वास्को रेल्वे स्थानकावर एकाला घेतले ताब्यात
वास्को : दिल्ली येथून रेल्वेतून वास्कोला चिकनच्या नावाखाली गुरांच्या जिभा पाठविण्याचा प्रकार बजरंग दलाचे कार्यकर्ते व वास्को रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे शनिवारी उघडकीस आला. एकूण १७९ किलोग्रॅमची दोन पार्सले पाठविण्यात आली होती. ती वास्को रेल्वे पोलिसांनी हस्तगत केली. तसेच ती पार्सले नेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.
दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरुन वास्को रेल्वे स्थानकावर दोन पार्सले पाठविण्यात आली. त्यामध्ये चिकन असल्याची बतावणी करण्यात आली होती. त्यामुळे ती पार्सले तेथे तपासली गेली नाहीत. तथापि या पार्सलधून चिकनऐवजी गुरांच्या जिभा पाठविण्यात येत असल्याची कुणकुण येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना लागली होती. सदर कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून सतर्क आहेत. याप्रकरणी वास्को रेल्वे पोलिसांनाही माहिती मिळाल्यावर त्यांनी त्या पार्सलसंबंधी चौकशी सुरू केली. वास्को रेल्वे स्थानकावर ती पार्सले घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ती पार्सले उघडण्यात आली असता त्यामध्ये गुरांच्या जिभा आढळल्या. याप्रकरणी पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय खात्याच्या पशुवैद्यकाला पाचारण करण्यात आल्यावर त्यांनी त्या पार्सलाची तपासणी करून आपला अहवाल दिला.
गुरांच्या मांसाची वाहतूक आता रेल्वेतून होत असल्याप्रकरणी रेल्वे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य किरण नाईक तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आश्र्चर्य व्यक्त केले आहे.