कुठ्ठाळी येथे पूर्ववैमनस्यातून चाकूहल्यात कामगाराचा खून

दुसरा गंभीर जखमी : वेर्णा पोलिसांकडून २४ तासांत दोघांना अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd March, 12:13 am
कुठ्ठाळी येथे पूर्ववैमनस्यातून चाकूहल्यात कामगाराचा खून

वास्को : पूर्ववैमनस्यातून झाबोल-कुठ्ठाळी येथील सेंट अँथोनी चिकन फार्ममध्ये काम करणारा अनिल मुथामाझी (२१, ओडिशा) व झिहुसाया मोंडल (३९,ओडिशा) याच्यावर गुरुवारी (ता.२०) दुपारी चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये अनिल याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला तर झियुसाया याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार चालू आहे.
या खून व चाकू हल्लाप्रकरणी वेर्णा पोलिसांनी संतोष इंदर मल्लिक (३२, ओडिशा) व प्रधान नालिका मंडल (३५, ओडिशा) यांना अटक केली. दिवसाढवळ्या खून व चाकू हल्ला करणाऱ्यांना वेर्णा पोलिसांनी काही तासांत अटक केली. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल व झिहुसाया हे दोघे मूळचे ओडिशा येथील परंतु सध्या सेंट अँथोनी चिकन फार्ममध्ये काम करतात. गुरुवारी (ता.२०) दुपारी साडेबाराच्या दरम्यान तेथे दोन व्यक्ती आल्या. 

त्यांनी अनिल व झिहुसाया यांच्याकडे मोफत चिकन देण्याची मागणी केली. तथापि त्यांनी नकार दिल्यावर त्यापैकी एकाने आपल्याकडील चाकू करून अनिल व झुहिसाया यांच्यावर चाकूचे वार केले. त्यामुळे ते दोघे गंभीर जखमी झाले. 

दरम्यान त्या दोघा अज्ञात व्यक्तींनी तेथून पळ काढला. जखमी झालेल्या अनिल व झिहुसाया यांना उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले. तेथे अनिल याचा मृत्यु झाला. याप्रकरणी अनिल याच्या पत्नीने वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार केली. पोलिसांच्या चौकशीअंती त्या खुन्यापैकी एकाने तांबडा टी शर्ट तर दुसऱ्याने पिवळा टी शर्ट घातल्याचे माहिती मिळाली. 

खुनी व्यक्तींना पकडण्यासाठी त्वरित पोलीस पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक पाळत ठेवून तसेच गुप्तचरांची मदत घेऊन त्याचा शोध घेण्यास आरंभ केला. त्यावेळी ते दोघेही दवर्ली- मडगाव येथे भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी करण्यास आरंभ केल्यावर त्यांनी गुन्हा कबुल केला. त्यांनी खून करण्यामागील कारणही उघड केले. 

सदर संशयितांचा अटक करण्यासाठी ज्या पथकाने कामगिरी बजावली त्यामध्ये उपअधीक्षक गुरुदास कदम, पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो, निरीक्षक आनंद शिरोडकर, उपनिरीक्षक आनंद गावकर, उपनिरीक्षक रामचंद्र नाईक, उपनिरीक्षक महेश भोमकर, उपनिरीक्षक कृष्णा ताल्पी, हवालदार सुधाकर जाधव, सुधीर तळेकर, गिरीश नाईक, अजित शिरोडकर, विदेश नाईक, उमेश नाईक, सचिन बांदेकर, शिपाई राम वेळीप, श्रीनिवास रेड्डी, सतीश लकडे, गौतम लोकरे, गणेश कुट्टीकर, परेश गावडे यांच्या समावेश होता. याप्रकरणी उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मेल्सन कुलासो पुढील तपास करत आहेत.

चाकूचे खोलवर वार
झिहूसाया याच्याशी पूर्व वैमनस्य असल्याने संतोष व प्रधान यांनी हा खुनाचा डाव रचला होता. फुकट चिकन मागणे हा फक्त बहाणा होता. झिहुसाया यांना धडा शिकवणे हा मुख्य हेतू होता. मात्र त्यांनी फुकट चिकन मागितल्याने झिहुसाया यांच्याशी वाद निर्माण झाला. त्यामुळे अनिलही या वादात पडला असावा किंवा झिहुसाया याला वाचविण्याचा प्रयत्न केला असावा. त्यामुळे त्याच्यावरही चाकूचे वार करण्यात आले. वार खोलवर करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला.