नाकेरी बेतूल येथील स्फोटकांच्या गोदामाला आग

घटनास्थळी जमावबंदीचा आदेश: आगीचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd March, 12:23 am
नाकेरी बेतूल येथील स्फोटकांच्या गोदामाला आग

मडगाव : वेर्णा येथील ह्युज प्रेसिझन मॅगझिन या कंपनीच्या बेतूल नाकेरी येथील स्फोटकांच्या गोदामाला आग लागण्याची व स्फोट होण्याची घटना गुरुवारी रात्री घडली. यानंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आमदार डिकॉस्टा यांनी घटनास्थळी पाहणी केली.

जिल्हाधिकार्‍यांनी सदर घटनास्थळाच्या परिसरात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. तसेच अग्निशामक दल व पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आग कशामुळे लागली याचा तपास केला जात असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. 

नाकेरी बेतूल येथील निर्जनस्थळी वेर्णा येथे कार्यरत ह्युज प्रेसिझन मॅगझिन या आर्मनिर्मिती कंपनीचे गोदाम होते व त्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा होता. या गोदामाला गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. 

स्फोटकांनी पेट घेतल्याने मोठा आवाज होऊन स्फोट होऊ लागले. सुमारे दहा ते पंधरा किमीपर्यंतच्या परिसरातून आगीचे लोट हवेत दिसून आले. स्थानिक आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक रहिवाशांकडून सुरक्षिततेच्या बाबतीत आमदारांकडेही विचारणा केली. 

यावेळी आमदार एल्टन डिकॉस्टा व स्थानिकांनी सदर कंपनीच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. अधिकार्‍यांनी स्फोट झाले नसून फक्त आग लागली असल्याचे सांगताच आमदार डिकॉस्टा आक्रमक होत 'आधी व्हिडिओ पाहा, व त्यानंतर स्फोट झाले की आग लागली ते ठरवा. 

नागरिकांना कारणे न सांगता कंपनीच्या अधिकार्‍यांनी लोकांचे ऐकले पाहिजे' अशा शब्दात कान उघडणी केली. या आगीत एका गोदामातील दारुसाठा जळालेला असून दुसरे गोदाम सुरक्षित असल्याचे दिसून आले. 

अग्निशामक दलाने रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण आणण्यानंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनीही घटनेचा आढावा घेतला. याशिवाय दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षकही घटनास्थळी उपस्थित होते. 

या स्फोटामुळे परिसरातील घरांना धक्के बसले काही घरांच्या भिंतीला तडे गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच संबंधित गोदामासंदर्भात परवानगी व इतर कागदपत्रे पंचायतीकडे सादर करण्यासही सांगितले. 

गोदामाचा परवाना निलंबित

पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्हज सेफली ऑर्गनायझेशन (पेसो) ने ह्यूजेस प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामाचा परवाना निलंबित केला. परवाना रद्द का करू नये अशी विचारणा कारणे दाखवा नोटीस जारी केलेली असून २१ दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगितलेले आहे.

अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कडक बंदोबस्तः

दरम्यान, शुक्रवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी जमावबंदीचा आदेश जारी केलेला आहे. घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गोवा पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी दाखल होत घटनेसंदर्भात माहिती घेण्याच सुरुवात केली आहे. याशिवाय कुंकळ्ळी पोलिसांनी आगीच्या घटनेची नोंद केलेली आहे.