कोलकाताचा २ गडी राखून पराभव : डेवॉल्ड ब्रेविसचे वादळी अर्धशतक
कोलकाता : आयपीएल २०२५ स्पर्धेतील ५७ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी १८० धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने १९.४ षटकात ८ गडी गमवून पूर्ण केले आणि आपल्या पराभवाचा सिलसिला संपवला.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकात्याने २० षटकात ६ गडी गमवून १७९ धावा केल्या आणि विजयासाठी १८० धावांचे आव्हान दिले. चेन्नई सुपर किंग्सने हा सामना २ विकेट राखून १९.४ षटकात जिंकला. या स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्सचा हा तिसरा विजय आहे. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात अडखळत झाली. सलामीला आलेले आयुष म्हात्रे आणि डेवॉन कॉनवे खातेही खोलू शकले नाहीत. उर्विल पटेलने पदार्पणाच्या सामन्यात ११ चेंडूत आक्रमक ३१ धावांची खेळी केली. रविचंद्रन अश्विन ८, रवींद्र जडेजा १९ धावा करून बाद झाले. त्यामुळे हा सामना कोलकात्याच्या पारड्यात झुकला होता. पण डेवॉल्ड ब्रेविस आणि शिवम दुबेने चांगली भागीदारी काली. डेवॉल्डने २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारासह ५२ धावा केल्या. त्यानंतर शिवम दुबेने एका बाजूने मोर्चा सांभाळला. कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबत डाव पुढे नेला. शिवम दुबेने ४० चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार मारत ४५ धावांची खेळी करून बाद झाला. त्यामुळे स्थिती ८ चेंडूत १० धावा अशी आली. नूर अहमदने दोन धावा केल्या आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट गेली.चेन्नई सुपर किंग्सला ६ चेंडूत ८ धावांची गरज
चेन्नई सुपर किंग्सला ६ चेंडूत विजयासाठी ८ धावांची गरज होती. स्ट्राईकला महेंद्रसिंह धोनी होता. तर अजिंक्य रहाणेने शेवटचे षटक आंद्रे रसेलकडे सोपवले. पहिल्याच चेंडूवर महेंद्रसिंह धोनीने षटकार मारला. यासह सामना आपल्या पारड्यात खेचला. त्यामुळे ५ चेंडूत २ धावांची गरज होती. दुसरा चेंडू निर्धाव गेला. म्हणजे धोनीने धाव घेतली नाही. तिसऱ्या चेंडूवर मात्र एक धाव घेतली आणि सामना बरोबरीत आणला. तीन चेंडूत एका धावाची गरज होती. कंबोजने चौथ्या चेंडूवर चौकार मारला आणि विजय मिळवून दिला.कोलकात्याचा डाव
कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर गुरबाज आणि सुनील नरीन ही जोडी मैदानात उतरली होती. पण ११ धावांवरच गुरबाज बाद झाला. त्यानंतर सुनील नरीन २६ धावा करून तंबूत परतला. कर्णधार अजिंक्य रहाणेने ३३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ४८ धावा केल्या. अंगकृश रघुवंशी काही चालला नाही. त्याला फक्त एका धावेवर समाधान मानावे लागले. मनीष पांडेने नाबाद ३८ धावांची खेळी तर आंद्रे रसेल ३१ चेंडतू ४ चौकार आणि ३ षटकार मारून ३८ धावांवर बाद झाला. रिंकू या सामन्यातही फेल गेला. त्याला फक्त ९ धावा करता आल्या. तर रमणदीप सिंगने नाबाद ४ धावांची खेळी केली.
सामन्यापूर्वी बॉम्बहल्ल्याची धमकी
कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ च्या सामन्यादरम्यान बंगाल क्रिकेट असोसिएशन (सीएबी) ला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्याने कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर गोंधळ उडाला. हा मेल अज्ञात स्त्रोताकडून युनियनच्या अधिकृत ईमेल पत्त्यावर पाठवण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई केली, सुरक्षा व्यवस्था वाढवली मेल मिळताच कोलकाता पोलिसांना याची माहिती देण्यात आली. बॉम्ब पथक, श्वान पथक आणि विशेष सुरक्षा दलांनी ईडन गार्डन्स आणि आसपासच्या परिसरात जलद शोध मोहीम सुरू केली. यामध्ये कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळल्याची पुष्टी झालेली नाही, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव स्टेडियमवरील देखरेख कडक करण्यात आली.
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पहिला आयपीएल सामना
हा सामना अशा संवेदनशील वेळी झाला जेव्हा देश ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश साजरा करत होता. पण देशावर युद्धाचे ढग गडद होत होते. ७ मे रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही कारवाई केली. भारतीय सशस्त्र दलांनी एकाच वेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारत सरकारने या लष्करी कारवाईचे वर्णन ‘अचूक, मर्यादित आणि चिथावणीखोर’ असे केले आहे. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, भारताने अत्यंत संयमाने केवळ आपल्या नागरिकांना थेट धोका असलेल्या दहशतवादी अड्ड्यांवरच हल्ला केला. या कारवाईदरम्यान कोणत्याही नागरिकाला किंवा पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केले गेले नाही, ज्यामुळे भारताची जबाबदारी आणि मानवतावादी दृष्टिकोन स्पष्ट झाला.
गर्दीत भीतीचे वातावरण नाही
बॉम्बच्या धमकीच्या बातमीने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असली तरी, स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांनी कोणत्याही भीतीशिवाय खेळाचा आनंद घेतला. सुरक्षा व्यवस्था इतकी कडक होती की, कोणत्याही प्रकारची अफवा किंवा घबराट पसरली नाही. तपास सुरू, सायबर सेल सक्रिय कोलकाता पोलिसांची सायबर शाखा ज्या ईमेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली होती त्याचा स्रोत ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. प्राथमिक तपासात, हा मेल परदेशातून पाठवण्यात आल्याचे दिसून येत आहे, परंतु अद्याप ठोस पुष्टीची प्रतीक्षा आहे. लवकरच गुन्हेगारांचा माग काढला जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
सामन्यापूर्वी खेळाडूंनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा केला सन्मान
खिलाडूवृत्तीसोबतच देशभक्तीचे वातावरणही दिसून आले. सामना सुरू होण्यापूर्वी, सीएसके आणि केकेआर या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सीमारेषेजवळ उभे राहून भारतीय सशस्त्र दलाच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला आदरांजली वाहिली. या दरम्यान, राष्ट्रगीताचेही आयोजन करण्यात आले आणि बीसीसीआयने या श्रद्धांजली कार्यक्रमाला पाठिंबा दिला.
कोलकात्याला प्लेऑफची आशा
कोलकात्याला अजूनही प्लेऑफची पुसटशी संधी आहे. कोलकात्याचे एकूण ११ गुण आहेत आणि दोन सामने शिल्लक आहेत. पहिली दोन स्थान १६ गुण असल्याने गेल्यात जमा आहेत. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या स्थानाचे गणित उर्वरित दोन सामने जिंकले जर तरने पूर्ण होऊ शकते. पण पंजाब आणि मुंबईच्या पराभवावर हे अवलंबून असणार आहे.