सासष्टीः नावेलीत हार्डवेअर दुकानावर वजन-मापे खात्याची कारवाई

अधिकार्‍यांनी बनावट ग्राहक पाठवून केली चौकशी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th March, 12:34 am
सासष्टीः नावेलीत हार्डवेअर दुकानावर वजन-मापे खात्याची कारवाई

मडगाव : नावेली येथील श्री भैरव ट्रेडिंग या हार्डवेअर शॉपमध्ये वजन व मापे खात्याकडून छापा टाकून सुमारे ५० हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले. एमआरपीपेक्षा जास्त किंमत घेत असल्याच्या तक्रारीनंतर वजन व मापे खात्याकडून ही कारवाई करण्यात आली

नावेली येथील श्री भैरव ट्रेडिंग या हार्डवेअर शॉपमधून आकाश मणीकर यांनी साहित्य घेतले असता जादा पैसे आकारण्यात आलेले होते. त्यांनी वजन व मापे खात्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी वजन व मापे खात्याच्या अधिकार्‍यांनी बनावट ग्राहक पाठवून चौकशी केली असता दुकानदाराने योग्य किंमत सांगितली. 

त्यानंतर अधिकार्‍यांनी दुकानातील साहित्याची पडताळणी करत एमआरपी नसणे, कस्टमर केअरची माहिती नसणे व पत्ता नसणे अशा नियमांच्या उल्लंघन प्रकरणी केबल्स, ड्रील मशिन व इतर असे सुमारे ५० हजारांचे साहित्य जप्त केले. किमतीपेक्षा जास्त पैसे आकारणी होत असल्यास ग्राहकांनी तक्रार करावी व त्यानुसार कारवाई केली जाईल, असे सांगितले.