गुन्हेवार्ता : आंतरराष्ट्रीय 'जॉब स्कॅम'चा पर्दाफाश, गोवा सायबर विभागाची धडक कारवाई

चिनी वंशाच्या कझाकी नागरिकासह तिघांना अटक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
27th March, 03:47 pm
गुन्हेवार्ता : आंतरराष्ट्रीय 'जॉब स्कॅम'चा पर्दाफाश, गोवा सायबर विभागाची धडक कारवाई

 पणजी : गोवा पोलिसांच्या सायबर विभागाकडून आंतरराष्ट्रीय सायबर स्लेवरी जॉब स्कॅमचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुख्य सूत्रधार असलेला चिनी वंशाचा कझाकी नागरिक तलानिती नुलाक्सी याच्या मुसक्या आवळण्यात विभागाला यश प्राप्त झाले आहे. तसेच भारतीय नागरिक असलेल्या आदित्य रविचंद्रन आणि रुपनारायण गुप्ता यांनाही अटक करण्यात आली आहे.

 दरम्यान, तिसवाडी तालुक्यातील एका पीडित युवकाची म्यानमार मधून गेल्या फेब्रुवारी महिन्यात सुटका करण्यात आली होती. त्यानंतर गोवा सायबर विभागाने पीडित युवकाची जबानी नोंदवत याप्रकरणाची चौकशी सुरू केली. थायलंड मधील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी असल्याची जाहीरात इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध झाली होती. सदर जाहिरातदार एजन्टने मासिक ६० हजार रूपये वेतनाची नोकरी मिळेल, असे सांगितले. त्यानंतर सर्व पाठपुरावा केल्यानंतर संबंधित संशयित एजन्टने पीडित युवकाला दि. १४ जानेवारी रोजी थायलंड येथे नेले.

त्यानंतर  १५ जानेवारी रोजी तेथे पोहोचल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्याला बोटमार्गे म्यानमार मध्ये नेले.  येथील कॉल सेंटरमध्ये नेत त्यांना अमेरीकन नागरिकांना मोबाईलवरून युवती असल्याचे संदेश पाठवून हनी ट्रॅपमध्ये ओढण्यास व पैसे गुंतवण्यास भाग पाडण्यास सांगितले. त्यानंतर तेथील लष्कराने सदर कॉल सेंटरमधील पीडितांची सुटका केली होती.

गोव्याच्या सायबर गुन्हा विभागाने पीडिताच्या चौकशीनंतर तपासकार्य करीत या जॉब स्कॅमचा पर्दाफाश केला. सदर प्रकरणी सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उप अधीक्षक अक्षत आयुष यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने कारवाई केली. 

हेही वाचा