४४ धावांनी पराभव : इशान-ट्रॅव्हिस ठरले विजयाचे शिल्पकार
हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२५ च्या हंगामाची सुरुवात राजस्थान रॉयल्सचा ४४ धावांनी पराभव करून विजयाने केली. इशान किशन आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादने २० षटकांत ६ बाद २८६ धावा केल्या, जी या स्पर्धेतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरादाखल, संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी चांगली भागीदारी केली. पण, ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. राजस्थान संघ निर्धारित षटकांत सहा गडी बाद केवळ २४२ धावा करू शकला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी ५० धावांच्या आत तीन विकेट्स गमावल्या. सामन्यात प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या सॅमसनने जुरेलसोबत चौथ्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. जेव्हा सॅमसन आणि जुरेल फलंदाजी करत होते, तेव्हा राजस्थान आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग करू शकेल, असे वाटत होते. परंतु सॅमसन बाद होताच ही भागीदारी तुटली. सॅमसन पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर, जुरेलनेही आपली विकेट गमावली. शेवटी, शिमरॉन हेटमायर आणि शुभम दुबे यांनी थोडे प्रयत्न केले. मात्र, संघाला लक्ष्य गाठता आले नाही.
राजस्थानकडून यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने ३५ चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांसह सर्वाधिक ७० धावा केल्या. त्याच वेळी, सॅमसनने ३७ चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. हेटमायरने २३ चेंडूत एका चौकार आणि चार षटकारांसह ४२ धावा केल्या, तर शुभमने ११ चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांसह ३४ धावा केल्या आणि नाबाद राहिला. राजस्थानकडून नितीश राणाने ११, कर्णधार रियान परागने ४, यशस्वी जैस्वालने १ आणि जोफ्रा आर्चरने १ धावा करून नाबाद राहिले. सनरायझर्स हैदराबादकडून सिमरनजीत सिंग आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमी आणि अॅडम झम्पाने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघासाठी अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी चांगली सुरुवात करून दिली. अभिषेक बाद झाल्यानंतर हेडने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. हेड बाद झाल्यानंतर, हैदराबादचा डाव मंदावेल असे वाटत होते, परंतु इशानने जोरदार फलंदाजी केली आणि ४५ चेंडूत शतक झळकावून आपली क्षमता सिद्ध केली. हा इशानचा सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण सामना होता. ४७ चेंडूत ११ चौकार आणि सहा षटकारांसह १०६ धावा काढल्यानंतर इशान नाबाद परतला.
सनरायझर्सकडून हेडने ३१ चेंडूत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह ६७ धावा केल्या, तर हेनरिक क्लासेनने १४ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारासह ३४ धावा केल्या, नितीशकुमार रेड्डीने १५ चेंडूत ३० धावा केल्या, अभिषेकने ११ चेंडूत पाच चौकारांसह २४ धावा केल्या आणि अनिकेत वर्माने सात धावा केल्या. राजस्थानकडून सर्वात यशस्वी गोलंदाज तुषार देशपांडे होता, ज्याने तीन विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय महेश तिक्ष्नाने दोन आणि संदीप शर्माने एक विकेट्स घेतली.
इशान किशनचे वादळी शतक
टीम इंडियापासून दूर असलेल्या इशान किशनने आयपीएल २०२५ च्या पहिल्याच सामन्यात धमाकेदार शतक ठोकले. राजस्थान रॉयल्सविरुद्ध फक्त ४५ चेंडूत शतक झळकावून त्याची जुनी शैली दाखवली. त्याने आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. या सामन्यात ४७ चेंडूत ११ चौकार आणि सहा षटकारांसह १०६ धावा काढल्यानंतर इशान नाबाद परतला.
चाैकार-षटकारांचा पाऊस
सनराईज हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात षटकार चौकारांचा अक्षरक्ष: पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. हैदराबादच्या खेळीत एकूण ३४ चौकार तर १२ षटकार मारले गेले तर राजस्थान रॉयल्सच्या संघाने आपल्या खेळीत १७ चौकार तर १८ षटकार मारले. सामन्यात एकूण ३० षटकार तर ५१ चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली.
आयपीएलमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या :
२८७/३ – हैदराबाद वि. बंगळुरू २०२४
२८६/६ – हैदराबाद वि. राजस्थान २०२५
२७७/३ – हैदराबाद वि मुंबई २०२४
२७२/७ – कोलकाता वि. दिल्ली २०२४
२६६/७ – हैदराबाद वि. दिल्ली, २०२४
२६३/५ – बंगळुरू वि. पुणे २०१३