रुग्णालयात उपचार सुरू : हातापायांना गंभीर दुखापत
खानापूर : तालुक्यातील जांबोटी भागातील कणकुंबी नजीक असलेल्या चिगुळे गावातील एका शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या तोंडाचा डाव्या बाजूचा जबडा फाटला आहे. तसेच पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली. शेतकऱ्यावर बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आल्यावर पुढील उपचारासाठी केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विलास हेमाजी चिखलकर (५४) हे सकाळी सातच्या दरम्यान आपल्या शेताकडे गेले होते. शेतामध्ये विश्रांतीसाठी त्यांनी एक झोपडी बांधली आहे. नेहमीप्रमाणे झोपडीमध्ये त्यांनी प्रवेश केला असता, त्या ठिकाणी दोन पिल्ले असलेले एक अस्वल बसले होते. अस्वलाने विलासला पाहताच त्याच्यावर हल्ला केला. हल्ला होताच विलासने प्रतिकार करून अस्वलाच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. परंतु अस्वलाच्या हल्ल्यात विलास गंभीर जखमी झाला. त्याच्या डाव्या तोंडाचा जबडा संपूर्ण फाटून गेला. तसेच हातापायाला व शरीरावर जखमा झाल्या. जखमी अवस्थेत विलास गावाकडे पळत सुटला. काही अंतर गेल्यानंतर, त्या मार्गाने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्याला गंभीर जखमी अवस्थेत पाहिले व याची माहिती वन खात्याला दिली. रुग्णवाहिकेतून त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी विलासला केएलई रुग्णालयात दाखल केले.
विलास चिखलकर हा अतिशय गरीब शेतकरी आहे. त्यामुळे खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी तसेच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी या भागातील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
खानापूर तालुक्यात शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. याकडे वन खात्याने लक्ष देऊन वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे रक्षण करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.
घाबरल्याने अस्वलाने केला हल्ला!
शनिवारी मोठ्या प्रमाणात या भागात पाऊस झाला असल्याने, सदर अस्वल आपल्या दोन पिलांना घेऊन झोपडीमध्ये विसावा घेत होते. परंतु अचानक आलेल्या विलासला पाहून घाबरले व त्याच्यावर हल्ला केल्याचा अंदाज आहे.