठं झाल्यावरही होतं. ऑफीसमध्ये एखाद्याचं प्रेझेंटेशन बिघडलं, की लगेच बॉस डोळे मोठे करून विचारतात, “तू यासाठीच ट्रेनिंग घेतलंस का?” म्हणजे, चूक ही केवळ अज्ञानाचं लक्षण नसून, लाज वाटण्यासारखी गोष्ट झाली आहे.
चूक करण्याच्या बाबतीत मानसशास्त्र काय सांगते?
मनोविकारतज्ज्ञ फ्रॉइड म्हणतात की माणसाचं मन तीन भागांत विभागलेलं असतं – Id, Ego आणि Superego. यातला Superego म्हणजे आपले ‘गंभीर आजोबा.’ जे प्रत्येक वेळी आपल्याला सांगत असतात "बाबा रे, चूक करू नकोस!" पण Id म्हणजे आपलेच अंतर्मन, जे उलट म्हणते, “अरे, चुकलास तर काय झालं? मजा तर आली ना, काही शिकता तर आलं ना?”
परंतु बरेचदा समाज आणि संस्कृती आपल्यातल्या ‘गंभीर आजोबा’ अर्थात Superego लाच जास्त महत्त्व देतात. त्यामुळे आपल्याला ठामपणे वाटत राहतं, “आपण परिपूर्णच असायला हवं.” आम्ही मानसशास्त्रीय भाषेत यास "Perfectionism Anxiety" असं देखील म्हणतो.
पण खरं सांगू?
सर्वात मोठी चूक म्हणजे चूक न करण्याचा अट्टहास धरणं.
एका समुपदेशिकेच्या दृष्टिकोनातून सांगायचं तर, चूक ही अशी करायची की तिच्यामुळे आपल्याला शिकता आलं पाहिजे. जसं पहिल्यांदा सायकल चालवताना आपण पडतो, तसं आयुष्यातही शिकायच्या प्रवासात आपल्याला काही वेळा आपटावंच लागतं. जसे “टाकीचे घाव सोसल्याविना देवपण मिळत नाही” अगदी तसेच!
तुम्ही लहान बाळाला कधी चालायला शिकताना पाहिलंय? ते पडतं, पुन्हा उभे राहतं, परत पडतं. कुणी सांगतं का त्याला, "अरे, हे काय रे? नीट चालता येत नाही का तुला?" उलट सगळे टाळ्या वाजवतात, "अरे वा! किती छान प्रयत्न करतंय बघा आमचं बाळ!"
मग पुढे मोठे झाल्यावर आपण ह्या टाळ्या का विसरतो? का चूक केली की लोक डोक्यावर टोपी ठेवतात आणि न्यायाधीश बनून शिक्षा सुनावतात?
परिपूर्णतेचा सोस
सध्या समाजात एक अजब गोंधळ आहे. चूक केली तर आपण ‘नाकर्ते,’ आणि चूक केली नाही असं म्हटलं, तर ‘खोटारडे!’ कधी कधी तर ह्या परिपूर्णतेच्या मागे लागण्याच्या नादात आपण आपल्यातली सृजनशीलता देखील गमावतो. म्हणूनच, जेव्हा आपण सतत “सर्व काही बरोबरच असलं पाहिजे” ह्या दबावाखाली वावरतो, तेव्हा आपल्या नव्या कल्पनांना, नव्या प्रयोगांना आपोआपच तिलांजली मिळत असते.
आता तुम्ही विचाराल, पण अगं मानसी, परफेक्ट असण्याचा ध्यास असणं चुकीचं आहे का? तर नाही. परफेक्ट असण्याचा ध्यास असणं काही चुकीचं नव्हे. परंतु परफेक्ट होत असताना स्वतःतल्या इम्परफेक्शनला ही स्वीकारणं हे योग्य होय. काही लोकांना वाटतं, चुकल्याने त्यांची किंमत कमी होते. परंतु खरं तर चूक केल्याने तुम्ही एक पायरी वर चढता. कारण तुम्हाला कळतं, "हे असं नाही जमलं, तर आता दुसरं काहीतरी करून बघूया!"
अहो, जगातल्या मोठ्या संशोधकांनी हजारो चुका केल्यात की! एडिसनने विजेचा बल्ब शोधण्याआधी तब्बल १००० प्रयोग केले. पण तो म्हणायचा, "मी १००० वेळा फेल झालो नाही, उलट मी १००० असे मार्ग शोधले की ज्यांनी बल्ब बनू शकत नाहीत!”
चुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा!
चूक झाली की, पुढच्या वेळी अधिक शहाणं होता येतं. पण तिच्या भीतीने काही करूच नये, हे कधीही योग्य नाही. त्यामुळे आता तुम्ही ठरवा, चुकण्याला खरंच इतकं जड मानायचं? की त्याकडून काहीतरी नवीन शिकायचं?
तुमच्या आठवणीत अशी एखादी चूक आहे का, जिला तुम्ही खूप मोठं समजलात, पण नंतर कळलं की ती तुमच्या भल्यासाठीच होती? आज जरा यावर विचार करूयात आणि झालेल्या व येऊ घातलेल्या चुकांना लाज न मानता, त्यांना आपले गुरू बनवूयात!
मानसी कोपरे, मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक, डिचोली - गोवा मो. ७८२१९३४८९४