गुजरात टायटन्सची पराभवाने सुरुवात; गिल, साई सुदर्शन, बटलरची खेळी व्यर्थ
अहमदाबाद : पंजाब किंग्सने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात आयपीएलच्या १८ व्या मोसमात विजयी सुरुवात केली आहे. पंजाब किंग्सने गुजरातवर ११ धावांनी विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी २४४ धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने या धावांचा शानदार पाठलाग करताना सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेला. मात्र, गुजरातचे प्रयत्न अपुरे पडले. गुजरातला २० षटकांमध्ये ५ गडी गमावून २३२ धावांपर्यंतच पोहचता आले.
पंजाबने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये २० षटकांत ५ गडी गमावून २४३ धावा केल्या. पंजाबसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. ओपनर प्रियांश आर्याने ४७ धावांचे योगदान दिले. तर अखेरच्या क्षणी शशांक सिंहने श्रेयस अय्यरसह तोडफोड बॅटिंग करत पंजाबला २४० धावांपर्यंत पोहचवले. शशांकने नाबाद ४४ धावा केल्या. पंजाबने यासह इतिहास घडवला. पंजाबची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.
त्याआधी प्रभसिमरन सिंह ५, प्रियांश आर्या ४७ आणि अझमतुल्लाह ओमरझई याने १६ धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेल आला तसाच परतला. मॅक्सवेल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर पंजाबला १६२ धावांवर पाचवा झटका लागला. मार्कस स्टोयनिस २० धावांवर (१५.२ षटकात) बाद झाला. स्टोयनिस बाद झाल्यानंतर शशांक सिंह मैदानात आला. शशांकने श्रेयसला दुसऱ्या बाजूने अप्रतिम साथ दिली. त्यामुळेच पंजाबला २४० पार मजल मारता आली.
सहाव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी
शशांक सिंह आणि श्रेयस अय्यर या दोघांनी अखेरच्या २८ चेंडूमध्ये तोडफोड फलंदाजी केली. दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. दोघांनी फक्त २८ चेंडूत नाबाद ८१ धावांची नाबाद भागीदारी केली आणि पंजाबला २४३ धावांचा टप्पा गाठून दिला. श्रेयस अय्यरने ४२ बॉलमध्ये ९ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ९७ धावा केल्या. तर शशांकने १६ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावा केल्या. तसेच गुजरात टायटन्सकडून साई किशोरने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर कगिसो रबाडा आणि राशिद खान या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
चॅम्पियन कॅप्टन
श्रेयस अय्यर चॅम्पियन कॅप्टन आहे. श्रेयसने गेल्या हंगामात आपल्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली होती. त्यानंतर केकेआरने श्रेयसला रिलीज केले. त्यानंतर पंजाबने श्रेयसला २६ कोटी ७५ लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले आहे.
गुजरात जायंट्सला ४१ धावांची ‘पेनल्टी’
या सामन्यात ४१ धावांचा फटका गुजरात टायटन्सला भरावा लागला आहे. गुजरातचा राशिद खान आणि आर्शद खानमुळे हा फटका बसला आहे. या दोघांनी प्रियांश आर्यचा झेल सोडला आणि गुजरातची पुरती वाट लागली. जीवदान मिळाल्यानंतर प्रियांश आर्यने आरपारची लढाई सुरू केली. प्रियांश ६ धावांवर असताना त्याने कागिसो रबाडाच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारला. अर्शद खान आणि रशीद खान दोघेही हा झेल पकडू शकले नाहीत. प्रियांशने २३ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून २ षटकार आणि ७ चौकार आले. झेल सोडल्यानंतर त्याने आणखी ४१ धावा जोडल्या. गुजरातच्या खेळाडूंनी झेल घेतला असता तर त्यांच्या संघाला या अतिरिक्त ४१ धावा सहन कराव्या लागल्या नसत्या. प्रियांशचा हा पहिला सामना होता आणि त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात शानदार फलंदाजी केली. डावखुरा प्रियांश स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने २०४ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ४७ धावा केल्या.
श्रेयसचे नाबाद अर्धशतक
गुजरातचा प्रमुख फिरकी गोलंदाज राशीद खान पंजाबच्या डावातील १४वे षटक टाकण्यासाठी आला. राशीदने सलग पहिले २ चेंडू डॉट टाकले. तर पुढील दोन चेंडूवर श्रेयस आणि मार्कस स्टोयनिसने सिंगल धावा घेतल्या. यावेळी श्रेयस ४५ धावांवर नाबाद होता. त्यानंतर श्रेयसने राशीदला पाचव्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला आणि अापले अर्धशतक पूर्ण केले. त्याने १८८.८९ च्या स्ट्राईक रेटने फक्त २७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकी खेळीत त्याने ३६ धावा या चौकार आणि षटकारद्वारे केल्या. श्रेयसने ४ षटकार आणि ३ चौकार लगावले.
ग्लेन मॅक्सवेलचा 'लज्जास्पद रेकॉर्ड'
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलच्या इतिहासात लाजिरवाणा रेकॉर्ड केला आहे. मॅक्सवेल आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू बनला आहे. आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल १३५ सामन्यांमध्ये १९ वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पंजाब किंग्जचा भाग असलेल्या मॅक्सवेलने मंगळवारी हा लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला. आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्स (जीटी) विरुद्ध तो गोल्डन डकसाठी बाद झाला.
पंजाब किंग्जच्या डावात १६ षटकार
श्रेयस अय्यरने ४२ चेंडूत ९ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ९७ धावा केल्या. पंजाब किंग्जच्या डावात एकूण १६ षटकार मारण्यात आले. अय्यरच्या ९ षटकारांव्यतिरिक्त, प्रियांश आर्य, मार्कस स्टोइनिस आणि शशांक सिंग यांनी प्रत्येकी २ षटकार मारले. अजमतुल्लाहने एक षटकार मारला.
संक्षिप्त धावफलक
पंजाब : २० षटकांत ५ बाद २४३ धावा
गुजरात : २० षटकांत ५ बाद २३२ धावा
सामनावीर : श्रेयस अय्यर