प्रोबेशन कॉन्स्टेबलची सेवेतून बडतर्फची आव्हान याचिका हायकोर्टाने फेटाळली

महिलेने पोलीस महासंचालकांकडे केली होती तक्रार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th March, 12:05 am
प्रोबेशन कॉन्स्टेबलची सेवेतून बडतर्फची आव्हान याचिका हायकोर्टाने फेटाळली

म्हापसा : सेवेतून बडतर्फ केलेल्या प्रोबेशनवरील पोलीस कॉन्स्टेबल विशाल मडगावकर (वायरलेस मेसेंजर) याची आव्हान याचिका गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

पोलीस खात्याने प्रोबेशन कॉन्स्टेबल मडगावकर याला दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सेवेतून बडतर्फ केले होते. या आदेशाला मडगावकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यात राज्य सरकार, पोलीस महासंचालक व पोलीस मुख्यालयाच्या अधीक्षकांना प्रतिवादी केले आहे. मडगावकर २०२३ मध्ये पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाला होता.

आपली पोलीस खात्यातील सेवा चांगली आहे. तसेच बडतर्फीच्या आदेशात कोणतेही कारण स्पष्ट करण्यात आला नसल्याचा दावा त्यांनी उच्च न्यायालयात सुनावणीवेळी केला. मात्र, सरकारी पक्षाने याचिकादाराचे दावे खोडून काढले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश निवेदिता मेहता व भारती दंग्रे यांनी ही याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, विशाल मडगावकर याच्या विरोधात वास्को येथील एका महिलेने पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली. त्यात नोकरीचे आमिष दाखवून ४ लाख रुपयांची फसवणूक तसेच गैरव्यवहार, धमकी आणि गुन्हेगारी क्रियाकलपांचा आरोप सदर महिलेने तक्रारीत केला होता. तसेच इतर मुद्दे उपस्थित केले होते. तक्रारीची दखल घेऊन तसेच मडगावकर यांनी त्याला न्यायालयाकडून दंडनीय शिक्षा झाल्याची माहिती लपवून फसवणूक केल्याचा ठपका ठेवून पोलीस मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी बडतर्फची कारणे दाखवा नोटीस पोलीस खात्याकडून बजावली होती. त्यानंतर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. 

हेही वाचा