गुन्हेवार्ता : वागातोर, हरमल येथे एएनसीचा छापा : बडतर्फ पोलिसाकडून ८.९८ लाखांचे ड्रग्ज जप्त

२ लाखांचा २०० ग्रॅम चरस जप्त करून अन्य एकास अटक.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
23rd March, 01:42 pm
गुन्हेवार्ता : वागातोर, हरमल येथे एएनसीचा छापा : बडतर्फ पोलिसाकडून ८.९८ लाखांचे ड्रग्ज जप्त

पणजी : राज्यात वाढत्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी गोवा पोलिसांचे विविध विभाग तत्परतेने कार्य करीत आहे. याच अनुषंगाने, गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने, गोपनीय माहितीच्या आधारे वागातोर आणि हरमल येथे छापा टाकला. वागातोर येथील युवकाकडून तब्बल ८.९८ लाखांच्या ड्रग्स जप्त करत त्यास अटक करण्यात आली तर, हरमल येथे कारवाईला मूर्तस्वरूप देत एका युवकाला अटक करीत त्याच्याकडून २ लाखांचा २०० ग्रॅम चरस जप्त केला.

वागातोर येथे छापेमारी : ड्रग्स बाळगल्या प्रकरणी बडतर्फ  प्रशिक्षणार्थी पोलीस अटकेत 

एनसीचे पथक गेल्या अनेक आठवड्यांपासून वागातोर आणि जवळपास भागात ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीच्या मागावर होते. दरम्यान हणजुण येथील या व्यक्तीला याचा सुगावा लागल्याने, त्याने सावधगिरी बाळगत आपले काम सुरूच ठेवले होते.  गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने वागातोर पाळत ठेवली. हा युवक ड्रग्सची विक्री करण्यासाठी या ठिकाणी आला असता पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्याच्याकडे कोकेन, मेथाम्फेटामाइन आणि एक्स्टसी सारखे अमलीपदार्थ आढळून आले. यानंतर त्यास ताब्यात घेत योग्य कलामांन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. करण गोवेकर (३३,हणजुण) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, संशयित करण हा बडतर्फ प्रशिक्षणार्थी पोलीस आहे. प्रशिक्षणावेळी त्याच्या विरोधात विनयभंगाच्या गुन्हा नोंद झाल्यामुळे त्याला बडतर्फ करण्यात आले होते.

संशयित गोवेकर कडून ३७ ग्राम कोकेन, ३७ ग्राम  मेथाम्फेटामाइन आणि १५ ग्राम उच्च दर्जाच्या एक्स्टसी टेबलेट्स असा माल जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्सची आंतराष्ट्रीय बाजारात किमत सुमारे ८.९८ लाख रुपये इतकी आहे.  त्यासोबतच एएनसी पथकाने ड्रग्सची वाहतुक करण्यासाठी वापरण्यात येणारी मारुती स्विफ्ट कार देखील जप्त केली आहे. 

हरमल येथे एकास चरस बाळगल्याप्रकरणी अटक 

 दरम्यान हरमल येथील युवकाकडून २ लाखांचा २०० ग्रॅम चरस जप्त करून त्यास अटक करण्यात आली. एएनसी पथकाने शुक्रवारी २१ मार्च रोजी पहाटेच्या वेळेस कारवाई करत बेस्ताव रोड्रिग्ज (२८, हरमल) या युवकाला अटक करीत त्याच्याकडून २ लाखांचा २०० ग्रॅम चरस जप्त केला. पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करत त्याच्यावर अमलीपदार्थ विरोधी कायद्याच्या कलम २०(ब)(II) अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीनदयाल रेडकर करत आहेत.

दरम्यान, एएनसीने दोन दिवसांत दोन धडक छापे टाकून दोघांना अटक केली. एएनसीचे अधिक्षक टिकम सिंह वर्मा, उपअधिक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक संजीत पिल्ले यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिसांनी कामगिरी बजावली.