केरी-सत्तरी तपासणी नाक्यावर ५०० किलो बेकायदेशीर बीफ जप्त

चार जणांना अटक : दोन वाहने वाळपई पोलिसांनी घेतली ताब्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
केरी-सत्तरी तपासणी नाक्यावर ५०० किलो बेकायदेशीर बीफ जप्त

वाळपई : कर्नाटक राज्यातील बेळगाव भागातून गोव्याकडे सातत्याने बेकायदेशीर बीफ वाहतूक होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. रविवारी दुपारी केरी येथील तपासणी नाक्यावर पोलिसांच्या भरारी पथकाने कारवाई करून दोन वाहनांतून सुमारे ५०० किलो बीफ जप्त केले. या बीफची किंमत‌ २ लाख ७५ हजार रुपये आहे. पोलिसांनी बीफ व दोन वाहने अशी १८ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे.

डिचोली पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी व वाळपई पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांनी सांगितले की, भरारी पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश गावस, कर्मचारी सोमनाथ उस्तेकर, निखिल गावस, संगीता झोरे हे केरी येथील तपासणी नाक्यावर वाहनांची झाडाझडती घेत होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हिरव्या रंगाची ह्युंदाई कार (जी.ए.०३ वाय ७८६७), सिल्वर रंगाची टोयोटा इटियोस (जी.ए. ०५-बी-९९९३) या दोन्ही गाड्यांची झाडाझडती घेतली असता या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बीफ असल्याचे आढळून आले.

या संदर्भात कागदपत्रांची मागणी केली असता कागदपत्रे मिळाली नाहीत. यामुळे संबंधित पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चार जणांवर अटकेची कारवाई

बेकायदेशीर बीफ वाहतूक करणे या गुन्ह्याखाली पोलिसांनी अमानअली हुसेनसाब देसाई (२३, झुवारीनगर मुरगाव), सय्यद अमिनसाब मोकाशी (२९, मांगूरहील मुरगाव),सोहेल सलीम नाईकवाडी (२८, उज्वलनगर बेळगाव), इरफान असीब बागवान (२३, आझाद नगर बेळगाव) यांना अटक केली.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण

जप्त करण्यात आलेल्या बीफची शहानिशा करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. अधिकाऱ्यांकडून तपासणी केली असता सदर बीफ असल्याचे स्पष्ट झाले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष सदर बीफची विल्हेवाट लावण्यात आली.

पकडण्यात आलेल्या बीफची बाजारपेठेतील किंमत २.७५ लाख असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे बेकायदेशीर वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. यामुळे पोलिसांनी जवळपास १८ लाखांची मालमत्ता जप्त केली असून पुढील कारवाई सुरू असल्याचे जीवबा दळवी यांनी सांगितले.

अवघ्या पंधरा दिवसांमध्ये दुसरी घटना

पंधरा दिवसांपूर्वी अशाच प्रकारे बेकायदेशीर बीफची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून वाहन जप्त करण्यात आले होते. त्याचप्रमाणे एकावर अटकेची कारवाई केली होती.

तपासणी नाक्यावरून पळण्याचा प्रयत्न

दोन्ही गाड्या अडविण्यात आल्या असता दोन्ही चालक पळण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पोलिसांनी शिताफीने दोन्ही गाड्या अडवून ठेवल्या व त्यांची तपासणी केली, अशी माहिती जीवबा दळवी यांनी दिली. 

हेही वाचा