मुंबईचा सलग दुसरा पराभव

गुजरातचा घरच्या मैदानावर मोठा विजय : साईसुदर्शनचे अर्धशतक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
30th March, 12:23 am
मुंबईचा सलग दुसरा पराभव

अहमदाबाद : कर्णधार हार्दिक पांड्याच्या कमबॅकनंतरही मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आला नाही. मुंबई इंडियन्सने दुसऱ्या सामन्यातही पराभाचेच पाढे वाचले. पण दुसरीकडे गुजरातने आपल्या घरच्या मैदानात मोठा विजय साकारला. गुजरातने साई सुदर्शनच्या अर्धशतकाच्या जोरावर १९६ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी केली आणि त्यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
गुजरातच्या १९७ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर काही वेळ तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची चांगली जोडी जमली होती. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचली, पण तिलकने चुकीचा फटका मारत आपली विकेट गमावली आणि ही जोडी फुटली. त्यानंतर सूर्यावर सामन्याची जबाबदारी होती. हार्दिक पंड्या त्याच्या साथीला आला होता. पण सूर्या मोठा फटका मारताना बाद झाला आणि त्याने ४८ धावा केल्या. हार्दिक पंड्या यावेळी फटकेबाजी करायला जमली नाही आणि तो ११ धावांवर बाद झाला. त्यामुळे मुंबई इंडियन्सला दुसरा पराभवही पत्करावा लागला.
हार्दिकने गुजरातला फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि तिथेच मुंबई इंडियन्सने चूक केली. कारण खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती आणि त्याचा फायदा गुजरातच्या संघाने चांगलाच उचलला. शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनीही दमदार सुरुवात केली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी मुंबईच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला आणि एकराच्या धावगतीने त्यांनी आपल्या धावा जमवल्या. मुंबईच्या संघाला यावेळी एकही विकेट काढता आली नाही. तिथेच गुजरातचे आपल्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचलाा. पण पॉवर प्लेनंतर हार्दिक गोलंदाजीला आला आणि त्याने मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. हार्दिकने गिलला ३८ धावांवर बाद केले.
हार्दिकने दोन विकेट्स मिळवल्या खऱ्या, पण साई सुदर्शनने दुसऱ्या बाजूने धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला दीडशे धावांचा पल्ला सहज गाठून दिला. साई सुदर्शनने यावेळी फक्त ४१ चेंडूंत ६३ धावांची खेळी साकारली, यामध्ये चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. साई बाद झाल्यावर गुजरातला जास्त धावा करता आल्या नाहीत, पण त्यांनी १९६ धावांचा डोंगर उभारला. गुजरातसाठी टॉप ३ फलंदाजांनी सर्वाधिक धावांचे योगदान दिले. मात्र त्यानंतर फलंदाजांना काही खास करता आले नाही. त्यामुळे गुजरातला २०० पार पोहचण्याची संधी असूनही पोहचता आले नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी गुजरातला झटपट झटके देत मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यात यश मिळवले. मुंबईच्या गोलंदाजांनी त्यांची भूमिका बजावली. बॉक्स
गुजरातची बॅटिंग
गुजरातसाठी ओपनर साई सुदर्शन याने सर्वाधिक धावा केल्या. साईने ४१ चेंडूमध्ये २ षटकार आणि ४ चौकारांसह ६३ धावा केल्या. जोस बटलर याने २४ चेंडूमध्ये ३९ धावा केल्या. बटलरच्या या खेळीत १ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. कॅप्टन शुबमन गिल याने २७ चेंडूत ४ चौकार १ षटकारासह ३८ धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त एकालाही मुंबईच्या गोलंदाजांनी मोठी खेळी करू दिली नाही.
शेरफान रुदरफोर्ड याने १८ धावा केल्या. शाहरुख खानने ९ धावा केल्या. राशिद खान याने ६ धावा जोडल्या. कगिसो रबाडाने नाबाद ७ धावा केल्या. तर साई किशोर १ धाव करून धावबाद झाला. मुंबईसाठी कॅप्टन हार्दिक पंड्या याने सर्वाधिक २ बळी घेतले. तर ट्रेन्ट बोल्ट, दीपक चाहर, मुजीब उर रहमान आणि एस राजू या चौघांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
साई सुदर्शनचा अनोखा विक्रम
अलिकडेच, इंडियन प्रीमियर लीग मधून अनेक महान भारतीय खेळाडू उदयास आले आहेत, परंतु तामिळनाडूचा २३ वर्षीय साई सुदर्शन त्यात खूप खास आहे. त्याची शेवटच्या ६ डावांमध्ये ७९ ची सरासरी आधीच माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे आणि याच दरम्यान, साईने आणखी एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. तो आयपीएलच्या चार हंगामातील २७ सामन्यांमध्ये तो फक्त एकदाच सिंगल डिजीटमध्ये (०-९) बाद झाला आहे. त्याच वेळी, २०२३ पासून आतापर्यंत खेळलेल्या २२ डावांमध्ये, साई सुदर्शनने ५२.५ च्या सरासरीने आणि १४५ च्या स्ट्राईक रेटने एक हजार धावा केल्या आहेत. केवळ माजी दिग्गजच नाही तर मीडिया आणि सर्व चाहते या आकड्यावर पूर्णपणे मोहित झाले आहेत. 

रोहित शर्माचा विक्रम
हा सामना रोहित शर्मासाठी खास ठरला आहे. रोहित शर्माचा हा टी २० कारकिर्दीतला ४५० वा सामना ठरला. यासोबतच त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सर्वाधिक टी २० सामने खेळण्याच्या बाबतीत रोहित शर्माने मुसंडी मारली आहे. गुजरातविरुद्ध मैदानात उतरताच त्याने इतिहास रचला. रोहित शर्मा ४५० टी २० सामने खेळणार पहिला भारतीय ठरला आहे. याबाबतीत दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने ४१२ टी २० सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबतीत केरॉन पोलार्ड पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण ६९५ टी २० सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर रोहित शर्मा ४५० टी २० सामने खेळणारा १२ वा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार आणि दमदार खेळाडू म्हणून आपला दबदबा कायम ठेवला आहे. २०२४ चा वर्ल्डकप सुद्धा टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वातच उंचावला होता. त्यानंतर टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. परंतु आयपीएलमध्ये तो खेळताना दिसणार आहे.