जमशेदपूर एफसीवर ३-० ने विजय
भुवनेश्वर : येथील कलिंगा स्टेडियमवर पावसाच्या साक्षीने आणि चाहत्यांच्या जल्लोषात एफसी गोवाने कालिंगा सुपर कप २०२५ चे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात एफसी गोवाने दमदार खेळी करत जमशेदपूर एफसीवर ३-० असा विजय मिळवला. या विजयामध्ये बोरजा हरेरा याच्या अप्रतिम दोन गोलांचा मोलाचा वाटा होता, तर डेजन द्राझिच याने शेवटचा निर्णायक गोल करत बाजी मारली.
गोव्याने दुसऱ्यांदा सुपर कप ट्रॉफी पटकावली असून, हे करणारा ते पहिला भारतीय क्लब बनला आहे. तसेच, या विजयानंतर एफसी गोवाची एएफसी चॅम्पियन्स लीग टू २०२५-२६ मध्येही एन्ट्री निश्चित झाली आहे. विशेष म्हणजे, हे विजेतेपद प्रशिक्षक मॅनोलो मार्क्वेझ यांच्या कार्यकाळातील पहिले आणि अंतिम ठरले आहे.
सामन्याच्या सुरुवातीला जमशेदपूरने थोडा आक्रमक पवित्रा घेतला होता. तिसऱ्या मिनिटाला जेव्हियर हर्नांडेजने एक तीव्र फटका मारला, ज्याचा एफसी गोवाचा गोलकीपर हृतिक तिवारीने सुंदर बचाव केला. २३व्या मिनिटाला पहिला गोल झाला. संगवानने डाव्या बाजूने जोरदार धाव घेत शॉट मारला, जो जमशेदपूरचा गोलकीपर अल्बिनो गोम्स अडवू शकला नाही. बोरजाने लगेच रिबाउंडवर पहिला प्रयत्न गमावला, पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने चेंडू नेटमध्ये पाठवत गोवाला आघाडी दिली.
५१व्या मिनिटाला बोरजाने पुन्हा कमाल केली. मध्यभागी चेंडू घेत त्याने २५ यार्ड अंतरावरून जबरदस्त फटका मारला जो थेट नेटमध्ये गेला. त्यानंतर जमशेदपूरचे प्रयत्न निष्फळ ठरले. जॉर्डन मरेने जेव्हियर सिव्हेरियोसाठी संधी निर्माण केली होती, पण सिव्हेरियोने जवळून शॉट मिस केला.
७१व्या मिनिटाला तिसरा आणि निर्णायक गोल झाला. कार्ल मॅकह्यूने सुंदर थ्रू बॉल टाकत बचावफळी फोडली आणि द्राझिचने गोलकीपरला चुकवून चेंडू सहज गोलमध्ये झळकावला. सामन्याच्या अखेरच्या क्षणी पावसात न्हालेल्या एफसी गोवाच्या खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा करत इतिहासात आपले नाव कोरले.