साखळीत ग्राहक विक्रेता कृषी मेळावा
साखळी : शेती हा आज गोव्यात सर्वात जास्त कमाई करून देणारा व्यवसाय बनला आहे. राज्यात लवकरच अॅग्रो क्लिनिक सुरू केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे कृषी खात्यातर्फे आयोजित ग्राहक विक्रेता कृषी मेळाव्यात केले.
विकसित गोवा साकारतानाच स्वयंपूर्ण गोवा बनविण्यासाठी शेतकऱ्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. त्यासाठी सरकार आपल्या परीने सर्व ती मदत व सहकार्य देत आहे. पण गोव्यातील युवा शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे. त्याचप्रमाणे लोकांनीही आपल्या पडीक जमिनी कोणत्याही कचरा, स्क्रॅप किंवा इतर पदार्थ डंपिंग करण्यासाठी भाडेतत्त्वावर न देता त्यामध्ये कोणी जर इच्छुक असल्यास लागवडीखाली आणण्यासाठी द्यावी, असेही सावंत म्हणाले.
साखळी रवींद्र भवनात उत्तर गोवा शेतकरी ग्राहक विक्रेता मेळाव्यानिमित्त रवींद्र भवनच्या परिसरात गोव्यातील पारंपरिक उत्पादनांची दालने थाटण्यात आली होती. त्यातून शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेली व स्वतः तयार केलेली विविध उत्पादने विक्रीस ठेवण्यात आली होती. या सर्व दालनावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार प्रेमेंद्र शेट व इतरांनी भेट देऊन सर्व उत्पादनांची माहिती करून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक उत्पादने, भाजी खरेदीही केली.
रवींद्र भवनच्या मुख्य सभागृहात झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर मयेचे आमदार तथा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट, कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई, सहाय्यक संचालक किशोर भावे, डिचोली कृषी विभाग अधिकारी निलीमा गावस, संजना वेळीप, फलोत्पादन महामंडळाचे एमडी चंद्रहास देसाई, जिल्हा पंचायत अध्यक्ष शंकर चोडणकर, जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, साखळीच्या नगराध्यक्षा सिध्दी प्रभू, डिचोलीचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर व इतरांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांनी तांत्रिक व वैज्ञानिक तत्त्वांचा अवलंब करून जर शेती केली तर कमी जागेत सुद्धा जास्त उत्पादन व आर्थिक कमाई करू शकतो. स्वयंपूर्ण गोवा बनविण्यासाठी कृषी, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसायात, फुलांचा व्यवसाय या पाच घटकांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारण या घटकांच्या आयातीवर गोवा हजारो कोटी रुपये गोव्याबाहेर खर्च होतात. त्यासाठी या व्यवसायांकडे युवा शेतकऱ्यांनी गांभीर्याने पहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
'फलोत्पादन'कडची ३० टक्के भाजी गोव्यातील
कृषी व्यवसायात सहकारी संस्थांनी यापुढे पाऊल टाकावे. त्यांना मदत करण्यासाठी सरकार तसेच खाजगी अनेक संस्था तयार आहेत. दहा-पंधरा शेतकरी एकत्रित येऊन जर लागवड करायला इच्छुक असेल तर स्वयंपूर्ण मित्रांनी त्या पद्धतीचे नियोजन तयार करावे. आज फलोत्पादन महामंडळातर्फे खरेदी करण्यात येणारी ३० टक्के भाजी गोव्यातील शेतकऱ्यांनी महामंडळाला दिली आहे. म्हणजेच गोव्यातील शेतकऱ्यांना फलोत्पादन महामंडळाने आतापर्यंत सहा कोटी रुपये दिले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.