कोलकाताचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय

क्विंटन डी कॉकची धमाकेदार खेळी : राजस्थानचा सलग दुसरा पराभव

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
27th March, 12:27 am
कोलकाताचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय

गुवाहाटी : क्विंटन डी कॉकने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात आयपीएलच्या १८व्या मोसमात पहिला विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने कोलकाताला विजयासाठी १५२ धावांचे आव्हान दिले होते. केकेआरने हे आव्हान क्विंटन डी कॉक याच्या नाबाद ९७ धावांच्या जोरावर १५ बॉलआधी पूर्ण केले. केकेआरने १७.३ षटकांमध्ये २ विकेट्स गमावून १५३ धावा केल्या. केकेआरला यासह पहिल्या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात विजयाची चव चाखण्यात यश आले. तर राजस्थानचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
मोईन अली आणि क्विंटन डी कॉक या सलामी जोडीने केकेआरला आश्वासक सुरुवात करून दिली. या दोघांनी पावरप्लेच्या ६ षटकांमध्ये ४१ धावा केल्या. मात्र, त्यानंतर मोईन सातव्या षटकांमधील पहिल्या चेंडूवर ५ धावा करून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात आला. रहाणेने क्विंटनसह दुसर्‍या विकेटसाठी २९ धावा जोडल्या. रहाणे १५ चेंडूत १ षटकार आणि एका चौकारासह १८ धावा करून माघारी परतला. रहाणे बाद झाल्यानंतर केकेआरचा स्कोअर १०.१ षटकांमध्ये २ बाद ७० असा झाला.
त्यानंतर मुंबईच्या अंगकृष रघुवंशीने क्विंटन डी कॉकला अप्रतिम साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची नाबाद आणि विजयी भागीदारी केली. अंगकृष रघुवंशीने १७ चेंडूत २ चौकारांसह नाबाद २२ धावांची खेळी केली. तर क्विंटनने ६४ चेंडूत १५९.०२ च्या स्ट्राईक रेटने नाबाद ९७ धावा केल्या. क्विंटनने यादरम्यान ६ षटकार आणि ८ चौकार झळकावले. क्विंटनचे हे केकेआरसाठी पहिल‍ेवहिले अर्धशतक ठरले. तर राजस्थानसाठी वानिंदु हसरंगाने एकमेव विकेट घेतली.
आयपीएल २०२५च्या सहाव्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर १५२ धावांचे लक्ष्य ठेवले. राजस्थानची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, सातत्याने विकेट्स गमावल्याने संघ अडचणीत आला. दरम्यान, संजू सॅमसनला केकेआरच्या युवा खेळाडूने क्लीन बोल्ड केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
३.५ व्या षटकात, संजू सॅमसनने केकेआरचा वेगवान गोलंदाज वैभव अरोराच्या गोलंदाजीवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण, तो त्रिफळाचित झाला. संजूने अरोराच्या चेंडूवर पुढे सरकून मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण, यावेळी त्याने एक मोठी चूक केली. संजू ओव्हरपिच चेंडूवर पुढे सरसावला, ज्यामुळे ओव्हरपिच चेंडू यॉर्करमध्ये रूपांतरीत झाला आणि तो क्लीन बोल्ड झाला. या सामन्यात संजू चांगल्या लयीत दिसत नव्हता. त्याने ११ चेंडूत १३ धावांची खेळी केली.
राजस्थानची टॉप ऑर्डर ठरली सपशेल अपयशी
राजस्थानच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी साफ निराशा केली. यशस्वी जयस्वालने २४ चेंडूत २९ धावा केल्या आणि तो मोईन अलीचा बळी ठरला. याशिवाय रियान परागलाही मोठी खेळी करता आली नाही. तो १५ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. याशिवाय चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नितीश राणाने ९ चेंडूत ८ धावा केल्या. या सामन्यात राजस्थानचे टॉप ४ फलंदाज फारसे काही करू शकले नाहीत.
ध्रुव जुरेलचे सर्वाधिक ३३ धावांचे योगदान
कोलकाताच्या घातक गोलंदाजीसमोर राजस्थानचा संघ १५१ धावांपर्यंत पोहोचू शकला. रियान परागच्या नेतृत्वाखाली संघाने २० षटकांत नऊ गडी गमावून १५२ धावांचे लक्ष्य ठेवले. राजस्थानसाठी ध्रुव जुरेलने सर्वाधिक ३३ धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त कोणत्या फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. केकेआरकडून वैभव अरोरा, हर्षित राणा, मोईन अली आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्याच वेळी, स्पेन्सर जॉन्सनला शेवटच्या षटकात जोफ्रा आर्चरच्या रूपात यश मिळाले.
केकेआरच्या फिरकीपटूंची शानदार गोलंदाजी
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या फिरकीपटूंची जादू दिसून आली नाही. पण, गुवाहाटीच्या मैदानावर केकेआरच्या फिरकीपटूंनी शानदार गोलंदाजी केली. केकेआरचे जादूगार वरुण चक्रवर्ती आणि मोईन अली होते, ज्यांनी राजस्थानविरुद्ध चार विकेट्स घेतल्या. दोघांनीही ८ षटकांत फक्त ४० धावा दिल्या. ज्यामध्ये वरुण चक्रवर्तीने राजस्थानच्या फलंदाजांना त्रास देत धावांवर अंकुश लावला.
मोईन अलीने दाखवली ताकद
सुनील नरेन संघात सामील न झाल्यामुळे मोईन अलीला केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. नरेन आजारी असल्याने मोईन अलीला संधी मिळाली. नरेनच्या गैरहजेरीत मोईन अली चांगला प्रभाव पाडू शकणार नाही असे वाटत होते. मात्र, या त्याने आपल्या संघाला निराश केले नाही. मोईन अलीने ४ षटकांत फक्त २३ धावा दिल्या आणि २ बळी घेण्यात तो यशस्वी झाला. त्याने जैस्वालला २९ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले तसेच नितीश राणालाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मोईन अली आणि वरुण चक्रवर्ती यांच्याव्यतिरिक्त, वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांनाही दोन विकेट्स घेण्यात यश आले.
वरुण चक्रवर्तीची कमाल
वरुण चक्रवर्ती जेव्हा गोलंदाजी करायला आला, तेव्हा रियान परागने त्याच्या तिसऱ्या चेंडूवर एक लांब षटकार मारला. पण, दोन चेंडूंनंतर वरुणने त्याला बाद केले. यानंतर चक्रवर्तीने एक अद्भुत चक्रव्यूह निर्माण केले आणि त्यामध्ये राजस्थानचे खेळाडू अडकत गेले. त्याने वानिंदू हसरंगाची विकेटही घेतली आणि त्याच्या चौथ्या षटकाच्या अखेरीस त्याने १३ डॉट बॉल टाकले. वरुणने २.१ षटकात एकही धाव दिली नाही, जी टी-२० क्रिकेटमध्ये मोठी गोष्ट आहे.
केकेआर ६व्या स्थानी
कोलकाताने राजस्थानला पराभूत करत थेट नवव्या स्थानावरून सहाव्या स्थानी झेप घेतली. दोन गुणांची कमाई करत केकेआरने लखनौ, मुंबई आणि गुजरात टायटन्स यांना मागे टाकले आहे.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान : २० षटकांत ९ बाद १५१ धावा
कोलकाता : १७.३ षटकांत २ बाद १५२ धावा
सामनावीर : क्विंटन डी कॉक