आपली सखी यावी म्हणून तिच्यासाठी प्रेमाचे हे आर्जव करताना त्या प्रियकराच्या मनाची तगमग बाबूजींच्या स्वरांत पुरेपूर उतरली आहे आणि म्हणूनच हे गाणे ऐकताना त्यांचे हे आर्त सूर थेट हृदयाला भिडतात!....
सखी म्हणजे मैत्रीण... आपल्या जीवनातील अनेक घटनांची साक्षीदार असलेली आपली जिवाभावाची मैत्रीण! जिच्यासोबत आपल्या जीवनातील अनेक क्षण अनमोल होऊन जातात, अशी सखी ही सोबत असताना, तिच्यासमवेत क्षण कसे भुर्रकन उडून जातात. पण जेव्हा ही सखी आपल्यापासून लांब असते, तेव्हा ती कधी परतून येईल, याची प्रतीक्षा करत असताना ती येण्यासाठी तिची विनवणी करताना मनाची होणारी तगमग ही मनाला व्याकूळ करून जाते...
सखी मंद झाल्या तारका
आता तरी येशील का ?
गीतकार सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या या गीतात ही व्याकुळता आपल्याला स्पष्ट जाणवते... संगीतकार राम फाटक यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांनी हे गीत आपल्या आर्त स्वरांत असे काही गायले आहे की, या गीतातील प्रियकराच्या मनाची व्यथा त्यांच्या आवाजात अगदी पुरेपूर जाणवते. त्यांच्या शांत स्वरात हे गाणे ऐकताना भावनांचे कित्येक उमाळे त्यांच्या मृदू कोमल स्वरात जाणवल्याशिवाय रहात नाही. शांत वातावरणात बसून बाबूजींच्या आवाजातील हे गाणे ऐकताना बाबूजी संवादिनीवर हे गाणे म्हणताना आपल्या विशिष्ट अशा खास शैलीत एक हात वर करून तान घेत आहेत, असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते.
गीतकार सुधीर मोघे यांनी लिहिलेले हे गाणे ‘सुधीरमय’ आहे, असे म्हटले तर तुम्हाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण या गाण्याचे गीतकार सुधीर मोघे, गायक बाबूजी अर्थात सुधीर फडके, या गाण्यासाठी सुमधुर बासुरीचे सुर दिले ते बासरीवादक सुधीर खांडेकर आणि या गाण्यासाठी तबल्याचा ठेका धरला, ते सुधीर रानडे... त्यामुळे हे गाणे संगीतातील दिग्गज कलाकारांच्या साथीने ‘सुधीरमय’ होऊन गेले आहे !..
सखीची वाट पाहत तिला येण्याची विनवणी करणारा गाण्यातील हा प्रियकर तिला म्हणत आहे की, हे सखी, रात्रभर तुझ्या येण्याची वाट पाहत तुझ्या सहवासाची मधुर स्वप्ने रंगवत थांबलेलो असताना आता रात्र ही सरत आलेली असून आकाशातील तारकाही मंद होत आल्या आहेत. तुझ्या गोड आठवणीत जागताना तुझ्या प्रतीक्षेत ही रात्र कशी सरली त्याचे भान उरले नाही... आता तर रात्रीचा अंतिम प्रहर राहिला आहे. आता तरी तू येशील का? रात्रभर तुझी वाट पाहताना तुझ्याशिवाय ही रात्र जशी सुनी आली, तशीच ती सुनी सुनी गेली... सखी, ही रात्र तर आता सरत आली आहे आणि रात्र संपण्याच्या अवस्थेत उरलेल्या या रात्रीच्या अंतिम प्रहराला जर तू आलीस, तर तुझ्या येण्याने मनाला नक्कीच हर्ष होईल... आता तरी येशील का? हे गोड आर्जव करताना हा प्रियकर म्हणतो,
मधुरात्र मंथर देखणी
आली तशी गेली सुनी
हा प्रहार अंतिम राहिला
त्या अर्थ तू देशील का?
मनाचा ठाव घेणारे हे शब्द जेव्हा सुधीर फडके आपल्या आर्त स्वरात आळवतात, तेव्हा त्या गीतातील भावना त्यांच्या स्वरात अगदी नकळत उमटतात. आणि हे गाणे ऐकताना आपल्याला ते खास जाणवतातही!
हृदयात आहे प्रीत अन
ओठांत आहे गीत ही
ते प्रेमगाणे छेडणारा
सूर तू होशील का ?....
या कडव्यातील ‘ते प्रेमगाणे छेडणारा...’ ही ओळ म्हणताना ‘छेडणारा’ या शब्दात ‘रा’ हा शब्द म्हणताना सुधीर फडके यांचा आवाज काहीसा कापरा झालेला जाणवतो. आपली सखी यावी म्हणून तिच्यासाठी प्रेमाचे हे आर्जव करताना त्या प्रियकराच्या मनाची तगमग बाबूजींच्या स्वरांत पुरेपूर उतरली आहे आणि म्हणूनच हे गाणे ऐकताना त्यांचे हे आर्त सूर थेट हृदयाला भिडतात!
जे जे हवेसे जिवनी
ते सर्व आहे लाभले
तरीही उरे काही उणे
तू पूर्तता होशील का ?
जीवनात भौतिक सुखे सर्व प्राप्त झाली तरी सखीच्या कमतरतेमुळे हृदयाच्या एका कोपर्यात रितेपण जाणवत आहे. सर्व सुखे हात जोडून समोर उभी असली तरी ज्याची ओढ मनातून लागली आहे, ते जर प्राप्त झाले नाही, तर त्याची सल, ती खंत मनाला कुरतडत राहते आणि ही कमी पूर्ण करण्यासाठी या सखीचा प्रियकर तिला अगदी प्रेमाने आर्जव करत आहे. आणि हे आर्जव जेव्हा आपण बाबूजींच्या मधुर स्वरात ऐकतो, तेव्हा त्या प्रियकराच्या मनातील स्पंदने आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही.
सखीच्या प्रतीक्षेत राहिलेला हा प्रियकर आपल्या सखीच्या येण्याची वाट पाहत आहे. रात्रीचा अंतिम प्रहर सुरू झालेला असला आणि आकाशातील तारकांचा प्रकाशही मंद झाला असला, तरीही आपली सखी ही आपल्याला भेटायला नक्की येईल, अशी आशा सख्याला वाटत आहे. तिची वाट बघत हा उभा जन्म गेला आणि अचानक मृत्यूचे बोलावणे जरी आले, तरी त्याला थोपवून ठेवण्याची तयारी या सख्याची आहे. कारण सखी जर येणार असेल, तर हा अवचित आलेला मृत्यूही काही क्षणासाठी निश्चित थांबेल अशी खात्री या प्रियकराला वाटते कारण सखीच्या प्रतीक्षेत जीव किती तळमळला आहे, हे त्या मृत्यूलाही माहीत असेल अशी खात्री त्याला आहे... आणि हे सर्व आपल्या गीतात लिहिताना सुधीर मोघे आपल्या या गीतातील शेवटच्या कडव्यात लिहितात.
बोलावल्यावाचूनही
मृत्यू जारी आला इथे
थांबेल तो ही पळभरी
पण सांग तू येशील का?
या गाण्याचे बोल बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांच्या अत्यंत मृदू आणि काहीशा कातर स्वरात ऐकताना त्या गीतातील व्याकुळता आपल्याला ही भावविवश करून जाते...
कविता आमोणकर