घेऊ दे स्वच्छंदी विहार...

चिमण्या आणि आपले बालपण अतूटपणे जोडलेले आहे, पण आज त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. २० मार्च हा 'जागतिक चिमणी दिवस' त्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करतो. औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे घटत चाललेल्या चिमण्यांना वाचवणे काळाची गरज आहे.

Story: साद निसर्गाची |
23rd March, 04:33 am
घेऊ दे स्वच्छंदी विहार...

आपल्यापैकी बहुतेक जणांचं बालपण हे चिऊताईच्या गोष्टी व बालगीते ऐकत गेलं असेल. 'चिमणी चिमणी वारा घाल' हे बालगीत व ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ ही गोष्ट तर बालपणी प्रत्येकाने ऐकली असेल. पूर्वीच्या काळी तर कोंबड्याच्या आरवण्यासोबत चिमण्यांच्या चिवचिवाटाने आपल्याला जाग यायची. चिमणी अंगणात शिंपडलेले दाणे टिपत असताना पाहून अतोनात आनंद व्हायचा. एखाद्या चिमणीने घराबाजूच्या झुडपावर बांधलेले घरटे बघून तर मन अगदी प्रसन्न व्हायचे. पण आज मात्र ते सुख कुठेतरी हरवत चालले आहे. भौतिक सुखामध्ये अडकलेल्या मानवामुळे तो आनंद कुठेतरी नष्ट होत चालला आहे. औद्योगिकीकरण, वातावरणात होणारे बदल, वाढते प्रदूषण, शहरीकरण यासारख्या कारणांमुळे चिमणीचे अस्तित्व धोक्यात येत आहे. 

एकेकाळी सर्रास पाहायला मिळणाऱ्या चिमण्या आज शहरी भागातून गायब व्हायला लागल्या आहेत. अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिमण्यांची संख्या आज झपाट्याने घटत चालली आहे. या समस्येवर विचारमंथन करुन तोडगा काढण्याचा दिवस म्हणजे 'जागतिक चिमणी दिवस' (वर्ल्ड स्पॅरो डे). 

दरवर्षी २० मार्च हा दिवस 'जागतिक चिमणी दिवस' म्हणून साजरा केला जातो. चिमणीविषयी जनजागृती करण्यासाठी, अन्नसाखळीतील चिमणीचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागील पार्श्वभूमी अशी, चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिमण्या मारण्याचे अभियान सुरू झाले होते. या अभियानामुळे चीनमध्ये चिमण्या जवळजवळ संपुष्टात आल्या, ज्याचा परिणाम गंभीर पर्यावरणीय असंतुलनात झाला. याचा परिणाम म्हणून पुढची बरीच वर्षे चीनमधील लोकांना भयंकर उपासमारीला सामोरे जावे लागले. परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव होऊन जगभरात वर्ष २०१० पासून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जाऊ लागला.

आकाराने छोटा व दिसायला गोंडस असा हा पक्षी युरोप व आशिया खंडात आढळतो. जगात अस्तित्वात असणाऱ्या २६ पैकी ५ चिमण्या भारतात आढळतात. सर्वात जास्त संख्या असलेली, माणसाच्या जवळपास राहणारी अशी ह्या पक्षाची ओळख आहे. पूर्वीच्या काळात कौलारू घरे व त्यासमोर असणाऱ्या विहिरींमुळे चिमण्यांना आपले घर बनविणे सोपे जात असे. आजकाल फ्लॅट संस्कृतीमुळे व सिमेंटची घरे बांधल्याने चिमण्यांना आपले घर बनवणे कठीण होत आहे. शेतात वापरण्यात येणारी हानिकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर हे सुद्धा चिमणीची संख्या कमी होण्यामागचे एक कारण आहे. बेसुमार जंगलतोड,  महामार्गावरुन भरधाव गतीने धावणारी वाहने, गर्दीचा गोंगाट, विद्युत तारांची जंगले, काॅंक्रिटीकरण यासारख्या बाबींमुळे चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

'गोवा व पक्षी' या विषयावर बोलायचे झाले तर गोव्यात पक्षांची संख्या संतुलित आहे असे पक्षीनिरीक्षक सांगतात. गोव्यातील शहरी भागातून चिमण्यांची किंबहुना पक्षांची संख्या जरी कमी झालेली असली तरी हे पक्षी स्थलांतर करत, गोव्यातील ग्रामीण भागाकडे (जगण्यासाठी अनुकूल असलेल्या वातावरणाकडे) वळू लागले आहेत असे त्यांचे मत. हे पाहता, गोमंतकातील शहरी भागात निवास करणाऱ्या जनतेने पक्षांचे संवर्धन करण्यासाठी पावले उचलण्याची गरज भासते. 

चिमणी हा निसर्गाचा समतोल राखणारा पक्षी आहे. जगातील कीटकांची संख्या संतुलित ठेवण्याचे काम चिमणी करते.  त्यामुळे आपोआपच अन्नसाखळी संतुलित राहते. जैवविविधतेच्या दृष्टीने चिमणी व इतर पक्षी अन्नसाखळी संतुलित ठेवण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतात. हे पक्षी जंगलाचे पुनरुत्पादन व बीजप्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. दिवसेंदिवस नष्ट होत असलेला अधिवास व पक्ष्यांची शिकार यामुळे पक्ष्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या पक्ष्यांचा अधिवास आणि खाद्यस्रोत टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. 

या पक्षी दिनी पक्षांसाठी पाण्याची सोय करुया. पाणथळ जाग्यांची निर्मिती करुन त्यासोबत पक्षांसाठी धान्य उपलब्ध करुया. परसबागेत छोट्या छोट्या भांड्यामध्ये पाणी ठेवून, पक्षांना उरलेले अन्न/दाणे टाकून पक्ष्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करूया. शेती आणि बागायतींमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करुन पक्ष्यांचे आयुर्मान वाढवूया. चिमणीला बोर, बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करूया. घराभोवती शक्य तितकी झाडे झुडुपे लावूया. चिऊताईसाठी परसबागेत दाणा-पाणी ठेवूया. चिमण्यांचे जतन व संवर्धन करूया. असे केल्यास चिमण्यांच्या चिवचिवाटाने सुरू होणारे दिवस परत एकदा अनुभवता येईल यात शंका नाही.


स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)