दहा लाखांची उत्पन्नमर्यादा हटवली; ५० वयापर्यंत घेता येणार लाभ
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आर्थिक विकास महामंडळाच्या (ईडीसी) मुख्यमंत्री रोजगार योजनेतून (सीएमआरवाय) उत्पन्न मर्यादेची अट हटवली आहे. यापुढे कोणत्याही गोमंतकीयाला योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध होणार आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक बी. एस. पै आंगले यांनी शुक्रवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
याआधी वार्षिक उत्पन्न दहा लाखांपेक्षा कमी असलेल्या गोमंतकीयांना ‘सीएमआरवाय’अंतर्गत ‘ईडीसी’कडून कर्जे मिळत होती. याशिवाय नव्याने व्यवसाय सुरू केलेल्यांना आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांनाही कर्जाचा लाभ दिला जात नव्हता. या योजनेचा सर्वांना लाभ मिळावा, या हेतूने या तिन्ही अटी काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महामंडळाला दिले होते. त्यानुसार या तिन्हीही अटी काढल्या आहेत. यापुढे ५० वर्षापर्यंतच्या गोमंतकीय व्यक्तीला कर्ज मिळणार आहे; परंतु प्रत्येक कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल, ही अट कायम ठेवण्यात आली आहे, असेही पै आंगले यांनी स्पष्ट केले.
गोमंतकीयांनी स्वयंरोजगार करून आर्थिक विकास साधावा, या हेतूने राज्य सरकारने ‘ईडीसी’च्या माध्यमातून ‘सीएमआयवाय’ योजना सुरू केली. योजनेअंतर्गत गोव्यातील रहिवासी असलेल्या व्यक्तीला उद्योग, व्यवसायासाठी कमी व्याज दरात कर्ज दिले जाते. दरवर्षी ‘ईडीसी’कडून या योजनेअंतर्गत कोट्यवधींची कर्जे वितरित केली जातात.
गतवर्षी सुमारे १२० कोटींची कर्जे वितरित
‘ईडीसी’च्या ‘सीएमआयवाय’ आणि इतर योजनांना दरवर्षी गोमंतकीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात ‘सीएमआयवाय’ आणि इतर योजनांच्या माध्यमातून सुमारे १२० कोटींची कर्जे दिली आहेत, असेही व्यवस्थापकीय संचालक पै आंगले यांनी नमूद केले.
कळंगुटमधील हॉटेल प्रकल्पासाठी ९ कोटींचे कर्ज
गोव्यातील एका कंपनीने कळंगुटमध्ये हॉटेल प्रकल्प उभारण्यासाठी ९ कोटींच्या कर्जासाठी अर्ज केला होता. या अर्जाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, असेही पै आंगले यांनी स्पष्ट केले.