घरच्या मैदानावर सीएसके अपयशी

आरसीबीचा सफाईदार विजय : सांघिक कामगिरीच्या जोरावर ५० धावांनी मात

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
29th March, 12:19 am
घरच्या मैदानावर सीएसके अपयशी

चेन्नई : आयपीएलमध्ये घरच्या मैदानावर आतापर्यंत सरस कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स संघाला शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. टॉस गमावल्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या आरसीबीने १९६ धावा करून सीएसकेसमोर तगडे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान पार करताना चेन्नईच्या फलंदाजांनी हाराकिरी केली आणि ५० धावांनी पराभव पत्करला. प्रदीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर आरसीबीने सीएसकेला घरच्या मैदानावर मात देण्यात यश मिळविले.
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली. ५ षटकांत ४५ धावांची भागिदारी करून सॉल्ट नूर अहमदच्या गोलंदाजीवर धोनीकरवी यष्टिचित झाला. त्यानंतर संघाच्या ७६ धावा झाल्या असताना देवदत्त पडिक्कल १७ झेंडूंत झटपट २७ धावा करून अश्विनच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन परतला. लियाम लिविंगस्टन याही सामन्यात प्रभाव दाखवू शकला नाही. त्याला नूर अहमदने १० धावांवर त्रिफळाचित केले. त्यानंतर कप्तान रजत पाटीदारने सूत्रे हाती घेत फटकेबाजी केली. मात्र जितेश शर्माने १२ धावांवर खलिल अहमदच्या गोलंदाजीवर रवींद्र जाडेजाकडे झेल दिला. पाटीदारने ३४ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. त्याला पथिरानाने सॅम करनकरवी झेलबाद केले. त्याच्या पाठोपाठ कृणाल पांड्याही पथिरानाच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र टीम डेव्हिडने फटकेबाजी करत ८ चेंडूंत ३ षटकार आणि एका चौकारासह २२ धावा केल्या आणि संघाला १९६ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
चेन्नईतर्फे नूर अहमदने पुन्हा एकदा फिरकी​ची जादू दाखवत चार षटकांत ३६ धावा देऊन तीन विकेट घेतल्या. वेगवान गोलंदाज पथिरानाने दोन, तर खलिल अहमद आणि अश्विनने प्रत्येकी एक गडी​ बाद केला.
आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर राहुल त्रिपाठी पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने ५ धावा करून जोश हेझलवुडच्या गोलंदाजीवर सॉल्टच्या हाती झेल दिला. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड खाते न उघडताच हेझलवुडच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन परतला. दीपक हुडा विशेष चमक न दाखवता केवळ ४ धावा करून भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक जितेश शर्माकरवी झेलबाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या ३ बाद ५२ अशी असताना फलंदाजीसाठी आलेल्या आणि मोठ्या अपेक्षा असलेला सॅम करन केवळ ८ धावा करून लिव्हिंगस्टनच्या गोलंदाजीवर कृणाल पांड्याकरवी झेलबाद झाला. एका बाजूने सलामीवीर रचिन रवींद्र किल्ला लढवत होता. मात्र दुसऱ्या बाजूने गडी बाद होत होते. इम्पॅक्ट बॅट्समन म्हणून आलेल्या शिवम दुबेने एक षटकार आणि दोन चौकार मारून आश्वासक सुरुवात केली. मात्र संघाच्या ७५ धावा झालेल्या असताना यश दयालने त्याला त्रिफळाचित करून चेन्नईला पाचवा धक्का दिला. रचिन रवींद्रने ३१ चेंडूंत पाच चौकारांसह ४१ धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ चांगल्या लयीत असलेला शिवम दुबे १९ धावांवर यश दयालच्या घातक चेंडूवर त्रिफळाचित झाला. रविचंद्रन अश्विनने ८ चेंडूंत एका चौकारासह ११ धावा केल्या आणि लिव्हिंगस्टनच्या गोलंदाजीवर सॉल्टकडे झेल देऊन बाद झाला. १६व्या षटकात ७ गडी गमावून चेन्नईचा संघ ९९ धावा करू शकला. इथेच संघाचा पराभव निश्चित झाला होता. जिंकण्यासाठी आवश्यक धावा काढणे अशक्यप्राय बनल्याने रवींद्र जाडेजा आणि महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकांत फलंदाजीचा सराव करत फटकेबाजी केली. २५ धावा करून जाडेजा हेझलवुडच्या गोलंदाजीवर सॉल्टच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर संथ सुरुवात केलेल्या धोनीने १६ चेंडूंत तीन चौकार व दोन षटकारांसह ३० धावा करून आपला फिटनेस आणि फॉर्म कायम असल्याचे सिद्ध केले. मात्र चेन्नईचा संघ २० षटकांत आठ बाद १४६ धावा करू शकल्याने बंगळुरूविरोधात ५० धावांनी हार पत्करावी लागली.
आरसीबीतर्फे जोश हेझलवुडने ३, यश दयाल आणि लियाम लिविंगस्टनने प्रत्येकी २, तर भुवनेश्वर कुमारने एक गडी बाद केला.

नूर अहमद पर्पल कॅपचा मानकरी

चेन्रईकडून खेळणारा अफगाणी फिरकीपटू नूर अहमदने आपल्या फिरकीची जादू दाखवून छाप सोडली आहे. ​पहिल्या सामन्यात ४ गडी बाद करणाऱ्या नूर अहमदने बंगळुरूचे तीन गडी बाद करून एकूण ७ विकेटसह गाेलंदाजांच्या क्रमवारी पहिला क्रमांक पटकावून पर्पल कॅप हस्तगत केली आहे. लखनौचा शार्दुल ठाकूर ६ गडी बाद करून दुसऱ्या, तर आरसीबीचाच जोश हेझलवुड ५ विकेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

चेपॉकचे चक्रव्यूह १७ वर्षांनी भेदण्यात यश

आरसीबीने आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये चेन्नईतील मैदानावर सीएसकेचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर एकाही सिझनमध्ये चेन्नईला घरच्या मैदानावर मात देण्यात आरसीबीला यश आले नव्हते. अखेरीस शुक्रवारच्या सामन्यात तब्बल १७ वर्षांनंतर आरसीबीने चेन्नईला चेपॉकवर नमवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

संक्षिप्त धावफलक
बंगळुरू : २० षटकांत ७ बाद धावा
चेन्नई : २० षटकांत ८ बाद १४६ धावा
सामनावीर : रजत पाटीदार