दोन गावांतील रस्ते पक्के करण्याचाही वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : खोतीगाव अभयारण्य परिसरात काणकोण ते मडगावच्या अखत्यारित येणाऱ्या आमोणा जंक्शन ते मार्ली-तिरवाळपर्यंतच्या फीडरवरील ११ केव्ही वीजवाहिनीचे भूमिगत वाहिनीत रूपांतर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, आमदार देविया राणे, गणेश गावकर यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. खोतीगाव अभयारण्य परिसरातील वीजवाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांत रूपांतरण करण्याचे सरकारने याआधी निश्चित केले होते. हा विषय बैठकीत आल्यानंतर या परिसरातील घरे, वन्यजीव आणि इतर गोष्टींचा विचार करून काणकोण ते मडगावच्या अखत्यारित येणाऱ्या आमोणा जंक्शन ते मार्ली-तिरवाळपर्यंतच्या फीडरवरील ११ केव्ही वीजवाहिनीचे भूमिगत वाहिनीत रूपांतर करण्यास मान्यता देण्यात आली, अशी माहिती आमदार देविया राणे यांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
केरी-खोतीगाव येथील वाड्यावर विद्युतीकरणासाठी वन्यजीव मंडळाकडून परवाने देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. तसेच खोतीगाव अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या काणकोण तालुक्यातील सकल- तिरवाळ आणि नाडके गावातील कच्च्या रस्त्यांचे पक्क्या रस्त्यांमध्ये रूपांतर करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
व्यवस्थापन आराखड्यावर चर्चा
राज्यातील संरक्षित क्षेत्रांसाठी व्यवस्थापन आराखडा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या आराखड्यावर वन्यजीव मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. लवकरच या आराखड्याला मान्यता देण्यात येणार अाहे, असेही आमदार राणे यांनी सांगितले.
अभयारण्यांसाठी ‘मास्कोट’ पक्षी निश्चित
वन्यजीव मंडळाच्या बैठकीत राज्यातील प्रत्येक अभयारण्यासाठी मास्कोट (शुभांकर) पक्षी निश्चित करण्यात आले आहेत. ज्या अभयारण्यात एकच पक्षी सर्वाधिक दिसतो, त्या पक्षाला तेथील मास्कोट पक्षी म्हणून जाहीर करण्यात आल्याचेही आमदार देविया राणे यांनी स्पष्ट केले.