६० नवीन मेडिकल ऑफिसर, ७५ रुग्णवाहिका उपलब्ध करणार!

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे : आरोग्य सेवेसाठी डिचोली तालुका घेणार दत्तक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
६० नवीन मेडिकल ऑफिसर, ७५ रुग्णवाहिका उपलब्ध करणार!

डिचोलीत मेगा आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना आरोग्य मंत्री विश्वजीत राणे. साेबत डॉ. चंद्रकांत शेट्ये, डॉ. शिवानंद बांदेकर, रूपा नाईक व इतर.

डिचोली : राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरक्षा कवच निर्माण करून आरोग्यसेवा घरोघरी पोहोचवणे हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येकाचे जीवन आरोग्य संपन्न ठेवण्यासाठी सरकार कार्यरत आहे. ६० नवे मेडिकल ऑफिसर, ७५ नवीन रुग्णवाहिका, डिचोली तालुका दत्तक घेणे तसेच डिचोलीत ऑपरेशन थिएटर व आधुनिक सुविधा पुरवणे यावर आमचा भर असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी डिचोली येथे केले.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य खाते, डेंटल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डिचोलीतील सामाजिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. रूपा नाईक, डॉ.‍ आयता व इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर महिलांच्या माध्यमातून गावागावांतील आरोग्याची काळजी समजत असते. डिचोली व मडकई येथील ऑपरेशन थिएटर लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मार्फत २१२ उप आरोग्य केंद्रात १५ विविध टेस्टिंग सुविधा करणारी मशिनरी उपलब्ध करण्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील विविध हॉस्पिटलची निगा आता गोवा साधन सुविधा महामंडळातर्फे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या सोबत झालेल्या चर्चेत निश्चित झाल्याची घोषणाही त्यांनी केली.
आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात आधुनिक सुविधा बहाल करण्याची गरज व्यक्त केली. त्या ठिकाणी डॉक्टरांची संख्या वाढवणे उपलब्ध असलेल्या ऑपरेशन थेटर कार्यान्वित करणे व इतर सुविधा बहाल करताना या भागात लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे आवाहन केले.
राणे व मान्यवरांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आरोग्य शिबिराला खूप मोठा प्रतिसाद लाभला. वेगवेगळ्या पद्धतीचे स्क्रीनिंग तपासणी तसेच महिलांचे कॅन्सर व इतर आजारांवर तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. आरोग्य तपासणी झालेल्या रुग्णांची नियमित तपासणी करण्यासाठी ही गोवा वैद्यकीय महाविद्यालय पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आले. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. तर सिद्धी कासार यांनी आभार मानले.
पत्रकारांसाठी आरोग्य कार्ड उपलब्ध करणार
पत्रकार हे नियमित आपले कार्य बजावत असतात. राज्यातील सर्व पत्रकारांसाठी आरोग्य कार्ड उपलब्ध करून त्यांना आधुनिक तपासणी सुविधा उपलब्ध करण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच एखाद्या आजारासाठी मुंबई व इतर ठिकाणी जाण्याची गरज भासल्यास पत्रकारांना आज त्यासाठी आपण वैयक्तिक सहकार्य करू, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी यावेळी सांगितले. 

हेही वाचा