कर्णधारपदासाठी बुमराहचे नाव आघाडीवर
मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याने अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ही घोषणा त्याने अधिकृत पत्रकार परिषदेत नव्हे, तर एक साधी इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करून केली. त्याला कसोटीच्या कर्णधारपदावरून हटविण्यात येणार असल्याच्या चर्चेमुळे त्याने हा तडकाफडकी निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
रोहितने त्याच्या इंस्टा स्टोरीवर २८० क्रमांकाच्या कसोटी टोपीचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले आहे, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. भारतीय संघाचे कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणे, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी तुमच्या प्रेमासाठी आणि पाठींब्यासाठी आभारी आहे. या एका ओळीच्या पोस्टने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली.
विश्वस्त सूत्रांनुसार, गेल्या काही महिन्यांपासून रोहितला कर्णधारपदावरून हटविण्याबाबत चर्चेला उत आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटीतून त्याला वगळण्यात आले होते. दरम्यान, १९ कसोटी डावांमध्ये त्याच्या भात्यातून केवळ एकच शतक निघाले होते. संघाच्या भविष्यासाठी तरुण नेतृत्व देण्याच्या चर्चाही चालू होत्या. काही वरिष्ठ मंडळींनी कर्णधारपद बदलण्याची जोरदार शिफारस केली होती. ही सर्व पार्श्वभूमी पाहता रोहितने कर्णधारपदावरून हटवण्याआधीच कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सध्या नवा कसोटी कर्णधार म्हणून जसप्रित बुमराहचे नाव आघाडीवर आहे.
रोहित शर्माची कसोटी कारकीर्द
रोहित शर्माने ६ नोव्हेंबर २०१३ रोजी कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. रोहितने तेव्हापासून गेली १२ वर्षे कसोटी संघांचे प्रतिनिधित्व केले. तसेच रोहितने या दरम्यान काही वर्ष भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. रोहितने ६७ कसोटी सामन्यांमधील ११६ डावांमध्ये ५७.०८ या स्ट्राईक रेटने आणि ४०.५८ च्या सरासरीने ४ हजार ३०२ धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान ८८ षटकार आणि ४७३ चौकार लगावले. रोहितने १२ वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत १८ अर्धशतके, १२ शतके आणि १ द्विशतक झळकावले होते. रोहितची २१२ ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या होती.
रोहितची कसोटी कर्णधार म्हणून कामगिरी
रोहितने २०२२-२०२४ दरम्यान एकूण २४ सामन्यांमध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. रोहितने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात २४ पैकी १२ सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. तर ९ वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तर ३ सामने अनिर्णित राहिले. रोहितची कर्णधार म्हणून ५७.१४ अशी विजयी टक्केवारी राहिली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे उपविजेतेपद
रोहितने टीम इंडियाला त्याच्या नेतृत्वात २०२१-२०२४ या वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीप स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवून दिले होते. भारताला या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभूत केले होते. त्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.