नारायणरावांच्या 'ध' चा 'मा' पासून ते आजच्या इमोजींच्या जगातल्या विसंवादापर्यंत, संवादाचा अर्थ आणि महत्त्व बदलले आहे. बोलण्यातील शब्दांपेक्षा भावना आणि देहबोली महत्त्वाची ठरते. चला तर मग, 'ध' चा 'मा' न करता, संवाद अधिक स्पष्ट आणि प्रभावी कसा करायचा, हे पाहूया!
“अहो, तो ‘ध’ चा ‘मा’ करू नका!’’
ही वाक्यं ऐकली की, सरळ पेशव्यांच्या आनंदीबाई आठवतात. आपला इतिहासच सांगतो की, गडबडीत एक साधा संवादाचा गोंधळ झाला आणि एक भलीमोठी विपत्तीच ओढवली. झालं असं की नारायणराव पेशव्यांना सोडवण्यासाठी त्यांच्या काकांनी म्हणजेच रघुनाथराव यांनी एक आज्ञापत्र पाठवलं होतं, “धरा नारायणरावांस.” परंतु आपल्या आनंदीबाईंनी यात थोडीशी “क्रिएटिव्हिटी” दाखवली आणि त्यांनी ते आज्ञापत्र वाचताना ‘ध’ चा ‘मा’ केला. आता आदेश झाला, “मारा नारायणरावांस!” आणि बघता बघता नारायणरावांचे काम तमाम झाले..!
रोजच्या आयुष्यात आपणही असंच काहीसं करतो, नाही का? व्हॉट्सअॅप वर एखादा मेसेज दोन तास ‘seen’ राहिला की समोरच्याच्या डोक्यात शंभर व्याख्या तयार होतात, ‘‘हा दुर्लक्ष करतोय का?’’, ‘‘की मुद्दाम वाचून उत्तर देत नाही?’’ वगैरे.
संवादाचा हा विचित्र खेळ!
माणसाला भाषा लाभली म्हणजे त्याने संवादाचा उलगडा पूर्णपणे केला असं समजू नका. संवाद आणि समज या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. “हो” असं म्हणायचं होतं पण आवाजाचा चढ-उतार चुकला की समोरचा “नाही” असं समजतो. मुळात संवाद म्हणजे फक्त शब्द नसतोच. संवादात शब्दापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो तो सूर. हातवारे, चेहऱ्यावरचे भाव, आवाजाचा उतार-चढाव, हे सगळं एकत्र आलं की संवाद घडतो.
जसं त्या जुन्या हिंदी सिनेमात हिरॉईन हिरोला “तुम बहुत बुरे हो!” म्हणते आणि तो चक्क खूश होऊन हसतो. आता बुरं म्हणजे वाईट नाही का? परंतु येथे त्या शब्दाचा शाब्दिक अर्थ न धरता ज्या लडिवाळ स्वरात ते म्हटले असेल त्यावरून भावना उमगत जातात. म्हणजे, शब्द आहेत साधेच, परंतु ते कुठल्या टोनमध्ये, कशा पद्धतीनं ऐकले गेले त्यावरच संवाद साधलाय की विसंवाद झालाय, हे ठरतं.
पहिली छाप आणि शब्दसंग्रहाचा प्रभाव
व्यवसायाच्या क्षेत्रात पहिल्या भेटीतले आपले संवाद कौशल्य हेच जिंकण्याचे किंवा हरण्याचे कारण असते. म्हणजे समजा, एका मिटींगमध्ये तुम्ही पहिल्या पाच मिनिटांत “असं, म्हणजे काय, ते... हं... बरं...” असा काहीसा संवाद साधलात, तर समोरच्याला काय वाटेल? त्याच्या मनातल्या मनात "हा फारच बाळबोध माणूस आहे" असं पक्कं ठरून जातं.
आणि हो, पहिल्या भेटीत चुकीचा शब्द उच्चारला की तुमचं तिथल्या तिथे नुकसान! उदाहरणार्थ, “It was nice knowing you” ऐवजी “It was nice meeting you” म्हणायला हवं, आणि तुम्ही पहिल्यांदाच भेटलेल्या व्यक्तीला पहिलं वाक्य बोललात, तर तिच्या डोक्यात विचार येईल, “अरेच्या! अजून पहिली भेटच आहे, आणि हा माझ्याशी कायमचं बाय-बाय करतोय का?”
मिसकॉम्युनिकेशन आणि नातेसंबंध
नातेसंबंधांमध्ये विसंवाद झाल्यावर गोष्टी ज्या थराला जातात, ते पाहून तर आम्हा समुपदेशकांना प्रॅक्टिसमध्ये चांगलाच प्रत्यय येतो!
मी एकदा एका जोडप्याचे समुपदेशन सेशन घेत होते. बायको म्हणते, “त्याने माझ्या मेसेजला ‘K’ असा रिप्लाय केला!" आणि नवरा विचारतो, “त्यात काय एवढं?”
बायकोचा चेहरा बघून नवऱ्याला कळलं, “K” म्हणजे “I don’t care,” “मी बघेन माझं,” आणि “आता बोलायचं नाहीये” अशा सगळ्या गोष्टींचं प्रतीक आहे! मात्र बिचाऱ्या नवऱ्याला आधी “K” हा “ओके”चा शॉर्टफॉर्मच वाटला!
काय परिस्थिती पाहा, शब्द कमी वापरले की विसंवाद होतो, आणि शब्द जास्त वापरले की संवाद संपतो. आहे ना फारच किचकट? पण थांबा, इथे मजा संपली नाही! आताच्या आपल्या या ईमोजींच्या जगात संवादाची गंमत (की जंमत!?) आणखीनच निराळी झाली आहे.
भावना व्यक्त करायच्या असतील तर एका वाक्याच्या ऐवजी आता लोक ईमोजी पाठवतात. “माझा संताप उफाळलाय!” या वाक्याऐवजी घुश्श्यात असलेला लाल बुंद ईमोजी जातो. किंवा, “मी खूप आनंदी आहे!” या ऐवजी हसून हसून पार डोळ्यातून अश्रू येत असलेला ईमोजी आणि “मी तुझ्यावर नाराज आहे” याऐवजी फक्त ‘seen’ असं काहीसं चित्र बनलं आहे ज्यामुळे संवादातल्या भावना मागे पडल्यात व नातेसंबंधात एक वेगळाच कोरडेपणा, तऱ्हेवाईकपणा आला आहे. एकेकाळी प्रेमपत्रं होती, आता ब्लू टिकमुळे प्रेमाचे वाद होतात. नजरेने कळणाऱ्या भावना आता autocorrect ने घोटाळा करून संपवल्यात...
मग उपाय काय? संवाद सुधारायचा कसा?
१️. मनापासून ऐका : संवाद हा केवळ बोलण्यात नसतो, ऐकण्यातही असतो. समोरच्याचं ऐकताना फक्त ऐकू नका, समजून घ्या.
२️. शब्द आणि टोन यावर विचार करा : "तुम्ही बऱ्याच दिवसांनी आलात!" हे प्रेमाने म्हटलं की आपलेपणाचं वाटतं, पण जर रोखठोक आवाजात म्हटलं, तर तिरस्कारासारखं वाटू शकतं.
३️. समोरच्याच्या मन:स्थितीचा विचार करा : प्रत्येक वेळी लगेच उत्तर द्यायची गरज नाही. कधी कधी संवाद म्हणजे फक्त दुसऱ्याला मोकळं होऊ देणंही असतं.
४️. सोशल मीडियावर जरा जपून : मेसेजमध्ये भावना स्पष्ट करण्यापेक्षा कधी फोन काॅल किंवा प्रत्यक्ष भेट उत्तम पर्याय ठरते.
५️. शब्द आणि देहबोली यांची सांगड घाला : बिनधास्त नजरेला नजर देऊन बोला, आत्मविश्वास ठेवा आणि तुमच्या हसण्याचा आवाज तुमच्या शब्दांइतकाच प्रभावी ठेवा!
शेवटी काय तर, संवाद म्हणजे नात्यांचा एक जोडरज्जूच होय. जणू दोन माणसांना जोडणारा एक पूल. आणि तोच चुकीचा बांधला गेला की ते नातं तुटतं! त्यामुळे आता तुम्हीच ठरवा, आपण संवाद साधायचा, की विसंवाद वाढवायचा?
संवादाची दारं उघडा, ‘ध’ चा ‘मा’ करू नक...
- मानसी कोपरे, मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा, ७८२१९३४८९४