गुजरातने केले हैदराबादचे ‘पॅक-अप’

३८ धावांनी दणदणीत विजय : शुभमन-बटलरची अर्धशतके

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd May, 12:35 am
गुजरातने केले हैदराबादचे ‘पॅक-अप’

अहमदाबाद : कर्णधार शुबमन गिल आणि जोस बटलर या जोडीने केलेल्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने आयपीएल २०२५ मधील ५१ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादवर ३८ धावांनी विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २२४ धावा केल्या, तर हैदराबादचा संघ २० षटकांत ६ बाद १८६ धावांपर्यंतच मजल मारू शकला. या पराभवासह हैदराबाद प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले आहे.
गुजरातसाठी पहिल्या ४ फलंदाजांनी धमाकेदार फलंदाजी केली. त्यामुळे गुजरातला २०० पार मजल मारता आली. गुजरातसाठी कर्णधार शुबमन गिल याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. गिलने ३८ चेंडूत २०० च्या स्ट्राईक रेटने ७६ धावा केल्या. गिलच्या या खेळीत २ षटकार आणि १० चौकारांचा समावेश होता. गिलनंतर बटलर याने सर्वात जास्त धावा कुटल्या. बटलरने ३७ चेंडूत ४ सिक्स आणि ३ चौकारासह ६४ धावा केल्या.त्याआधी सलामीवीर साई सुदर्शन याचे अर्धशतक अवघ्या २ धावांनी हुकले. साईने २३ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याने १६ चेंडूमध्ये २१ धावा केल्या. तर त्यानंतर शाहरुख खान आणि राहुल तेवतिया या दोघांनी प्रत्येकी ६ धावा केल्या. तर गुजरातकडून वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याने सर्वाधिक ३ बळी, तर झीशान अन्सारी आणि कर्णधार पॅट कमिन्स या दोघांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने ४ षटकांत १९ धावा देत २ बळी घेतले. मोहम्मद सिराजने ४ षटकांत ३३ धावा देत २ बळी घेतले, तर इशांत शर्माने ३.२ षटकांत ३५ धावा देत १ बळी गेराल्ड कोएत्झीनेही १ बळी घेतला.
शुबमन गिल मैदानात शांतपणे वावरत असतो. मात्र सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याला राग अनावर झाला. फलंदाजी करताना त्याला वादग्रस्त पद्धतीने बाद दिल्यानंतर गिल वैतागला होता. त्यामुळे शुबमन गिलचे या स्पर्धेतील पहिले शतक हुकले. शुबमन गिलने ३८ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या. १३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न करताना गिलला वादग्रस्तपद्धतीने बाद दिले. खरे तर अशावेळी फलंदाजालाच संशयाचा फायदा मिळतो आणि त्याला नाबाद घोषित केले जाते. पण यावेळी तिसऱ्या पंचांनी आश्चर्यकारक निर्णय घेतला आणि गिलला धावबाद घोषित केले. त्यानंतर शुबमन गिलचा राग अनावर झाला आणि त्याने पंचाशी वाद घातला. अशीच काहीशी स्थिती सनरायझर्स हैदराबादच्या डावातील १४ व्या षटकात घडला. तेव्हा प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करत होता आणि चौथ्या चेंडूवर घडला. अभिषेक शर्मा ६८ धावांवर खेळत होता. तेव्हा प्रसिद्ध कृष्णाने त्याला यॉर्कर चेंडू टाकला. एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील करण्यात आले. पण पंचांनी काही बाद दिले नाही. चेंडू लेग स्टंपबाहेर जात असल्याचे सांगितले. पण कर्णधार शुबमन गिलने प्रसिद्ध कृष्णाशी चर्चा केल्यानंतर रिव्ह्यू घेतला. यावेळी बॉल-ट्रॅकिंगमध्ये काही बिघाड असल्याचे दिसून आले. त्यात बॉल कुठे पिच झाला हे दाखवले गेले नाही, फक्त इम्पॅक्ट आणि विकेट दाखवल्या गेल्या. त्यामुळे गुजरातला एक रिव्ह्यू गमवण्याची वेळ आली होती. त्यामुळे शुबमन गिल वैतागलेला दिसला. शुबमन गिलने पंचांशी वाद घातला. त्यानंतर दोन्ही पंच चर्चा करत गिलला काहीतरी समजावून सांगत होते. मात्र गिल काही ऐकण्यास तयार नव्हता. त्याला अजूनही खात्री नव्हती. वाद वाढत असल्याचे पाहून अभिषेक शर्मा त्याला शांत होण्यास सांगत होता
सनरायझर्स हैदराबात स्पर्धेतून आऊट
चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स यांच्यानंतर स्पर्धेतून आऊट होणारा सनरायझर्स हैदराबाद हा तिसरा संघ ठरला. गुजरात टायटन्सने विजयासाठी २२४ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान काही सनरायझर्स हैदराबादला गाठता आले नाही. सनरायझर्स हैदराबादने १० पैकी ७ सामने गमावले आणि फक्त तीन सामन्यात विजय मिळवला आहे.
२२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने चांगली सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेडने १६ चेंडूत २० धावा केल्या, तर अभिषेक शर्माने ४१ चेंडूत ७४ धावांची शानदार खेळी केली. इशान किशन (१३), हेनरिक क्लासेन (२३) आणि अनिकेत वर्मा (३) लवकर बाद झाले. नितीश कुमार रेड्डी (२१*) आणि कर्णधार पॅट कमिन्स (१९*) यांनी शेवटपर्यंत खेळत संघाला १८६ धावांपर्यंत नेले. मात्र संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
साई सुदर्शनने मोडला सचिनचा विक्रम
पॉवर प्लेमध्ये साई सुदर्शनने २० चेंडूत ४५ धावांची खेळी केली. पॉवर प्लेच्या सहा षटकात गुजरात टायटन्सने ८२ धावा केल्या. यावेळी साई सुदर्शनने ३५ डावात १५०० धावा पूर्ण केल्या. यासह कमी डावात हा पल्ला गाठणारा फलंदाज ठरला आहे. तसेच सचिन तेंडुलकरचा विक्रमही नावावर केला आहे. साई सुदर्शनने करिअरच्या ५४ व्या डावात २००० टी २० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. सचिनने ही किमया ५९ डावात केली होती. मात्र आता हा विक्रम साई सुदर्शनच्या नावावर झाला आहे.

साई सुदर्शनच्या ५०० धावा पूर्ण
आयपीएल २०२५ स्पर्धेत साई सुदर्शनच्या फलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे. हा युवा फलंदाज ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव सारख्या अनुभवी फलंदाजांना तोडीस तोड टक्कर देत आहे. साई सुदर्शनने हैदराबादविरूद्धच्या सामन्यात ४८ धावांची खेळी केली. त्याचं अर्धशतक अवघ्या २ धावांनी हुकलं. यादरम्यान त्याने आयपीएल २०२५ स्पर्धेत ५०० धावांचा आकडा गाठला आहे. असा कारनामा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांना देखील आयपीएल २०२५ स्पर्धेत ५०० धावांचा आकडा गाठता आलेला 
साई सुदर्शन अव्वल स्थानी

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आता साई सुदर्शन अव्वल स्थानी पोहोचला आहे. साई सुदर्शनच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १० सामन्यांमध्ये ५०४ धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवने ११ सामन्यांमध्ये ४७५ धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहलीने १० सामन्यांमध्ये ४४३ धावा केल्या आहेत. गुजरातचा कर्णधार शुभमन गिल या यादीत चौथ्या स्थानी आहे. तर ४३९ धावांसह यशस्वी जैस्वाल पाचव्या स्थानी आहे.