केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे लेखी उत्तर : कर्करोगाच्या संशोधनासाठी तीन वर्षांत ५७५ कोटी मंजूर
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात २०१९ ते २०२४ दरम्यान कर्करोगाचे रुग्ण १२ टक्क्यांनी वाढले आहेत. २०१९ मध्ये राज्यात विविध प्रकारच्या कर्करोगाचे १,५९१ रुग्ण आढळले होते. २०२४ अखेरीस ते वाढून १,७८३ झाले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार तांगेला उदय श्रीनिवास यांनी अतारांकित प्रश्न विचारला होता.
गोव्यात २०१९ ते २०२४ या सहा वर्षांत कर्करोगाचे एकूण १० हजार ७९ रुग्ण आढळले होते. या दरम्यान दरवर्षी रुग्णसंख्येत वाढ होत गेली आहे. २०१९ मध्ये राज्यात कर्करोगाचे १,५९१ रुग्ण आढळले होते. २०२० मध्ये १,६१८, २०२१ मध्ये १,६५२, २०२२ मध्ये १,७०० रुग्ण आढळले होते. २०२३ मध्ये यात ३५ ने वाढ होऊन १,७३५ रुग्ण आढळले. मागील सहा वर्षांत गोव्यात २०२४ मध्ये कर्करोगाचे सर्वाधिक १,७८३ रुग्ण आढळले होते.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) राष्ट्रीय कर्करोग नोंदणी प्रकल्प राबवला जात आहे. यानुसार २०१४ ते २०२३ मधील देशभरात कर्करोगाची बाधा झालेल्या किंवा त्यामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची माहिती गोळा करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विविध संस्था कर्करोगावर संशोधन करत आहेत. यासाठी मागील तीन आर्थिक वर्षांत ५७५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय केंद्र सरकार राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्य सरकारांना आर्थिक मदत देत असल्याचे उत्तरात म्हटले आहे.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २०१९ ते २०२४ दरम्यान कर्करोगाचे १० हजार ७९ रुग्ण आढळले आहेत. याचाच अर्थ राज्यात महिन्याला सरासरी १३९ म्हणजेच दिवसाला सरासरी ४.६३ रुग्ण आढळले आहेत.
देशभरात दिवसाला सरासरी सरासरी ४,०१३ रुग्ण
संपूर्ण देशात २०१९ ते २०२४ दरम्यान कर्करोगाचे ८६ लाख ६८ हजार ४९५ रुग्ण आढळले होते. याचाच अर्थ या दरम्यान महिन्याला सरासरी १ लाख २० हजार ३९५, तर दिवसाला सरासरी ४,०१३ रुग्ण आढळले होते. या कालावधीत उत्तर प्रदेशमध्ये कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळले होते. तेथे वर्षाला सरासरी २.१ लाख रुग्ण आढळले. यानंतर महाराष्ट्रात वर्षाला सरासरी १.१ लाख, पश्चिम बंगालमध्ये वर्षाला सरासरी १ लाख, तर बिहारमध्ये वर्षाला सरासरी १.०१ लाख रुग्ण आढळले असल्याचे उत्तरात म्हटले आहे.
१४३ जणांच्या छातीतील गाठी धोकादायक
गेल्या आठ महिन्यांत राज्यातील ३३,८०६ जणांच्या छातीचे एक्स-रे काढण्यात आले. त्यातून ३,१४४ जणांच्या छातीत गाठी असल्याचे आढळून आले. तर, १४३ जणांच्या छातीतील गाठी धोकादायक असल्याचे आरोग्य खात्याने जारी केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. या आठ महिन्यांत एका व्यक्तीला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचेही समोर आले आहे, असे आरोग्य खात्याने म्हटले आहे.
२०२६पर्यंत कॅन्सर हॉस्पिटल होणार पूर्ण
कॅन्सर हॉस्पिटल इमारतीचे काम वेगाने सुरू असून २०२६पर्यंत हॉस्पिटल कार्यान्वित होणार आहे. हॉस्पिटलात प्रोटोन थेरपी केंद्र स्थापन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या पाठिंब्यामुळेच राज्यात कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी शक्य होत. कर्करोगासह इतर दुर्धर आजारांवरील औषधे ५० ते ६० टक्के स्वस्त दरात उपलब्ध करण्याची प्रक्रीया आरोग्य संचालनालयाने सुरू केली असून प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. गोमेकॉत फुफ्फूस कर्करोगाच्या तपासणीसाठी अॅस्ट्रा झेनेकाबरोबर असलेल्या सामंजस्य कराराराचा विस्तार करण्यात आला आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.