गोवा टेनिसला नवीन उंचीवर नेण्याचे उद्दिष्ट : स्पर्धेच्या दुसरी आवृत्तीचे ४ ते १३ एप्रिल दरम्यान आयोजन
पणजी : पणजी जिमखाना येथे ४ ते १३ एप्रिल दरम्यान ‘बांदोडकर पणजी जिमखाना टेनिस ओपन २०२५’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धेची दुसरी आवृत्ती असून, तिच्यासाठी नोंदणी सुरू झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यशस्वी पहिल्या आवृत्तीनंतर ही प्रतिष्ठित टेनिस स्पर्धेची दुसरी आवृत्ती पणजी जिमखाना येथे खेळवली जाणार आहे. राज्य टेनिस असोसिएशनचे विद्यमान सहकार्य लाभलेल्या या स्पर्धेचे उद्दिष्ट स्थानिक प्रतिभेला संधी देणे, स्पर्धात्मकता वाढवणे आणि राज्यातील टेनिसला नवीन उंचीवर नेणे आहे.
यंदाच्या आवृत्तीत तीन नवीन श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे स्पर्धा अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक होणार आहे.
१० वर्षांखालील मुला-मुलींचा गट : लहान वयोगटातील खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव मिळावा आणि त्यांचे कौशल्य विकसित होण्यासाठी ही नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे.
महिला दुहेरी : महिला खेळाडूंना अधिक संधी देण्यासाठी आणि स्पर्धेत त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी महिला दुहेरी ही नवीन श्रेणी जोडण्यात आली आहे.
व्हीलचेअर टेनिस : अपंग खेळाडूंनाही स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी व्हीलचेअर टेनिस हा विशेष गट तयार करण्यात आला आहे. हा स्पर्धेतील एक आमंत्रित गट असून, राज्यात अशा प्रकारची स्पर्धा होण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे.
गेल्या काही वर्षांत गोव्यात टेनिसची वाढती लोकप्रियता खरोखरच प्रेरणादायी आहे. नवीन श्रेणींचा समावेश करून, आम्ही लहान मुले, महिला आणि दिव्यांग खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्याची तसेच स्पर्धात्मक टेनिसचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत, असे दिवंगत दयानंद बांदोडकर
यांचे नातू आणि जीएसटीए अध्यक्ष समीर काकोडकर यांनी सांगितले.
ही स्पर्धा केवळ विजय मिळवण्यासाठी नाही, तर खेळाडूंना स्वतःला आव्हान देण्याची, नव्याने शिकण्याची आणि त्यांच्या खेळात प्रगती करण्याची संधी देण्यासाठी आहे. यंदा समाविष्ट केलेल्या नवीन श्रेणी स्पर्धेला अधिक खास बनवतात, कारण त्या विविध वयोगटांतील आणि क्षमतांतील खेळाडूंना आपली
प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात, असे स्पर्धेचे संचालक दीपक नाहक यांनी स्पर्धेच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले.
खेळाडू https://www.bandodkarpgopen.com/register-२०२५ वर ऑनलाइन नोंदणी करू शकतात किंवा संतोष (९९२३६६६९२०) किंवा दीपक (८०७६०४८४०८) यांंच्याशी संपर्क साधावा.
ज्युनियर, अनुभवीं खेळाडूंसाठी विविध श्रेणी
या स्पर्धेत ज्युनियर आणि अनुभवी खेळाडूंसाठी विविध श्रेणी उपलब्ध आहेत. मास्टर्स श्रेणींमध्ये मास्टर्स एकेरी ४५+, मास्टर्स एकेरी ५५+, मास्टर्स दुहेरी ४५+ (किमान वय ४५) आणि मास्टर्स दुहेरी ५५+ (किमान वय ५५) यांचा समावेश आहे. खुल्या श्रेणीमध्ये १० वर्षांखालील, १४ वर्षांखालील आणि १८ वर्षांखालील (मुले आणि मुली), पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी असे प्रकार आहेत. सहभागी जास्तीत जास्त तीन स्पर्धांसाठी नोंदणी करू शकतात.
आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद जबरदस्त आहे आणि तो गोव्यात टेनिसमधील वाढती आवड दर्शवितो. आम्हाला आशा आहे की, हा कार्यक्रम इच्छुक खेळाडूंना प्रेरणा देत राहील आणि राज्यातील स्पर्धात्मक दर्जा उंचावेल. - गिरीराज वेंगुर्लेकर, डीबी बांदोडकर अँड सन्स ग्रुपचे संचालक