परिस्थिती आली तशी स्वीकारून, एकमेकांना त्याचे अपराधीपण न देता आणि मुख्य म्हणजे लोकांचा विचार न करता कसा तोडगा निघू शकतो यावर अगदी उत्तमप्रकारे भाष्य करणारा हा लघुपट आहे.
शाळेत असताना नागरिकशास्त्र किंवा सामान्यज्ञान पैकी कोणत्यातरी विषयात शिकलेली एक गोष्ट लक्षात आहे - जपानमध्ये तरुण लोकांच्या तुलनेत वृद्ध लोकांची संख्या जास्त आहे तर आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे. याचा देशावर, देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा आणि काय परिणाम होतो याचा ऊहापोह करणारा पुढचा परिच्छेद असावा. त्यात फारसा रस नसल्यामुळे आता आठवत नाही. हल्लीच वाचले की २०५० सालापर्यंत आपल्या देशातही अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे. आपल्या आजूबाजूला बघितले, तर आपल्यालाही सहज दिसून येईल अशीच ही गोष्ट आहे. वयस्कर माणसे आणि त्यांच्या समस्या यावर एक फेसबुक ग्रुप आहे. त्यात बऱ्याचदा ६० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेली मुलगी किंवा मुलगा आपल्या वयोवृद्ध आईची काळजी घेताना काय अडचणी येतात ते लिहित असतात, आपले मन मोकळे करत असतात. म्हणजे, दोन सिनिअर सिटीझन्स एकत्र राहताना एक सिनिअर सिटीझन दुसऱ्याची देखभाल करतो आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने अनेक सोयी, सुविधाही शहरांमध्ये उपलब्ध होत असतात. यामध्ये वृद्धांसाठी डे केयर सेंटर्स, अतिशय चांगल्या प्रकारची, सर्व सोयींनी सज्ज असलेली वृद्धाश्रमे तर आहेच पण त्याचबरोबर घरकामाला मिळणारी मदत, वृद्धांची काळजी घ्यायला विशेष प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती; निवडून, चिरून दिलेली भाजी, वेळच्या वेळी पोहचवलेला तयार, वृद्धांना पचेल असा डबा, त्यांना संध्याकाळी फिरताना सोबत व्हावी म्हणून माणसे... इतकेच काय? मी हल्लीच त्यावर एका तरुण मुलाची पोस्ट पाहिली की ज्या आजीआजोबांना घरातून बाहेर पडणे शक्य नसते, त्यांच्यासाठी दुपारी काही तास वेळ काढून त्यांच्याशी गप्पा मारण्याची, पत्ते किंवा तसेच बैठे खेळ खेळण्याची त्याची इच्छा आहे आणि ही सेवा तो विनामूल्य देऊ इच्छितो! हे सगळे नियमित वाचून वाटते, की खरेच येत्या काही वर्षांत या प्रकारच्या सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत कारण त्यांची आवश्यकताच असणार आहे.
दोन किंवा तीन सिनिअर सिटीझन्स एकाच घरात ही एक समस्या, तर घरात तरुण मुले असूनही ती त्यांच्या नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात असणे ही आणखी एक समस्या. इथे कुणीच एक चूक किंवा बरोबर असू शकत नाही. परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेली ही माणसे असतात. आईबाबांना किंवा दोघांपैकी एकाला मुलाच्या किंवा मुलीच्या शहरात स्थलांतरित होणे नको असते. त्यांचेही बरोबरच आहे. आईबाबांना वाऱ्यावर सोडणे पटत नसतानाही आयुष्याची उमेदीची वर्षे असताना नोकरीची उत्तम संधी सोडण्याची अपेक्षा मुलांकडूनही करणे चूकच ना? खरेतर या विषयावर अनेक मतमतांतरे असू शकतात, परिसंवाद घडू शकतात; पण यातून मार्ग काढायचा असल्यास दोन्हीबाजूंनी आपापल्या परीने सुवर्णमध्य गाठणे हा एकच पर्याय दिसतो. आता हा सुवर्णमध्य म्हणजे काही एक ठराविक आखून दिलेला नियम नव्हे. प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार तो बदलत असतो, बदलू शकतो.
वृद्धांसाठी असणाऱ्या सेवांचा लाभ घेणे हा असाच एक सुवर्णमध्य ‘२०२५ केयर विथ लव्ह’ हा लघुपट बघताना जाणवला. बऱ्याचदा आपण एखाद्या माणसाबद्दल किंवा घटनेबद्दल पटकन मत तयार करून टाकतो. वरवर विचार करून प्रकट झालेले हे मत असते. आपण त्याबद्दल सखोल विचार केला तरीही हे तयार झालेले मत आपण पटकन बदलतही नाही. या लघुपटातली आई आजारी पडते तेव्हा मी असेच मत तयार केले की तिने आता हट्ट सोडून मुलाकडे जायला हवे. ती यायला तयार नसेल, तर मुलाने तरी आता सर्व सोडून तिच्याकडे यायला हवे. मुलगा म्हणून त्याची ती जबाबदारीच आहे वगैरे भावनिक गोष्टीही मनात येऊन गेल्या. पण चूक बरोबर, काळे पांढरे याच्या मध्येच खरे आयुष्य असते असे अनेक वेळा अनेक ठिकाणी वाचून, काहीवेळा प्रत्यक्ष अनुभव घेऊनसुद्धा अशावेळी आपले मन एकाच दिशेने विचार करते. असे लघुपट मग आपल्याला आपल्या विचारांची दिशा बदलायला मदत करतात. मी सांगितलेल्या या प्रसंगात दोघांपैकी एकाला जुळवून घ्यायचेच असते, त्याग करायचाच असतो. खरेतर समाजात आपल्याबद्दल चांगले बोलले जावे, लोकांनी नावे ठेवू नयेत म्हणूनही आपण बरेच निर्णय घेत असतो. अगदी हीच परिस्थिती बघितली, तर मुलगा सगळे सोडून परत आल्यावर तिऱ्हाईत व्यक्ती त्याचे कौतुक करेलच किंवा आई या वयात आपले गाव, घर सोडून मुलगा राहतो त्या परक्या देशात गेली तर तिचेही कौतुक होईलच पण शेवटी ती त्यांची तडजोडच असेल ना? मग दोघांपैकी एकानेच अशी तडजोड करण्यापेक्षा जर दोघांनी थोडी थोडी तडजोड केली तर?
या लघुपटात तेच सुचवले आहे. परिस्थिती आली तशी स्वीकारून, एकमेकांना त्याचे अपराधीपण न देता आणि मुख्य म्हणजे लोकांचा विचार न करता कसा तोडगा निघू शकतो यावर अगदी उत्तमप्रकारे भाष्य करणारा हा लघुपट आहे. अर्थात यात दाखवले आहे तसे सहजासहजी काही प्रत्यक्ष आयुष्यात होईलच असे नाही. एखादी मदत किंवा सेवा उपलब्ध असणे आणि आपल्याला ती मिळणे यात बरेच अंतर असते. काही अनुभव गाठीशी पडतात, त्रास होतो, पैसे खर्च होतात. पण ती ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ आहे असे म्हणून या लघुपटात जे पाऊल उचलण्याविषयी सांगितले आहे त्याबद्दल येत्या काही काळात आजच्या दोन्ही किंवा खरेतर तिन्ही पिढ्यांना विचार करावा लागणार आहे इतके मात्र नक्की...
- मुग्धा मणेरीकर, फोंडा