महिला आणि जास्त घाम येणे

महिलांमध्ये हार्मोनल बदल, वातावरण, ताण आणि शारीरिक कारणांमुळे जास्त घाम येऊ शकतो, ज्यामुळे शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होतात. यावर योग्य उपाय आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story: आरोग्य |
28th March, 11:46 pm
महिला आणि जास्त घाम येणे

एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापिका असलेल्या विद्याचा अगदी घड्याळ्याच्या काट्यावर ठरलेला दिनक्रम. अन् रोजच्या धावपळीच्या जीवनात एक मोठा अडथळा– घामाचा त्रास. सकाळी ऑफिसला जाताना, काम करताना आणि अगदी ऑफिसबाहेर पडतानादेखील तिला प्रचंड घाम येतो. यामुळे तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. ऑफिसमध्ये तिच्या सहकार्यांना देखील तिचा घाम जाणवत असल्याने तिचा आत्मविश्वास कमी होतो. घामाचा त्रास असल्यास आपणही कधी ना कधी अशाच स्थितीतून जातो अन् आपला आत्मविश्वास डगमगताना दिसतो.

खरं तर शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येणे आवश्यक असतो. पौगंडावस्थेतील मुली आणि मुलांना घाम येण्याचे प्रमाण सारखेच असते. पण एकदा हार्मोन्सचा खेळ सुरू झाला की, घाम येणे बदलू लागते आणि पुरुष व महिलांना वेगवेगळ्या कारणांमुळे जास्त घामाचा त्रास सतावू लागतो. जास्त घाम येणे ही समस्या वर वर जरी सामान्य दिसली तरी यामुळे पुरुषांपेक्षा महिलांना बऱ्याच प्रमाणात शारीरिक आणि मानसिक प्रकारे बाधा येऊ शकते. ही समस्या विशेषतः उष्णतेच्या वातावरणात, शारीरिक कष्ट करत असताना किंवा मानसिक तणावाच्या वेळी अधिक दिसून येते. दैनंदिन जीवनात जास्त घामाचा महिलांवर कसा परिणाम होतो यावर आपण आज बोलू.

जास्त घाम येण्याची कारणे

१. हॉर्मोनल बदल: महिलांच्या शरीरात विविध हॉर्मोनल बदल होतात. मासिक पाळी, गर्भावस्था आणि मेनोपॉझ यादरम्यान घडत असलेल्या हॉर्मोनल असंतुलनाच्या बदलांमुळे महिलांना घाम अधिक येऊ शकतो.

२. उष्णता आणि वातावरण: उष्ण वातावरण, जास्त तापमानाच्या जागी काम करणे आणि घाम न शोषणारे, घट्ट-तंग कपडे घालणे या कारणांमुळे महिलांना अधिक घाम येऊ शकतो. दिवसा घराबाहेर जास्त वेळ राहावे लागल्यामुळेही घामाचा त्रास वाढू शकतो.

३. शारीरिक व्यायाम: शारीरिक कष्टाची कामे करताना किंवा व्यायाम करताना घाम येणे सामान्य आहे. यादरम्यान हृदय गती आणि रक्ताभिसरण पातळी वाढल्यामुळे शरीराचे तापमान वाढते व ते नियंत्रित करण्यासाठी घाम येतो.

४. मानसिक ताणतणाव: मानसिक तणावाच्या स्थितीदरम्यान शरीराच्या प्रतिक्रियेचा एक नैसर्गिक भाग म्हणून घाम येतो. तणावाच्या प्रतिसादात अपोक्राइन ग्रंथी सक्रिय झाल्यामुळे तणावाच्या घामाचा वास तीव्र असू शकतो.

५. औषधे आणि इतर उपचार: काही औषधांच्या सेवनाने देखील साईड इफेक्ट म्हणून घाम वाढू शकतो. विशेषतः अँटी-डिप्रेसंट्स, रक्तदाब कमी करणारी औषधे आणि इतर काही औषधे याला कारणीभूत होऊ शकतात.

६. शारीरिक विकार: काही शारीरिक विकार, जसे थायरॉइडचे विकार, मधुमेह, रजोनिवृत्ती, काही संक्रमण यामुळे देखील घाम वाढू शकतो.

जास्त घाम येणे विविध लक्षणांना कारणीभूत ठरू शकते,

 शरीराच्या विशेष भागांवर (हात, पाय, काखेत) अधिक घाम येणे.

 त्वचेवर सतत ओलावा वाटणे.

 दीर्घकाळ घामामुळे त्वचेची जळजळ होणे, रॅशेस, पुरळ आणि बुरशीजन्य संसर्ग होणे.

 शरीराला दुर्गंधी येणे.

 तळवे किंवा हातांना घाम आल्याने लेखन, स्वयंपाकघर किंवा इतर दैनंदिन कामात अडथळा वाटणे.

 रात्रीच्या घामामुळे झोपेत व्यत्यय येणे व त्यामुळे दिवसा थकवा आणि अस्वस्थता येणे.

मानसिक त्रास: महिलांना सार्वजनिक ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये लाज वाटू शकते. त्यांना आत्मविश्वासाचा अभाव वाटू शकतो तसेच ताण निर्माण होऊ शकतो.

सामाजिक प्रतिबंध: महिलांना सामाजिक कार्यात भाग घेण्यात अडचणी येऊ शकतात. घामामुळे कपड्यांवर डाग किंवा वास आल्यामुळे सामाजिक जीवनाच्या गुणवत्तेवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो व आत्मसन्मान कमी होऊ शकतो. 

जास्त घामाच्या समस्येवर उपाय

१. योग्य आहार आणि पाणी पिणे: शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आणि मसालेदार, तिखट, आणि कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होईल आणि घाम कमी येईल.

२. स्वच्छतेची काळजी घेणे: घामामुळे त्वचेवर संक्रमण होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे स्वच्छतेवर अधिक लक्ष द्यावे. नियमितपणे स्नान करा. त्वचेला शुद्ध ठेवण्यासाठी उत्तम साबण आणि क्रीम वापरा. पाऊस आणि उष्णतेमध्ये जास्त घाम येत असल्यास, पावडर किंवा अँटी-पर्सपिरंट्स वापरणे फायदेशीर ठरू शकते.

३.योग आणि व्यायाम: नियमित योग, प्राणायाम, ध्यान आणि श्वासाच्या व्यायामामुळे तणाव कमी होतो आणि हार्मोनल बदलांचा परिणाम कमी होऊ शकतो. यामुळे शरीरातील तापमान नियंत्रण सुधारते. तसेच तणावामुळे येत असलेल्या घामाची समस्याही कमी होऊ शकते.

४. तज्ञांचा सल्ला घ्या: घामाची समस्या जास्त असल्यास डॉक्टर, त्वचारोग किंवा हॉर्मोनल तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य निदान करून उपचार घेणे त्रासाला नियंत्रणात ठेवू शकते.

५. योग्य कपड्यांचा वापर: घाम शोषून घेणाऱ्या सूती आणि पातळ कपड्यांचा वापर घामाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर असतो. यामुळे शरीराला हवा लागते आणि घाम कमी होतो.

६. अँटी-पर्सपिरंट्सचा वापर: अँटी-पर्सपिरंट्स शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामाचे प्रमाण कमी करतात. रात्री झोपताना या अँटी-पर्सपिरंट्सचा वापर केल्यास ते रात्री घाम कमी तयार करण्यास मदत करतात.

७. शस्त्रक्रिया आणि उपचार: अत्याधिक घामाच्या प्रकरणात डॉक्टर काही विशेष उपचार, जसे की बोटॉक्स इंजेक्शन्स, आयोनोफोरेसिस (विद्युत सद्य असलेले उपचार), किंवा शस्त्रक्रिया सुचवू शकतात, ज्यामुळे घाम नियंत्रित होऊ शकतो.

महिलांमधील जास्त घाम येण्याची समस्या जरी सामान्य असली तरी अत्यंत अस्वस्थ करणारी ठरू शकते. यावर योग्य वेळी उपाय आणि उपचार घेतल्यास महिलांना त्यातून आराम मिळू शकतो आणि जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते.


- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर