पणजीहून बेळगांवला बस नेत असताना म्हापशात घेतले ताब्यात
म्हापसा : गोवा ते बेळगाव आंतरराज्य मार्गावर चालणारी कर्नाटक सरकारची एसटी बस दारूच्या नशेत चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी संशयित गुरूलिंगाप्पा नंदेन्नवर (४६, रा. जालीकोप्पा, बेळगाव) या चालकाला अटक केली आहे.
ही घटना शुक्रवारी २१ रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली. उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची केए २२ एफ २२१९ क्रमांकाची बेळगाव डेपोची बस पणजीहून बेळगावला निघाली होती. ही बस प्रथम म्हापसा आंतरराज्य बस स्थानकावर आली. नंतर तिथून ती जुन्या कदंब बस स्थानकावर आली. संशयित बस चालकाने ही बस जुन्या आंतरराज्य बस प्लॉटसमोर रस्त्याच्या मधोमध पार्क केली व चालक आणि वाहकांनी बसमध्येच विश्रांती घेतली.
यामुळे बस स्थानकावरून इतर प्रवासी बसेसना बाहेर जाण्यास अडथळा निर्माण झाला. आतील प्रवासी वर्गाने त्यांना बस बाजूस करण्यास सांगितले, तेव्हा चालक आणि वाहक दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. प्रवाशांनी हा प्रकार जवळच असलेल्या वाहतूक कार्यालयातील वाहतूक अधिकाऱ्यांना सांगितला. शिवाय पोलिसांनाही पाचारण केले.
वाहतूक अधिकारी व पोलिसांनी बसच्या वाहक आणि चालकाला पोलीस स्थानकात आणले. म्हापसा पोलीस तसेच वाहतूक पोलिसांनी संशयित चालक आणि वाहकाची ब्रेथलायझर चाचणी घेतली. यात दोघांनीही क्षमतेपेक्षा जास्त दारू प्राशन केल्याचे आढळून आले.
पोलिसांनी संशयित बस चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा नोंद करून त्यास अटक केली. तसेच बस जप्त केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय गडेकर हे करत आहेत.