२५ लाखांचा ड्रग्ज जप्त : कुडाळ येथील युवक ताब्यात
पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) पत्रादेवी चेक पोस्टजवळ छापा टाकून कुडाळ - सिंधुदुर्ग येथील परवेज अली खान (वय ३०) या युवकाला अटक केली. त्याच्याकडून २५.१० लाख रुपये किमतीची २०८ ग्रॅम अॅक्टेसी पावडर आणि ४३ अॅक्टेसी गोळ्या जप्त केल्या.
अमली पदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात होणाऱ्या पार्टीमध्ये मुंबईहून अॅक्टेसी गोळ्याचा पुरवठा होत असल्याची माहिती एएनसीच्या अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार, अधीक्षक टीकम सिंग वर्मा आणि उपअधीक्षक नेर्लन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजित पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक उपनिरीक्षक मनोज शिरोडकर, हवालदार उमेश देसाई, युस्टाकिओ फर्नांडिस, कॉन्स्टेबल गोदीश गोलतेकर, योगेश मडगावकर व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री पत्रादेवी चेक पोस्ट जवळ सापळा रचला.
याच दरम्यान गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार, एक युवक त्या ठिकाणी आला असता, त्याची चौकशी केली. पथकाने कुडाळ- सिंधुदुर्ग येथील ३० वर्षीय युवकाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून २५.१० लाख रुपये किमतीच्या २०८ ग्रॅम अॅक्टेसी पावडर आणि ४३ अॅक्टेसी गोळ्या जप्त केल्या. त्यानंतर एएनसीने संशयिताविरोधात २०(बी) (ii) (बी),२२(बी) आणि २२(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
गोव्यात सध्या सलग सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे परवेज हा कुडाळ येथून गोव्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांना अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती गोवा अमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग - गोवा सीमेवर महामार्गावर पथकाने सापळा रचत कारवाई केली.
गोवा, मुंबईत करायचा ड्रग्ज पुरवठा
ताब्यात घेण्यात आलेला संशयित परवेज हा अमली पदार्थ टोळीत सक्रिय असून तो गोवा व मुंबईतील बड्या पार्ट्यांना अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याची प्राथमिक माहिती गोवा पोलिसांच्या चौकशीत उघड झाली आहे. या प्रकरणात अन्य कोणी गुंतले आहेत का? याची माहिती गोवा पोलीस घेत आहेत.