आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचे इंडिया मास्टर्सला विजेतेपद

वेस्ट इंडिजला ६ गडी राखून दिली मात : रायुडूचे अर्धशतक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचे इंडिया मास्टर्सला विजेतेपद

रायपूर : आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग २०२५ ची ट्रॉफी इंडिया मास्टर्सने जिंकली. सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वात इंडिया मास्टर्सने ही कामगिरी करुन दाखवली आहे. वेस्ट इंडिज मास्टर्सने इंडिया मास्टर्सला विजयासाठी १४९ धावांचे आव्हान दिले होते. इंडियाने हे आव्हान १७ चेंडू आणि ६ राखून सहज पूर्ण केले. इंडियाने १७.१ षटकांत १४९ धावा केल्या. अंबाती रायुडू हा विजयाचा शिल्पकार ठरला. तर इंडियाच्या विजयामुळे विंडीजला उपविजेता म्हणून मायदेशी परतावे लागणार आहे.
इंडियाच्या विजयात रायडूने प्रमुख भूमिका बजावली. रायुडूने ५० चेंडूत १४८ च्या स्ट्राईक रेटने ७४ धावा केल्या. रायडूच्या या खेळीत ३ षटकार आणि ९ चौकार ठोकले. कर्णधार सचिन तेंडुलकरने १८ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांसह २५ धावा केल्या. मधल्या फळीत गुरुकिरत सिंह मान याने १४ धावा केल्या. युसूफ पठाण याला भोपळाही फोडता आला नाही. तर युवराज सिंह आणि स्टूअर्ट बिन्नी या जोडीने इंडियाला विजयापर्यंत पोहचवले.
युवराज ने ११ चेंडूमध्ये १ चौकारासह नाबाद १३ धावा केल्या. तर स्टूअर्ट बिन्नीने ९ चेंडूत १७७.७८ च्या स्ट्राईक रेटने नाबाद १६ धावा केल्या. स्टुअर्टने या खेळीत २ षटकार ठोकले. तर विंडीजकडून एश्ले नर्से याने २ गडी, तर टिनो बेस्ट आणि सुलेमान बेन या दोघांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात ब्रायन लारा याच्या नेतृत्वात वेस्ट इंडिज मास्टर्सने इंडिया मास्टर्सला विजयासाठी १४९ धावांचे आव्हान दिले होते. वेस्ट इंडिज मास्टर्सने रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये २० षटकांत ७ गडी गमावून १४८ धावा केल्या.इंडिया मास्टर्सच्या गोलंदाजांनी विंडीजच्या स्फोटक फलंदाजांसमोर चिवट बॉलिंग करत त्यांना १५० धावांच्या आत रोखण्यात यश मिळवले.
विंडीज मास्टर्ससाठी लेंडल सिमन्स याने सर्वाधिक धावा केल्या. सिमन्सने ४१ चेंडूमध्ये १३९.०२ च्या स्ट्राईक रेटने ५७ धावांची खेळी केली. सिमन्स या खेळीत १ षटकार आणि ५ चौकार ठोकले. त्याशिवाय ओपनर ड्वेन स्मिथ याने २ षटकार आणि आणि ४ चौकारांसह ४५ धावांचे योगदान दिले. तर विकेटकीर दिनेश रामदिन याने नाबाद १२ धावा केल्य. या तिघांचा अपवाद वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. कॅप्टन ब्रायन लारा, विल्यम पर्किन्स आणि चाडविक वॉल्टन या तिघांनी प्रत्येकी ६ धावा केल्या. रवी रामपॉलने २ धावांचे योगदान दिले. तर अ‍ॅशले नर्सेने १ धाव केली.
विनय कुमारचे ३ बळी
इंडिया मास्टर्सकडून एकूण ६ जणांनी गोलंदाजी केली. मात्र त्यापैकी इरफान पठाण आणि धवल कुलकर्णी या दोघांना विकेट मिळवण्यात अपयश आले. विनय कुमार याने सर्वाधिक बळी घेतले. तर शादाब नदीम याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर पवन नेगी आणि स्टूअर्ट बिन्नी या दोघांनी प्रत्येकी १ बळी घेतला.