केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांच्या उत्तरातून समोर
पणजी : राज्यातील बारा मुले दत्तक घेण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे केंद्रीय महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी राज्यसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून समोर आले आहे.
मंत्री सावित्री ठाकूर यांनी उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सद्यस्थितीत गोव्यासह देशभरात २,३२१ मुले दत्तक घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यात गोव्यातील बारा मुलांचा समावेश आहे. दत्तक नियमावली, २०२२ मध्ये दत्तक घेण्याच्या बाबींबाबत प्राधिकरणे आणि एजन्सींसाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. दत्तक घेण्यासाठी येणारे बहुतांशी पालक पोर्टलच्या माध्यमातून ६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दत्तक घेण्याचा पर्याय निवडतात. दत्तक गटात अशा मुलांची संख्या कमी असेल, तर त्यांना त्यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागते, असे मंत्री ठाकूर यांनी म्हटले आहे. अनाथ मुलांना दत्तक घेण्यासाठी महिला आणि बाल कल्याण मंत्रालयामार्फत मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात येत आहे. गतवर्षी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे दत्तक जागरूकतेसंदर्भातील वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात विविध बैठका, प्रदर्शने व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते, असेही त्यांनी उत्तरात नमूद केले आहे.