जिवलगा राहिले रे दूर घर माझे...

शांता शेळके यांच्या शब्दांना आशा भोसले यांच्या सुरांची आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताची जादू लाभली, तेव्हा 'जिवलगा' सारखे काळजाला भेदणारे गाणे साकारले. या गाण्यातील वेदना आणि एकाकीपणाचा अनुभव लेखकाने प्रभावीपणे मांडला आहे.

Story: शब्दगीते |
28th March, 11:41 pm
जिवलगा राहिले रे दूर घर माझे...

आपल्या जादूई स्वरांत गायिका आशा भोसले यांनी काही गाण्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. ही गाणी कितीदाही ऐकली तरी मन भरत नाही. एकदा गाणे ऐकल्यावर तेच गाणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. अशा गाण्यांपैकी एक गाणे म्हणजे गीतकार शांता शेळके यांनी आपल्या खास शैलीत लिहिलेले ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे...’

या गाण्याच्या सुरुवातीलाच तंबोर्‍यावरील सुरांवर ‘जिवलगाsss’ हा आलाप घेताना आशाताईंनी या गाण्याच्या,  

राहिले रे दूर घर माझे

पाऊल थकले

माथ्यावरचे जड झाले ओझे

या ओळी गाताना पुढे जो जिवलगाsss...  असा जो आलाप घेतला आहे, तो आलाप अक्षरश: काळीज चिरत जातो. गीतकार शांता शेळके यांनी या गीतात ज्या स्त्रीची वेदना व्यक्त केली आहे, त्या स्त्रीची वेदना आशाताई यांनी हे गीत ऐकणार्‍यांच्या काळजापर्यंत नक्कीच पोहचवली! हा आलाप ऐकताना ‘जिवलगाsss’ या एका शब्दात किती गहिर्‍या भावना ओथंबून राहिल्या आहेत, याचा अंदाज आल्याशिवाय रहात नाही आणि या गीतातील उदासीनतेचा रंग अधिकच गहिरा होत जातो.

या गाण्यातील सुरुवातीच्या आलापाने ध्रुवपदाच्या ओळीनंतर हे गाणे पुढे तसेच पुढील अंतर्‍यात सरकत जाते. त्यामुळे गायिकेला ध्रुपदातून अंतर्‍यात घेतल्यावर श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही. परंतु आशा भोसले या अत्यंत ताकदीच्या गायिका! त्यांनी हे आव्हान किती सहजरीत्या पेलले आहे आणि त्यांच्या सुरांत किती ताकद आहे हे आपल्याला हे गाणे ऐकताना उमगून येते.

कोणत्याही वाद्यांचा फापटपसारा न वापरता केवळ तंबोरा आणि तबला यांच्या सुरांच्या साथीला पुरिया धनश्री रागात आशा भोसले यांच्या स्वर्गीय आवाजाची सांगड घालताना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी या गाण्याला प्रत्येक शब्दागणिक अतिशय वेगळ्या उंचीवर नेले आहे. 

किर्र बोलते घन वनराई

सांज सभोती दाटूनी येई

सुख सुमनांची सरली माया

पाचोळा वाजे...

जीवनात एकाकी पडलेली स्त्री आपल्या जीवनातील संकटांचे ओझे पेलायला असमर्थ झाली, तेव्हा तिने हे ओझे आपल्या माथ्यावर घेतले आणि हे ओझे घेऊन संकटांनी भरलेल्या जीवनाच्या पदपथावर एकटीने मार्गक्रमणा करताना तिला तिच्या जीवलगाची आठवण अतिशय तीव्रतेने येत आहे. जीवनाच्या संध्याकाळी ही बिकट वाटचाल चालू असताना तिच्या जीवनातील सुखाचे क्षण हे केव्हाच मागे पडले आहेत आणि आता या शुष्क जीवनात फक्त सुकलेला पाचोळा म्हणजेच निव्वळ दु:ख उरलेले आहे. या सर्व भावना गीतकार शांता शेळके यांनी अतिशय थोडक्या शब्दांत अगदी प्रभावीपणे मांडल्या आहेत. गाव मागचा मागे पडलापायतळी पथ तिमिरी बुडलाही घटकेची सुटे सराईमिटले दरवाजे

असताना तिच्या जीवनातील सुखाचे क्षण हे केव्हाच मागे पडले आहेत आणि आता या शुष्क जीवनात फक्त सुकलेला पाचोळा म्हणजेच निव्वळ दु:ख उरलेले आहे. या सर्व भावना गीतकार शांता शेळके यांनी अतिशय थोडक्या शब्दांत अगदी प्रभावीपणे मांडल्या आहेत.

 गाव मागचा मागे पडला

पायतळी पथ तिमिरी बुडला

ही घटकेची सुटे सराई

मिटले दरवाजे 

माथ्यावरचे जड झालेले दु:खाचे ओझे सांभाळत एकटीने मार्गक्रमण करत असताना गाव कधी मागे पडला, हे तिला जराही कळाले नाही. आता तर तिमिर म्हणजेच अंधार दाटून आलाय. इथे तिमिर हा फक्त अंधार, काळोख नव्हे तर जीवनातील अंधार तर नाही ना?  गीतकार शांता शेळके यांना बहुतेक हेच सुचवायचे असेल, की दिवसाची तिमिर छाया जशी गहरी होत चालली आहे, तशीच जीवनात व्यापून राहिलेल्या या दु:खाच्या अंधाराची छाया ही गडद होत चालली आहे त्यामुळे समोरचा रस्ता अंधुक झाल्याने तो ही काळोखात बुडाला आणि समोरचा रस्ता ही दिसेनासा झाला आहे ...

‘ही घटकेची सुटे सराई’ सराई म्हणजे विश्रांतीस्थळ. जीवनात क्षणभर लाभलेली विश्रांती म्हणजेच सुखाचे क्षण. आता  हे ही आता कायमचे संपून गेले आहेत. जिथून हे सुखाचे क्षण येण्याचे मार्ग होते, त्याचे दरवाजे हे कायमचेच मिटून गेले आहेत....

निराधार मी मी वनवासी

घेशील केव्हा मज हृदयासी

तूच एकला तूच एकला 

नाथ अनाथा

महिमा तव गाजे 

डोक्यावर असलेले  दु:खाचे ओझे सांभाळत जीवनात आलेल्या निराशेच्या अंधारात जीवनात समोरचा रस्ताही पुढे दिसत नाही. आशा स्थितीत आपण किती निराधार आहोत, याची जाणीव तिला होत आहे आणि अशा वेळी तिला आपल्या जिवलगाची आठवण येणे स्वाभाविकच आहे. तिला आता फक्त आपल्या जिवलग सख्याचीच आशा आहे, की दु:खाच्या या खाईत पडल्यावर निराधार अवस्थेत असताना आपला जिवलग कधी येऊन आपल्याला हृदयाशी धरेल, याची तळमळ तिच्या जीवाला लागून राहिली आहे. कारण आता या क्षणाला केवळ आपल्या जीवलग सख्यावरच तिला भरवसा आहे आणि गाण्यातील शेवटच्या ओळीत ती आपल्या जिवलगाला अतिशय आर्त स्वरांत साद घालते.  आशाताई यांनी ही साद इतक्या अप्रतिम घातली आहे, की ही साद ऐकताना काळजात चरे पडतात!


- कविता आमोणकर