अन्न व औषधे प्रशासनाची कारवाई
म्हापसा : हणजूण व हडफडेमध्ये अन्न व औषध प्रशासनाने १८ रेस्टॉरन्ट आणि फास्टफूड आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये ९ आस्थापनांच्या मालकांनी स्वच्छता आणि एफडीएच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सदर आस्थापने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
सध्या एफडीएने किनारपट्टीतील अन्न गुणवत्ता आणि स्वच्छतेची तपासणीची मोहिम सुरू केली असून गुरूवारी २७ मार्च रोजी सायंकाळी अन्न व औषधे प्रशासनाच्या पथकाने हडफडे आणि हणजूणमध्ये स्वच्छता निरीक्षण मोहिम राबवली.
उडपी रेस्टॉरन्ट, बिर्याणी, फास्टफूड व खाद्यपदार्थ विक्री आस्थापनांची तपासणी केली. एकूण १८ आस्थापनांचा यामध्ये समावेश होता. त्यातील ९ मध्ये नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर आस्थापने बंद करण्याचा आदेश अधिकार्यांनी दिली. एफडीच्या संचालिका स्वेता देसाई यांच्या मागदर्शनाखाली उत्तर गोवा अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, अन्न सुरक्षा अधिकारी अमीत मांद्रेकर, लेनीन डिसा व इतरांनी ही कारवाई केली.