११ कोटींच्या ड्रग्जप्रकरणी केरळमधील टोळीतील महिलेला अटक

आतापर्यंत तिघांना अटक : गिरी येथे केली होती कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th March, 11:24 pm
११ कोटींच्या ड्रग्जप्रकरणी केरळमधील टोळीतील महिलेला अटक

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने गिरी - बार्देश येथे छापा टाकून ११.६७ कोटी रुपये किमतीचा ११.६७२ किलो हायड्रोफॉनिक विड हा उच्च दर्जाचा गांजा जप्त केला होता. या प्रकरणी गुन्हा शाखेने केरळ येथील शिलना ए. या टोळीतील महिलेला अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.

गुन्हा शाखेचे निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गिरी - बार्देश येथील एका भाड्याच्या खोलीवर शुक्रवार, दि. ७ मार्च रोजी रात्री छापा टाकला. त्यावेळी पथकाने बंगळुरू येथील गौतम एम. या युवकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ११.६७ कोटी रुपये किमतीचा ११.६७२ किलो हायड्रोफॉनिक विड हा उच्च दर्जाचा गांजा जप्त केला. त्यानंतर पथकाने त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. या प्रकरणी त्याची अधिक चौकशी केली असता, हायड्रोफॉनिक विड हा उच्च दर्जाचा गांजा थायलंडहून विमानमार्गे नेपाळला आणला गेला होता. नेपाळहून नंतर हा गांजा गोव्यात आणला गेला. संशयित गौतम याने या गांजाच्या तस्करीमध्ये डिलिव्हरी बॉयची भूमिका पार पाडल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार, गुन्हा शाखेने अधिक चौकशी केली असता, त्याला थायलंडला जाण्यायेण्याची तसेच त्याचा प्रवासाची बुकिंग व इतर व्यवस्था कन्नुर - केरळ येथील श्रीजिल पी. या टोळीतील सदस्याने केल्याचे समोर आल्यानंतर त्याला अटक केली. तसेच या प्रकरणात गुन्हा शाखेने केरळ येथील शिलना ए. या टोळीतील महिलेला अटक केली आहे. त्यानंतर संशयितांना म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली.

दोघांच्या जामीन अर्जावर १ एप्रिलला निकाल 

अटक करण्यात आलेल्या तिघांनी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यातील संशयित गौतम एम. याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला तर इतर दोघांच्या जामीन अर्जावर १ एप्रिल रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

हेही वाचा