काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा इशारा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा काँग्रेसमध्ये बेशिस्तपणे वागणाऱ्या प्रतिनिधींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिला. शुक्रवारी गोवा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतीक्षा खलप यांच्या शपथग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर, केंद्रीय समितीचे गिरीश चोडणकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
माणिकराव ठाकरे पुढे म्हणाले की, गोवा काँग्रेसमधील काही व्यक्तींना शिस्तीचा विसर पडला आहे. अशा व्यक्ती माध्यमात चुकीचा संदेश पसरवत आहेत. यापुढे बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. अशा व्यक्तींवर कडक कारवाई केली होणार आहे. पक्षाचे काही निर्णय केंद्रीय पातळीवर होतात. या निर्णयांना छुपा विरोध न करता सर्वांनी त्यांचे स्वागत केले पाहिजे. कुणाला पक्ष सोडायचा असेल तर अवश्य सोडावा. पक्ष कुणा एका व्यक्तीवर चालत नाही, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे.
तत्पूर्वी अलका लांबा म्हणाल्या, महिलांनी पुढे येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा. काँग्रेस पक्ष महिलांना राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रतीक्षा खलप म्हणाल्या, गोव्यातील महिलांना रोजगार, उद्योगात समान संधी देण्यासाठी, तसेच महिलांच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
आप, तृणमूल मते फोडतात : निंबाळकर
डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, आप, तृणमूल काँग्रेस गोव्यातील मते फोडण्याचे काम करत आहेत. २०२७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील जनता केवळ काँग्रेसला साथ देणार आहे. त्यामुळे आप आणि तृणमूलने गोव्यात येण्याची चूक करू नये.
काँग्रेसला मागे खेचणाऱ्यांत काही स्वकीयच : पाटकर
अमित पाटकर म्हणाले की, काही लोक महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतीक्षा खलप १५ दिवसांनी पायउतार होणार, अशी चर्चा करत आहेत. ही केवळ अफवा असून खलप यांना प्रदेश काँग्रेस समितीचा पूर्ण पाठिंबा आहे. काँग्रेसला मागे खेचण्यात काही स्वकीय गुंतले आहेत. अशा लोकांना शोधून काढणे आवश्यक आहे. पक्षाबाबत कोणी अफवा पसरवत असेल तर प्रदेश समितीला त्यांची नावे कळवावीत.