कांदोळीतील युवकाला दुचाकी डिलिव्हरीच्या नावाखाली २.६० लाखांचा गंडा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th March, 12:03 am
कांदोळीतील युवकाला दुचाकी डिलिव्हरीच्या नावाखाली २.६० लाखांचा गंडा

म्हापसा : मध्यप्रदेशमध्ये दुरुस्तीसाठी दिलेल्या यमाहा मोटारसायकलची लवकर डिलिव्हरी मिळवण्यासाठी कस्टमर सपोर्ट एपीके हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून कांदोळीतील एका युवकाला अज्ञाताने २ लाख ६० हजारांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला.

ही घटना दि. २ ते दि. ३ फेब्रुवारी दरम्यान घडली. याप्रकरणी कळंगुट पोलिसांत मान्युअल फर्नांडिस (वोर्डा - कांदोळी) यांनी तक्रार दिली. फिर्यादी मान्युअल यांनी आपली यमाहा मोटारसायकल मध्यप्रदेश येथे एका गॅरेजमध्ये दुरूस्तीसाठी पाठवली होती.

दुचाकी दुरूस्त होऊन संबंधित गॅरेजने ती कुरिअर मार्फत पाठवली होती. सदर कुरिअर कंपनीची गुगलवर फिर्यादींनी लिंकची तपासणी केली. तेव्हा अज्ञाताने मान्युअल यांना कस्टमर सपोर्ट एपीके नावाचे अ‍ॅप इन्स्टॉल करण्यास भाग पाडले. जेणेकरून मध्यप्रदेश ते वेर्णा कुरिअर सेंटरमध्ये दुचाकीची डिलिव्हरी लवकर होईल. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर संशयिताने फिर्यादीला १ रुपया पाठवायला लावला. नंतर फिर्यादींची दुचाकी गोव्यात पोचली. दुचाकी आल्यावर फिर्यादींनी आपल्या बँक खात्याची तपासणी केली तेव्हा त्यांच्या खात्यातून २ लाख ६० हजार रुपये रक्कम वरील अ‍ॅप मार्फत काढण्यात आल्याचे आढळून आले.

आपली फसवणूक झाल्याचे समजताच फिर्यादींनी कळंगुट पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यान्वये अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक हे करीत आहेत. 

हेही वाचा