चुकीचा पासपोर्ट क्रमांक, खोटी माहिती दिल्यामुळे नाय​जेरियनाचा फेटाळला जामीन

२०२२ मध्ये आराडी - कांदोळी येथे केली होती कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
चुकीचा पासपोर्ट क्रमांक, खोटी माहिती दिल्यामुळे नाय​जेरियनाचा फेटाळला जामीन

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने २०२२ मध्ये आराडी - कांदोळी येथे अमली पदार्थ तस्करी प्रकरणी छापा टाकून नायजेरियन नागरिकाला अटक केली होती. संशयित ओझोएमेना चिगोई या नायजेरियनाने चुकीचा पासपोर्ट क्रमांक आणि इतर खोटी माहिती दिल्यामुळे न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळून लावला आहे. याबाबतचा आदेश पणजी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी दिला.

या प्रकरणी गुन्हा शाखेने ५ जानेवारी २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, आराडी - कांदोळी येथील पीसफुल स्टुडिओ गेस्ट हाऊससमोर विदेशी नागरिकाकडून ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती गुन्हा शाखेच्या एका अधिकाऱ्याला मिळाली होती. गुन्हा शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांच्या पथकाने ४ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ८.५० दरम्यान वरील ठिकाणी सापळा रचला. याच दरम्यान दुचाकी घेऊन आलेल्या ओझोएमेना चिगोई या नायजेरियनाची पथकाने चौकशी केली असता, त्याच्याकडून १ लाख रुपये किमतीचे ९० ग्रॅम चरस आणि ११.३५ ग्रॅम कोकेन जप्त केले होते. या प्रकरणी त्याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम २२(बी) आणि २०(बी) (ii) (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली. याच दरम्यान संशयिताची चौकशी केली असता, तो बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याचे समोर आले. त्याच्याविरोधात कळंगुट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी गुन्हा शाखेने तपासपूर्ण करुन न्यायालयात त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले.

संशयिताने न्यायालयात दुसऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट क्रमांक देऊन न्यायालयाची तसेच गुन्हा शाखेची दिशाभूल केल्याचा दावा न्यायालयात मांडला. याची दखल घेऊन न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून संशयित ओझोएमेना चिगोई या नायजेरियन नागरिकाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

न्यायालयात दुसऱ्यांदा जामीन अर्ज

ओझोएमेना चिगोई या नायजेरियन नागरिकाने न्यायालयात दुसऱ्यांदा जामीन अर्ज दाखल केला. यावेळी संशयिताने दिलेला पासपोर्ट क्रमांक दुसऱ्या व्यक्तीचा असल्याची माहिती सरकारी अभियोक्ता सी फर्नांडिस यांनी न्यायालयात दिली. तसेच संशयिताविरोधात बेकायदेशीर वास्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्याला जामीन मंजूर घेल्यास तो फरार होणार असल्याचा दावा करून फेटाळण्याची मागणी केली. 

हेही वाचा