एमसीएल सुपरस्टार्स संघाचा पराभव : सुनिता वेर्लेकर फाउंडेशनतर्फे स्पर्धेचे आयोजन
पणजी : पीजीएमएल किंग्ज संघाने एमसीएल सुपरस्टार्स संघाचा अटीतटीच्या लढतीत ३ गडी आणि ५ चेंडू राखून पराभव करत ‘रमाकांत वेर्लेकर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५’ जिंकली. मडगावस्थित मडगाव क्रिकेट क्लबच्या डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर हा सामना विद्युत प्रकाशझोतात झाला.
सुनिता वेर्लेकर फाउंडेशनने या सामन्याचे आयोजन केले होते. यंदा या चॅम्पियन्स ट्रॉफीचे पाचवे वर्ष होते. पणजी जिमखाना आयोजित पणजी जिमखाना मेंबर्स लीगमधील दिग्गज खेळाडू पीजीएमएल किंग्ज संघात होते, तर मडगाव क्रिकेट क्लब आयोजित मेंबर्स क्रिकेट लीगमधील आघाडीचे खेळाडू एमसीएल सुपरस्टार्स संघात होते.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एमसीएल सुपरस्टार्सने २० षटकांत ९ बाद १४७ धावा केल्या. त्यांच्या सिद्धेश प्रभू अळवेकरने सर्वाधिक नाबाद ४० धावा जमवल्या. कर्णधार आदित्य आंगलेने २५ आणि अमोद बोरकरने २३ धावा केल्या. पीजीएमएल संघाकडून अजिंक्य कुडतरकर, रामनाथ गावकर आणि सैफ अली कराजगी यांनी प्रत्येकी २ गडी तर हेरंब शंकर परब, ओम फडते आणि साजू नाईक यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
पीजीएमएल किंग्ज संघाने १९.१ षटकांत ७ गडी गमावून विजय साकार केला. एकवेळ त्यांचा संघ ३ बाद ११६ धावांवर होता. आघाडी फळीत वेदांत नाईकने २८ चेंडूंत ४० धावा केल्या. परंतु, रॉबिन डिसोझा (८) आणि सैफ (४३ धावा, ३४ चेंडू, २ चौकार, २ षटकार) यांना सिद्धार्थ घाणेकरने एकाच षटकात बाद करत रंगत निर्माण केली. यानंतर सिद्धेश अळवेकरने किंग्जचा कर्णधार मुख्तियार काद्री (७) आणि रामनाथ गावकर (०) यांची विकेट घेतली. हर्षद गडेकरने दबावाखाली नाबाद २२ धावा करत पीजीएमएल किंग्जला विजय मिळवून दिला.
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कार
सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार रामनाथ गावकर याला मिळाला. 'इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द गेम' हा पुरस्कार बाळकृष्ण होडारकरला देण्यात आला. सर्वोत्तम गोलंदाज पुरस्कारासाठी सिद्धार्थ घाणेकरची निवड झाली. सर्वोत्तम फलंदाज पुरस्कार सिद्धेश अळवेकर याने पटकावला, तर सैफ अली कराजगी हा सामनावीर ठरला.
बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी क्रिकेटपटू, टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि सध्या यूएई संघाचे प्रशिक्षक असलेले लालचंद राजपूत उपस्थित होते. याव्यतिरिक्त एमसीसी अध्यक्ष योगेश नाईक, कपिल आंगले आणि सुनिता वेर्लेकर फाउंडेशनचे विश्वस्त गौतम वेर्लेकर उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.