गावाकडची ओढ अन् गरज आपण कशी भागवू शकतो? तर दुधाची तहान ताकावर म्हणतात, तसे दोन दिवसांचा गावाकडचा अनुभव कुणाला हवा असेल तर त्यांनी अवश्य या संमेलनाला भेट द्यावी अन् पुढील आयुष्यासाठी ऊर्जा आणि एक वेगळा अनुभव घेऊन जावे.
साहित्य मंथन सत्तरी आयोजित चौथे ग्रामीण साहित्य संमेलन हे आज व उद्या रावण - सत्तरी येथे भरत आहे. ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’कार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर व ज्ञानपीठकार दामोदर मावजो यांच्या उपस्थितीत या संमेलनाच्या ढोलावर काठी पडणार आहे. त्या निमित्ताने दोन दिवस चालणाऱ्या या साहित्यिक सोहळ्याचा हा धावता आलेख.
‘साहित्य मंथन’ ही संस्था गेली १४ वर्षे साहित्याच्या क्षेत्रात गोव्यातील अतिदुर्गम भागात सत्तरीत कार्यरत आहे. या संस्थेअंतर्गत एक फिरता द्वैमासिक साहित्यिक कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यात पूर्वप्रकाशित वा प्रकाशित साहित्यावर, विषयांवर चर्चा होते. सातत्याने हा उपक्रम करतानाच, कोविड काळात साहित्य प्रकाशनासाठी त्रैमासिक एक डिजिटल अंक प्रकाशित करीत आहोत तसेच ग्रामीण साहित्याला समर्पित अशी तीन ग्रामीण साहित्य संमेलने आयोजित केलेली आहेत. गोव्याच्या साहित्यिक इतिहासात ही ग्रामीण संमेलने आपले वेगळे स्थान घेऊन स्थिरस्थावर होत आहेत. साहित्य मंथन संस्था हे धाडस पेलत आहे, ते आपल्या ग्रामीण जीवनाशी जोडलेल्या सगळ्या सदस्यांमुळे.
दर दहा किलोमीटर अंतरावर माणसाची भाषा बदलते, असे म्हणतात. त्यात प्रत्येक माणसाला अभिव्यक्तीची अडचण भासते. आपल्या भाषेबद्दल न्यूनगंड तयार होतो. त्यामुळे आपल्या भाषेसह आपल्या सृजनशीलतेला मर्यादा येतात. त्यामुळे प्रत्येक बोली भाषा ही तेवढीच समृद्ध असते अन् तिचे संवर्धन झाले पाहीजे, हा आमचा ध्यास आहे. साहित्य हे फक्त लिखित नसून मौखिक साहित्याला आपल्या समाजात मोठी परंपरा आहे. त्या आद्य साहित्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी व त्याचे संवर्धन होण्यासाठी ही संमेलने यशस्वी होताना दिसत आहेत.
गोव्यात पूर्वापार चालू असलेला कोकणी - मराठी वाद साहित्य मंथनाच्या मांडवाखाली नाहीसा होतोय. भाषेचे बंधन नसल्याने प्रत्येकाने आपल्या मनाची भाषा वापरावी, यावर आमचा भर.
ग्रामीण साहित्य संमेलन हे गावातील लोकांच्या अंगणात, ओसरीवर, मंदिराच्या पटांगणात घेतले जाते. सगळी सत्रे ही ग्रामीण विषय केंद्रस्थानी ठेवून निवडली जातात. त्यात लोकवेद, कविता, कथा, पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक स्थित्यंतरे, पर्यावरणीय, आर्थिक प्रश्न येतात. एकूणच ग्रामीण जीवनाशी संबंधित राहणीमान, इथला संघर्ष, इथले प्रश्न, खाद्य संस्कृती, इत्यादी गोष्टींचा उहापोह इथे होतो. तत्सम सुखसोयी नसलेल्या प्रदेशात जे आहे, त्या परिस्थितीत ग्रामीण जीवनाशी जोडण्याचा दोन दिवसांचा अनुभव या संमेलनात सहभागी होणाऱ्यांना लाभतो.
पहिले संमेलन करंजोळ - सत्तरी या गावात झाले होते. त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यकार, समाजवादी नेते व आपल्याबरोबर आम्हालाही दुर्गम भागात भ्रमण करून आणणारे राजा शिरगुप्पे होते. तेव्हा उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कोकणी लेखक पुंडलीक नायक उपस्थित होते. पहिल्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ग्रामीण कथाकार डॉ. प्रकाश पर्येकर यांची निवड केली होती. हे संमेलन गावात चार ठिकाणी घेतले होते. वेगवेगळ्या तीन घरांच्या अंगणात व एक सत्र देवळाच्या प्रांगणात. त्यामुळे सबंध गाव या संमेलनाचा भाग होऊन गेला. राहण्याची व्यवस्थाही स्थानिक लोकांच्या घराघरांत केली होती. दुसऱ्या दिवशीचा सामूहिक नाश्ता असूनही लोक पाहुण्यांना आपल्याच घरचा नाश्ता प्रेमाने वाढत होते. खऱ्या अर्थाने बाहेरून आलेल्यांना ती एक पर्वणी होती. गावातील मायेच्या ओलाव्याचा स्पर्श आगळाच.
दुसरे ग्रामीण साहित्य संमेलन मोर्ले - सत्तरी येथे झाले, ज्यात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सोमनाथ कोमरपंत व महाबळेश्वर सैल उपस्थित होते. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून नाट्यलेखक प्रो. डॉ. प्रकाश वजरीकर यांची निवड केलेली होती. श्री बारावंश सांस्कृतिक संघाने स्थानिक पातळीवर आयोजनाचा भार उचलल्याने ते संमेलन यशस्वी झाले.
तिसरे ग्रामीण संमेलन सालेली - सत्तरी येथे झाले, ज्यात शाहीर संभाजी भगत व ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई संमेलनाध्यक्ष होते. श्री सिद्धेश्वर पथक सालेली यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या सा संमेलनात माणसे वाचण्यासारखी अनोखी सत्रे घेतली होती. सोबत संमेलन स्थळ हे कृषी संस्कृतीचे यथोचित चित्र उभे करणारे अभ्यासकांसाठी व नवीन पिढीसाठी चांगली पर्वणी ठरली.
द्विवार्षिक काळाने होणाऱ्या या चौथ्या ग्रामीण संमेलनाला संघटक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक कमलाकर म्हाळशी यांची निवड संमेलनाध्यक्ष म्हणून केलेली आहे. याचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानपीठकार दामोदर भाई मावजो असणार आहेत. तर ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमी दिल्लीचा पुरस्कार पटकावणारे प्रवीण बांदेकर हे उद्घाटक म्हणून आमंत्रित आहेत. हे संमेलन यंदा श्री सातेरी केळबाय देवस्थान समितीच्या सहकार्याने रावण - सत्तरी येथे आज (शनिवार) व उद्या (रविवार) भरवले जाईल. दर संमेलनाला काहीतरी नवीन देण्याचा, करण्याचा साहित्य मंथनचा प्रयत्न असतो. त्या अनुषंगाने ‘म्हाकाय मात्सां बोलांक जाया’ ग्रामीण अर्थव्यवस्था काल व आज धरून ग्रामीण जीवनाशी निगडित लोकवेदाचा गजर या संमेलनात होणार आहे. ग्रामीण विषयाला धरून साहित्यिक चर्चासत्रे, गीतगायन, कवनां अन् सोबत खरपूस गावरान जेवण. या सगळ्याचा आस्वाद घेणे हा एक विलक्षण अनुभव असणार आहे.
पोटाची खळगी भरण्याच्या मागे धावता धावता आपण नगराच्या राज्यात पोचतो, पण आपली ग्रामीण जीवनाशी जोडलेली नाळ काही तुटता तुटत नाही. ज्येष्ठ कवी विष्णू सूर्या वाघ म्हणायचे, ‘शहरात हिंडताना आपल्या चपलेत गावाकडली माती असते.’ अशी गावाकडची ओढ अन् गरज आपण कशी भागवू शकतो? तर दुधाची तहान ताकावर म्हणतात, तसे दोन दिवसांचा गावाकडचा अनुभव कुणाला हवा असेल तर त्यांनी अवश्य या संमेलनाला भेट द्यावी. ग्रामीण जीवनाशी आजही जोडलेल्या लोकांचा संघर्ष, जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करावा अन् पुढील आयुष्यासाठी ऊर्जा आणि आपल्यासाठी एक वेगळा अनुभव घेऊन जावे.
- नमन सावंत (धावस्कर)
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या व साहित्यिक आहेत.)