दिल्ली कॅपिटल्सचा १ गडी, ३ चेंडू राखून सनसनाटी विजय
विशाखापट्टणम : सोमवारी (२४ मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा १ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीच्या आशुतोष शर्माने ३१ चेंडूत नाबाद ६६ धावांची खेळी करून विजय अक्षरश: खेचून आणला. या खेळी दरम्यान त्याने ५ चौकार आणि ५ षटकार खेचले.
विशाखापट्टणममध्ये खेळविण्यात आलेल्या या सामन्यात लखनौने दिल्लीसमोर २१० धावांचे लक्ष्य ठेवले होते.या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीकडून सलामीला उतरलेल्या एडेन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी आक्रमक सुरुवात केली. विशेषत: मार्शने जोरदार फटके खेळले. पण मार्करमला पहिला सामना खेळणाऱ्या विपराज निगमने मिचेल स्टार्कच्या हातून १५ धावांवर बाद केले.
पण त्यानंतर मार्श आणि पुरन यांचे वादळ घोंगावले. या दोघांनीही दिल्लीच्या गोलंदाजांना लय मिळवू दिली नाही. आक्रमक फटकेबाजी करत २१ चेंडूच मार्शने अर्धशतक झळकावले. त्यानंतरही दोघे आक्रमक खेळत होते.
अखेर १२ व्या षटकात मार्शला मुकेश कुमारने ट्रिस्टन स्टब्सच्या हातून झेलबाद केले. मार्शने ३६ चेंडूत ७२ घावांची खेळी केली. यात ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. त्याच्यात आणि पुरनमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या ४२ चेंडूत ८७ धावांची भागीदारी झाली.
मार्श बाद झाल्यानंतर कर्णधार रिषभ पंतही शून्यावर परतला. त्याला कुलदीप यादवने फाफ डू प्लेसिसच्या हातून झेलबाद केले. तरी निकोलस पुरन आक्रमक खेळत होता. त्यानेही २४ चेंडूत अर्धशतक केले. त्यानंतर तो आणखीच आक्रमक खेळू लागला.
त्याला अखेर १५ व्या षटकात मिचेल स्टार्कने त्रिफळाचीत केले. त्याने ३० चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली.मात्र, यानंतर आयुष बडोनी (४), शार्दुल ठाकूर (०), शाहबाझ अहमद (९) आणि रवी बिश्नोई (०) यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. त्यामुळे धावगती मंदावली होती. तरी दुसऱ्या बाजूने डेव्हिड मिलर उभा होता. पण विकेट जात असल्याने त्याला मोठे फटके खेळता येत नव्हते. अखेर शेवटच्या दोन चेंडूवर त्याने दोन षटकार माले आणि संघाला २० षटकात ८ बाद २०९ धावांपर्यंत पोहचवले. मिलर १९ चेंडूत २७ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीकडून मिचेल स्टार्कने ३ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या. विपराज निगम आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरा दाखल खेळताना दिल्लीच्या संघाने सामना १९.३ षटकात १ गडी राखून जिंकला. दिल्लीतर्फे फाफ ड्युप्लेसीसने २९, अक्षर पटेलने २२, ट्रिस्टन स्टब्सने ३४ तर विपराज निगमने ३९ धावांचे योगदान दिले. एकवेळ सामना दिल्लीच्या हातातून निसटला असे वाटत असताना एका बाजूने चौफेर फटकेबाजी करत आशुतोष शर्माने एकहाती विजयश्री खेचून आणली.
शार्दूल ठाकूरच्या पहिल्याच स्पेलमध्ये जेक फ्रेझर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल तंबूत परतले. समीर रिझवी सिद्धार्थची शिकार ठरला. अनुभवी फाफ डू प्लेसिसने २९ धावा केल्या. पण रवी बिश्नोईने त्याची खेळी संपुष्टात आणली. नवोदित दिग्वेश राठीने दिल्लीचा कर्णधार अक्षर पटलेला माघारी पाठवले.निम्मा संघ तंबूत परतलेला असताना ट्रिस्टन स्टब्स आणि विपराज निगम यांनी ३५ चेंडूत ४८ धावांची भागीदारी केली. स्टब्स बाद झाल्यानंतर सामन्याचे पारडे लखनौच्या दिशेने झुकले. पण आशुतोष शर्माने मैदानात उतरताक्षणीच चौकार, षटकारांची लयलूट सुरू केली. धावगतीचे आव्हान १२च्या पुढे गेलेले असताना आशुतोष-विपराज जोडीने २२ चेंडूत ५५ धावा कुटल्या.
मोक्याच्या क्षणी राठीने विपराजला बाद केले. त्याने १५ चेंडूत ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर मिचेल स्टार्क आणि कुलदीप यादवही बाद झाले. पण आशुतोषने हार मानली नाही. कुलदीप बाद झाल्यावर आशुतोषने चौकार-षटकार लगावले. शेवटच्या षटकात दिल्लीला ६ चेंडूत ६ धावा हव्या होत्या.
शाहबाझ अहमदचा पहिला चेंडू निर्धाव पडला. दुसऱ्या चेंडूवर मोहित शर्माने एक धाव काढली. तिसऱ्या चेंडूवर आशुतोषने विजयी षटकार लगावत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऋषभ पंतने सोडलेला एक झेल आणि स्टम्पिंग लखनौला चांगलेच महागात पडले.
२७ कोटींचा रिषभ पंत फेल
पंतला १४व्या षटकामध्ये भारतीय क्रिकेटसंघातील त्याचा सहकारी कुलदीप यादवने बाद केले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आलेल्या मेगा ऑक्शनमध्ये पंतला लखनऊच्या संघाने २७ कोटी रुपये खर्चून करारबद्ध केले होते. यामुळे पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. दरम्यान स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पंत अपयशी ठरल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे.