ड्रममध्ये भरून वरुन सीमेंट टाकत केले सील. पण, असे फुटले बिंग
मेरठ : मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांचा पतीला सुगावा लागल्याने, तिने प्रियकरासोबत प्लॅन करून पतीचा खून केला. धक्कादायक बाब म्हणजे, पतीच्या मृतदेहाचे सुमारे १५ तुकडे करून ते एका ड्रममध्ये भरून त्यात सीमेंट ओतत विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न दोघांनी केला. यानंतर घडलेल्या काही प्रसंगानंतर पतीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. यानंतर जे काही सत्य समोर आले त्याने पोलिसांना देखील हैराण केले.
नेमके काय आहे प्रकरण ?
मेरठमधील इंदिरा नगर येथील रहिवासी सौरभ आणि मुस्कान यांचा २०१६ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मग, मुस्कानच्या प्रेमापोटी, सौरभने मर्चंट नेव्हीमधील भरपगारी नोकरीही सोडली. प्रेमविवाह करण्याचा निर्णय आणि नोकरी सोडल्यामुळे सौरभचे त्याच्या कुटुंबाशी वाद होऊ लागले. परिस्थिती इतकी बिकट झाली की सौरभ आणि मुस्कान कुटुंबापासून वेगळे झाले आणि भाड्याच्या घरात राहू लागले.
दरम्यान, २०१९ मध्ये मुस्कानने एका मुलीला जन्म दिला. याच काळात मुस्कानचे सौरभचा मित्र साहिल याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. जेव्हा सौरभला हे कळले तेव्हा पती-पत्नीमध्ये इतका वाद झाला की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले, परंतु नंतर सौरभने आपल्या मुलीचे भविष्य लक्षात घेऊन परिस्थितीशी तडजोड केली आणि २०२३ मध्ये पुन्हा काम करण्यासाठी परदेशात गेला. सौरभच्या ६ वर्षांच्या मुलीचा वाढदिवस २८ फेब्रुवारी रोजी होता. त्याला उपस्थित राहण्यासाठी सौरभ २४ फेब्रुवारी रोजी भारतात आला होता.
दरम्यान, मुस्कान आणि साहिलमधील प्रेम इतके वाढले की त्यांनी सौरभपासून सुटका मिळवण्यासाठी त्याला मारण्याचा कट रचला आणि ४ मार्च रोजी संधी मिळताच त्यांनी सौरभची निर्घृण हत्या केली. घरातच आयोजित एक छोटेखानी पार्टी संपल्यानंतर साहिल आणि मुस्कानने सौरभच्या कोल्ड ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या. तो गाढ झोपेत गेल्यानंतर, एका धारदार सुऱ्याने त्याचा खून केला. मृतदेहाचे तुकडे करून ते एका ड्रममध्ये भरले आणि त्यावर सीमेंट ओतून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
काही दिवस लोटले. दरम्यान शेजाऱ्यांनी तिला सौरभ बाबत विचारणा केली. तेव्हा मुस्कानने सौरभ हिमाचलमध्ये हिलस्टेशनवर गेला असल्याची बतावणी केली. धक्कादायक बाब म्हणजे, मुस्कान आणि साहिल हे दोघे हिलस्टेशन वर गेले आणि त्यांनी सौरभच्या सोशलमीडिया पेज वारून येथील फोटो पोस्ट केले. बरेच दिवस सौरभचा फोन न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी काळजीपोटी फोन केला. तो फोन मूस्कानने उचलला. सौरभची विचारणा केली असता समाधान कारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी काही तरी काळे बेरे असल्याचा संशय घेत पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सौरभ बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आणि तपासचक्रे गतिमान केली. त्यांनी सौरभचे मित्र आणि नातेवाईकांची चौकशी केली. तेव्हा त्यांना मूस्कान आणि साहिलच्या विवाहबाह्य संबंधांबाबत माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघेही बोलते झाले. त्यांनी आपले संबंध मान्य केले व गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जात पाहणी केली. ड्रममध्ये भरलेले सीमेंट एव्हाना पक्के झाले होते. त्यांनी छ्न्नी, हतोडा आणि कटरच्या सहाय्याने ते कापण्याचा प्रयत्न केला. सुमारे ६ तासांच्या मेहनतीनंतर पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने सौरभचे अवशेष एकत्र केले व शवविच्छेदनासाठी पाठवले. दोघांना अटक करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. एकूणच या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.