चेन्नई सुपरकिंग्सचा पुन्हा ‘फ्लॉप शो’

थरारक सामन्यात बंगळुरुचा २ धावांनी विजय : विराट, जेकॉब, शेफर्डची अर्धशतके

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
04th May, 12:35 am
चेन्नई सुपरकिंग्सचा पुन्हा ‘फ्लॉप शो’

बंगळुरु : इंडियन प्रीमियर लीग २०२५ मधील चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना अत्यंत चुरशीचा झाला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने २ धावांनी विजय मिळविला.
नाणेफेक हरल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. सलामीला आलेले जेकॉब बेथेल आणि विराट कोहली यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भक्कम भागीदारी उभी केली. जेकॉबने ३८ चेंडूत ५५ धावा केल्या तर विराट कोहलीने ४५ चेंडूत ६२ धावांची दमदार खेळी केली.
विराट आणि जेकॉब बाद झाल्यानंतर मधल्या फळीत देवदत्त पडिक्कल आणि रजत पाटिदार फार काही कमाल करू शकले नाहीत. काही वेळ आरसीबीचा डाव थोडासा मंदावल्यासारखा वाटला. पण शेवटच्या काही षटकांत क्रीजवर आलेल्या रोमारियो शेफर्डने सामन्याचे रुप बदलून टाकले.रोमारियो शेफर्डने केवळ १४ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या झंझावातमुळे आरसीबीने २० षटकांत ५ गडी गमावून २१३ धावा केल्या आणि चेन्नई चेन्नईचा संघ २१४ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि त्यावेळी आयुष म्हात्रेने धडाकेबाज फटकेबाजी करत रंगत आणली. भुवनेश्वर कुमारसारख्या गोलंदाजाला त्याने अस्मान दाखवलं. आयुषने अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करत होता. आयुषचे शतक मात्र यावेळी सहा धावांनी हुकले. आयुषने यावेळी ४८ चेंडूंत ९ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ९४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
विराट कोहली आणि जेकब बेथेल यांनी संघाला दणदणीत सुरुवात करून दिली. या दोघांनी ९७ धावांची दमदार सलामी दिली आणि त्यांनी चेन्नईच्या गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. बेथेल आणि विराट दोघेही आक्रमक खेळी करत होती. या दोघांनीही अर्धशतके झळकावली आणि त्यामुळे आता आरसीबी धावांचा डोंगर उभारणार, असे वाटत होते. पण त्याचवेळी बेथेल बाद झाला आणि ही जोडी फुटली. बेथलने यावेळी ८ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली. विराटही त्यानंतर जास्त काळ खेळू शकला नाही, विराटने ४ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६२ धावांची खेळी उभारली. हे दोघे बाद झाले आणि त्यामुळे आरसीबीची धावगती मंदावली.
सामन्याच्या शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १५ धावांची गरज होती. धोनी स्ट्राईकवर होता आणि प्रेक्षकांच्या श्वासाचं ठिकाण नव्हते. पहिल्या चेंडूवर धोनीने एक धाव घेत जडेजाला स्ट्राईक दिला. दुसऱ्या चेंडूवर जडेजाने पुन्हा एकच धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर धोनी पायचीत झाला आणि स्टेडियममध्ये शांतता पसरली. चौथ्या चेंडूवर आलेल्या शिवम दुबेने षटकार ठोकला, पण चेंडू कंबरेवर असल्याने रिव्ह्यू घेण्यात आला आणि तो नो बॉल ठरला. आता चेन्नईला ३ चेंडूत ६ धावांची गरज होती. पुढील एक धाव मिळाली. २ चेंडू आणि ५ धावांची गरज, असी चित्र होते. जडेजा पुन्हा एक धाव काढून स्ट्राईक दुबेला दिली. शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज होती पण केवळ १ धावच मिळाली आणि बंगळुरुने सामना २ धावांनी जिंकला.

विराटच्या नावावर चार विक्रम

यंदाच्या आयपीएलमध्ये भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली जबरस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने शनिवारी बंगळुरूच्या एम. ए. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन या तिघांना मागे टाकत आपल्या नावे तीन विक्रम केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या खेळीने त्याने पुन्हा एकदा ऑरेंज कॅपही कमावली आहे.
विराट कोहलीने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६२ धावा काढून बाद झाला. मात्र विराटने तीन विक्रम आपल्या नावावर करताना ऑरेंज कॅप देखील पटकावली. विराट आता ११ सामन्यात ५०५ धावा करून पहिल्या क्रमांकावर आहे. तर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन १० सामन्यात ५०४ धावा करून दुसऱ्या क्रमाकांवर आहे. त्यामुळे आता स्पर्धेच्या शेवटी ऑरेंज कॅप कोणाकडे जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विराट कोहली आजच्या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये एकाच मैदानावर सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. विराट बंगळुरूमध्ये १५२ षटकार मारणार फलंदाज ठरला आहे. त्याने बंगळुरूमध्ये १५१ षटकार मारून पहिल्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. या यादीत रोहित शर्मा आणि अ‍ॅलेक्स हेल्स यांचीही नावेही आहेत.
टी-२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना षटकारांचे त्रिशतक ठोकणारा विराट कोहली हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. विराटनंतर ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर, रोहित शर्मा तिसऱ्या, किरॉन पोलार्ड चौथ्या आणि महेंद्रसिंग धोनी पाचव्या क्रमांकावर आहे.
विराट कोहली आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला आहे. विराटने पंजाब किंग्जविरुद्ध ११३४ धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडला आहे.
विराट कोहलीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वाधिक ५०+ धावा करून शिखर धवनलाही मागे टाकले आहे. आजच्या सामन्यात विराटने दहाव्यांदा ५०+ धावा करण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी हा विक्रम धवनच्या नावावर होता. त्याने चेन्नईविरुद्ध ९ वेळा ही कामगिरी केली होती.
चेन्नईविरुद्ध ५०+ धावा
१० - विराट कोहली*
९ - शिखर धवन
९ - डेव्हिड वॉर्नर
९ - रोहित शर्मा
एकाच मैदानात सर्वाधिक षटकार
१५२* - विराट कोहली, बंगळुरू
१५१ - ख्रिस गेल, बंगळुरू
१३८ - ख्रिस गेल, मीरपूरमध्ये
१३५ - अ‍ॅलेक्स हेल्स, नॉटिंगहॅम येथे
१२२ - रोहित शर्मा, वानखेडेवर
एकाच संघाकडून सर्वाधिक षटकार
३०१ - विराट कोहली (आरसीबी)*
२६३ - ख्रिस गेल (आरसीबी)
२६२ - रोहित शर्मा (मुंबई)
२५८ - किरॉन पोलार्ड (मुंबई)
२५७ - एमएस धोनी (सीएसके)
एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा
११४६ - विराट कोहली विरुद्ध सीएसके*
११३४ - डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पीबीकेएस
११३० - विराट कोहली विरुद्ध डीसी
११०४ - विराट कोहली विरुद्ध पीबीकेएस
१०९३ - डेव्हिड वॉर्नर विरुद्ध केकेआर
१०८३ - रोहित शर्मा विरुद्ध केकेआर