गोवा : कॅन्सर, डायबेटीस आजारांचे संशोधन, माहितीची नोंद करण्यासाठी होणार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th March, 04:51 pm
गोवा : कॅन्सर, डायबेटीस आजारांचे संशोधन, माहितीची नोंद करण्यासाठी होणार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पणजी : कॅन्सर, डायबेटीस, उच्च रक्तदाब तसेच इतर दूर्धर आजारांच्या (एनसीडी) संशोधनासाठी रक्ताचे नमुने घेण्याबरोबरच  वजन तसेच इतर गोष्टींची माहिती घेण्यासाठी खास कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात येणार आहे. गोवा कॅन्सर संस्थेचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी ही माहिती दिली. ही नियुक्ती कंत्राटी वा रोजंदारी तत्वावर होण्याची शक्यता आहे.

कॅन्सर, डायबेटीस, अती रक्तदाब तसेच इतर दुर्धर आजारांचे प्रमाण व कारणे शोधण्यासाठी 'दीर्घकालावधी गट अभ्यास' उपक्रमाचा मागील सप्तकात शुभारंभ करण्यात आला. आरोग्य संचालनालय टाटा मेमोरीयल हॉस्पिटल (मुंबई) आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या सहकार्याने हे संशोधन करणार आहे. १ लाख लोकांच्या रक्ताचे नमुने व इतर माहिती घेउन त्यावर संशोधन केले जाईल. या संशोधनाच्या आधारे निष्कर्ष जाहीर केले जातील. १ लाख लोकांची तपासणी व माहिती घेण्यास एका वर्षापेक्षा अधिक कालावधी लागेल. यानंतर टाटा मेमोरीयल हॉस्पिटलचे तज्ज्ञ ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने संशोधन करतील. याला आणखी वेळ लागेल. संशोधनाचा निष्कर्ष येण्यास किमान ३ वर्षांचा कालावधी लागणार असल्याची माहिती डॉ. शेखर साळकर यांनी दिली. 

साखळी, वाळपई, काणकोण व किनारपट्टी भागातील नागरिकांची तपासणी पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. यासाठी आरोग्य खात्यातर्फे खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. उपक्रमासाठी आरोग्य खात्याला वर्षाल ३ कोटी रूपये खर्च येण्याचा अंदाज आहे. यानुसार अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा