योनी स्त्राव हा आपल्या शरीरातून द्रव आणि जुन्या पेशी काढून टाकण्याचा एक निरोगी मार्ग आहे. पण कधीकधी ते एखाद्या गंभीर गोष्टीचे लक्षणही असू शकते.
महिलांनो, अगदी काही दिवसांच्या वापरानंतर पॅन्टीचा रंग मधोमध फिका पडलेला आपण कधी ना कधी बघितलाच असेल. पण लाज म्हणून दर वेळी फिकी पडलेली पॅन्टी फेकून देता का?? अनेक महिलांना वाटतं की हे कपडा चांगला नसल्यामुळे किंवा तो बरोबर धुतला न गेल्यामुळे घडत असेल पण जाणून घ्या की ही एक सामान्य गोष्ट आहे. बदललेला रंग योनी स्त्रावामुळे घडत असून निरोगी योनीचे लक्षण आहे. योनी स्त्राव हा आपल्या शरीरातून द्रव आणि जुन्या पेशी काढून टाकण्याचा एक निरोगी मार्ग आहे. पण कधीकधी ते एखाद्या गंभीर गोष्टीचे लक्षणही असू शकते. या विषयाबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.
निरोगी योनीचे नैसर्गिक पीएच मूल्य ३.८ आणि ४. ५ दरम्यान असते. योनीमध्ये लैक्टोबॅसिलाय नावाचे चांगले बॅक्टेरिया असतात, जे ऍसिडिक पातळी राखून खराब जीवाणूंचा संसर्ग पसरण्यापासून थांबवतात. म्हणजेच पॅन्टीचा रंग फिका पडण्याचा अर्थ योनी साफ आणि स्वच्छ असणे होतो.
पॅन्टी फिकी पडण्यामागे शारीरिक बदल, स्त्री-आरोग्याशी संबंधित समस्या, अपुरी स्वच्छता यासारखी कारणे असू शकतात.
शारीरिक प्रक्रिया आणि योनीचे स्राव
महिलांच्या शरीरात नैसर्गिकपणे काही स्राव तयार होतात. हे योनी स्राव शरीरातील हार्मोनल बदलांनुसार बदलू शकतात आणि पांढरे-पिवळे रंगाचे असू शकतात.
मासिक पाळीच्या आधीचा स्राव मासिक पाळीच्या आधी, हार्मोनल बदलांमुळे अधिक स्राव होऊ शकतो, जो पांढरट किंवा हलका पिवळा रंगाचा असतो.
ओव्युलेशन स्राव: या दरम्यान महिलांच्या स्रावाची मात्रा जास्त होऊ शकते. हा स्राव पांढरा, गुळगुळीत असतो.
मासिक पाळीचा स्राव: मासिक पाळीच्या दरम्यान रक्त आणि योनीतील स्राव एकत्र येऊन पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे डाग निर्माण करु शकतात.
गर्भाशय किंवा योनीचे इन्फेक्शन
बॅक्टेरियल व्हॅजायनोसिस : यामधे योनीतून पांढऱ्या, पिवळ्या किंवा गडद पिवळ्या रंगाचा स्राव होतो व गंधही येऊ शकतो.
यीस्ट इन्फेक्शन : यीस्ट इन्फेक्शनमुळे योनीतून पांढरट, घट्ट, पिठाच्या आकाराचा स्राव बाहेर पडू शकतो. यामुळे खाज सुटणे आणि जळजळ होऊ शकते.
सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स : गोनोरिया, क्लॅमिडिया यामुळे देखील योनीतून पिवळा किंवा हिरवट रंगाचा स्राव होऊ शकतो.
पॅन्टी, कपडे आणि स्वच्छता
सिंथेटिक फॅब्रिक्स किंवा टाईट पँटी यामुळे योनीभागात हवा खेळती राहत नाही. यामुळे घाम येऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास, विशेषत: मासिक पाळी दरम्यान, योनीतील इन्फेक्शन्स आणि स्रावामध्ये बदल होऊ शकतात. म्हणून वेळेत पॅन्टी बदलणे, योग्य स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.
हार्मोनल बदल
हार्मोनल बदल देखील योनीतील स्रावावर परिणाम करू शकतात. गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर, गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळातले हार्मोनल बदल, किंवा मेनोपॉजच्या जवळ असताना हार्मोनल बदलामुळे स्रावामध्ये बदल होऊ शकतो. यामुळे पांढरे-पिवळे डाग दिसू शकतात.
गर्भावस्थेतील बदल
गर्भधारणेच्या काळात हार्मोनल बदलांमुळे महिलांना पांढरे किंवा हलके पिवळे स्राव होऊ शकतात. गर्भधारणेच्या सुरुवातीला हे सामान्य असू शकते, पण स्रावात गंध, वेदना किंवा रक्तस्राव दिसला तर असामान्य असू शकते.
उपाय
स्वच्छता : नेहमी स्वच्छ आणि आरामदायक कपडे घाला. कॉटनचे कपडे वापरा, ज्यातून त्वचेला खेळती हवा लागते. पँटी रोज बदला, आवश्यक असल्यास गंधहीन-अल्कोहोल फ्री योनी वॉश वापरा. स्वच्छतेसाठी योनीच्या नैसर्गिक बॅलन्सला प्रभावित करू शकणारे अत्याधुनिक रासायनिक पदार्थ, डिओडोरंट्स किंवा सुगंधी उत्पादनांचा वापर टाळा. योनीस्त्राव जास्त होतं असल्यास पॅन्टी लाइनर्सचा वापर करा.
आहार आणि जीवनशैली : संतुलित आहार, योग्य पाणी पिणे आणि व्यायाम यामुळे शरीराचे हार्मोनल संतुलन राखता येते व स्रावाच्या प्रमाणावर प्रभाव पडू शकतो. स्त्रावासोबत वेदना, जळजळ किंवा वेगळा वास येत असल्यास तेव्हाच डॉक्टरांकडे जाऊन रक्तचाचणी, योनीची चाचणी किंवा अल्ट्रासोनोग्राफीसारख्या चाचण्यांद्वारे योग्य निदान करून घ्या.
हे लक्षात ठेवा की प्रत्येक महिला आणि तिचे शरीर वेगवेगळे असते, पण कुठल्याही प्रकारचा असामान्य स्त्राव किंवा शरीरातील बदलांबाबत सावध असणे महत्त्वाचे आहे. वेळोवेळी डॉक्टरांकडून सल्ला घेणे आणि नियमित तपासणी करणे आपल्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहे.
डॉ. श्वेता राऊत मुळगावकर