इस्तांबूलचे महापौर इकरेम इमामोगूल यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ तुर्कीमध्ये हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांचे प्रमुख विरोधक असलेल्या इमामोगूल यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी देशभरात आंदोलनाचे लोण पेटले आहे. बऱ्याच ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधूर आणि रबरी गोळ्यांचा मारा केला. मागच्या अनेक वर्षांतील हे तुर्कीमधील सर्वात मोठे आंदोलन बनले असून देशातील परिस्थिती असमान्य आणि अस्थिर बनत चालली आहे.
या आंदोलनाची सुरुवात इस्तांबूलमध्ये झाली. देशातील प्रमुख विरोधी पक्षनेते आणि राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांचे कडवे टीकाकार इमामोगूल यांना अटक झाल्यानंतर हे आंदोलन पेटायला सुरुवात झाली. इमामोगूल यांना पुढील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्दोआन यांच्या विरोधात उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच ही अटक झाली असल्याने या आंदोलनाने राजकीय वळण घेतले. सेक्युलर रिपब्लिकन पीपल्स पार्टी (सीएचपी) या प्रमुख विरोधी पक्षाकडून २०२८ साली होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीतील राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी इमामोगूल यांना जाहीर होणार होती. पण, त्या आधीच त्यांना सरकारने अटक केल्याने या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते.
इकरेम इमामोगूल यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्यासाठीच आम्ही त्यांना अटक करत आहोत, असा दावा अर्दोआन सरकारने केला आहे. तर दुसऱ्या बाजूला इमामोगूल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इमामोगूल सोबतच या आरोपांच्या तपासाकरिता आणखी १०० लोकांना पोलिसांनी तुरुंगात डांबले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अटकेचे समर्थन करण्यासाठी इमामोगूल यांच्यावर विविध गुन्हे नोंदवले गेले. यात गुन्हेगारांचे जाळे चालवणे, लाच घेणे, खंडणी वसूल करणे, गोपनीय व वैयक्तिक माहिती अवैधरीत्या गोळा करणे आणि कंत्राट मिळवण्यासाठी अनैतिक मार्गांचा अवलंब करणे इत्यादी आरोप इमामोगूल यांच्यावर ठेवले आहेत. अटक झाल्यानंतर त्यांची महापौर पदापासून गच्छंती करण्यात आली आहे. इस्तांबूलमधील रस्ते या आंदोलकांनी आणि त्यांच्या घोषणाबाजींनी दुमदुमून गेले आहेत.
- सुदेश दळवी